Agriculture 7/12 Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture 7/12: समजून घ्या सातबारा कागदपत्राचे महत्त्व

Land Ownership Record: सातबारा हा सरकारने बनविलेला मालमत्तेच्या संदर्भातील उतारा नमूद करण्यासाठी असलेले एक नोंदणी रजिस्टर आहे. यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, मालमत्तेचा मालक, शेतजमिनीची माहिती, शेतजमिनीचा प्रकार- सिंचित किंवा पावसाने सिंचित आणि त्या जमिनीवर करण्यात आलेल्या शेतीबद्दलची माहिती दिलेली असते.

Team Agrowon

भीमाशंकर बेरुळे

Agriculture Land Details: सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण. वंशपरंपरेने आपल्याकडे आलेली जमीन असो की स्वतः कष्ट करून एक एकराची १० एकर केलेली जमीन असो, सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद केलेली असते. शेतकऱ्याचा जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कागद म्हणजे सातबारा उतारा. सातबारा उताऱ्यातील गाव नमुना ७ संबंधित शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याची माहिती नोंदविलेली असते, तर गाव नमुना १२ ही पिकांची नोंदवही असते.गाव नमुना १२ वर शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या जमिनीवर कोणती पिके घेतली आहेत, याची माहिती दिलेली असते. सातबारा उताऱ्यात गाव नमुना ७ आणि गाव नमुना १२ एकाच पत्रकात असल्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटले जाते.

सातबारा उताऱ्याचा प्रवास

१९१० साली जमीन बंदोबस्त योजना आली. या योजनेत जमिनीची मोजणी करून जमिनीचे अभिलेख तयार करण्यात आले. त्यात प्रत्येक क्षेत्रास एक नंबर दिला गेला, ज्याला सर्व्हे नंबर म्हटले जाते.या योजनेअंतर्गत तयार झालेल्या जमिनीच्या अभिलेखांना ‘कडईपत्रक’ असं म्हणतात. सातबारा येण्यापूर्वी या कडईपत्रकात जमिनीची माहिती दिली जात होती.१९३० साली इंग्रजांनी जमाबंदी केली. जमाबंदी म्हणजे जमिनीवर अधिकृतरीत्या वसूल बसवण्यात आला, आकारणी ठरवण्यात आली. जमिनीची मोजणी होऊन नवीन खातेपुस्तिका तयार झाली. त्यातून १९३० मध्ये सातबारा उताऱ्याचा नवीन नमुना तयार झाला. १९३० मध्ये इंग्रजांनी जमाबंदी केल्यापासून आजतागायत जमाबंदी झालेली नाही.

सातबारा उताऱ्यात काय असतं?

सातबारावर सुरुवातीला गाव नमुना ७ आणि खाली गाव नमुना १२ असतो.

गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असते.यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितले असते. भूधारणा पद्धतीचे एकूण ४ प्रकार पडतात.

भोगवटादार वर्ग- १ :

या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.

भोगवटादार वर्ग-२ :

या मधील जमिनीचे हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचे हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

भोगवटादार वर्ग-३ :

या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.

भोगवटादार वर्ग-४ :

या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी १०,३०,५० किंवा ९९ वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात.

सातबारावर तुमच्याकडे किती जमीन आहे ते हेक्टर आरमध्ये दिलेले असते. ती जिरायती आहे, बागायती आहे हे सुद्धा सांगितलेले असते. एकूण क्षेत्र किती ती सांगितलेले असते. त्याखाली पोट खराब म्हणजेच लागवडीस अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते.

त्यानंतर भोगवटादाराचे नाव म्हणजे ती जमीन कुणाच्या मालकीची आहे, ते सांगितलेले असते. त्यासमोर या जमिनीवर किती कर म्हणजेच शेतसारा आकारला जातो ते सांगितलं आहे.त्यानंतर खाली गाव नमुना १२ असतो. ही पिकांची नोंदवही असते.यात तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पिके घेतली, किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा स्रोत काय आहे, हे नमूद असते.

सातबारा हे मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. यामध्ये मालमत्तेबद्दलची सर्व माहिती ही तपशीलवार दिलेली असते. जसे की, जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ, वर्तमानकाळात असलेला त्या मालमत्तेचा मालक.

प्रत्येक गावातील तलाठी हा गावातील सर्व जमिनींच्या संदर्भात वेगवेगळ्या नोंदणी वह्या ठेवत असतो. या नोंदणी वह्यांना वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आलेले असतात. याला ‘गाव नमुना’ असे संबोधले जाते.

उद्देश

सातबारा हा सरकारने बनवलेले मालमत्तेच्या संदर्भातील उतारा नमूद करण्यासाठी असलेले एक नोंदणी रजिस्टर आहे. यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, मालमत्तेचा मालक, शेतजमिनीची माहिती, शेतजमिनीचा प्रकार- सिंचित किंवा पावसाने सिंचित झालेली, शेवटी त्या जमिनीवर करण्यात आलेल्या शेतीबद्दलची माहिती दिलेली असते.

सातबारा उतारामध्ये सरकारी एजन्सीकडून घेण्यात आलेल्या कर्जाबद्दलची माहिती दिलेली असते. ज्यामध्ये बियाणे खरेदी, कीटकनाशक, खते यांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद करण्यात येते. अशा प्रकारे जमिनीचा सातबारा जमिनीच्या मालकी हक्काच्या संबंधित सर्व कागदपत्रांना दस्तावेज आहे.

गरज

जमिनीच्या मालकी हक्काबद्दल जाणून घेण्यासाठी सातबारा हा एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. या कागदपत्रामुळे विक्रेत्याच्या पार्श्वभूमी व खरेपणाबद्दल माहिती होते. जेव्हा विक्री पूर्ण होते, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये या कागदपत्राची गरज असते. शिवाय शेतीसाठी कर्ज घेताना देखील बँकेमध्ये हे कागदपत्र मागण्यात येते. शिवाय कोणत्याही जमिनीशी निगडीत कोर्ट केसमध्ये आणि इतर अनेक कारणांसाठी या कागदपत्राची गरज असते.

स्वरूप

अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारने नक्कल, फसवणूक आणि खोटेपणा टाळण्यासाठी सातबारा उताऱ्याच्या दस्तऐवजाचे स्वरूप बदलले. या कागदपत्रामध्ये आता लँड रेकॉर्ड विभागाचा वॉटरमार्क आणि राज्य सरकारचा लोगो असेल. शिवाय यात गावाचे नाव आणि कोड देखील असेल. शेवटच्या जमीन मालकाची या कागदपत्रामध्ये नोंद करण्यात येईल. एकूण १२ नवीन बदल हे या कागदपत्रामध्ये झाले आहेत. जे जमिनीच्या व्यवहारातील खोटेपणा आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत.

या कागदपत्रामध्ये स्थानिक सरकारचा निर्देशिका कोड, त्या सर्व्हेक्षण क्रमांकाचे एकूण क्षेत्र, प्रलंबित उत्परिवर्तन (Mutation Number) आणि अंतिम उत्परिवर्तन क्रमांक देखील दर्शविण्यात येईल. या कागदपत्रामध्ये जमीन वापराचा हेतू नमूद केल्याने त्या जमिनीचा कोणता वापर आहे हे स्पष्ट होईल.

महत्त्व

सातबारा उतारा जमिनीच्या मालकीचा इतिहास जाणून घेण्यास आपल्याला मदत करतो. त्यामुळे त्या मालमत्तेच्या बाबतीत काही कोर्ट केस चालू आहे का किंवा ती मालमत्ता कोणत्या विवादात अडकली आहे का याबद्दल माहिती समजते. शिवाय ही जमीन कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते आहे त्याबद्दल देखील समजण्यास मदत होते. म्हणजे ती जमीन शेतजमीन आहे की व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येते आहे याबद्दल समजते. ती जमीन जर शेतजमीन असेल तर त्या जमिनीवर कोणत्या प्रकारचे पीक लावले आहे याबद्दल देखील समजते. शासकीय कामकाजासाठी सातबारा हा महत्वाचा दस्तावेज आहे.

उपयोग

सातबारामध्ये दिलेल्या तपशीलवार माहितीनुसार खरेदी करू इच्छित असलेल्या मालमत्तेमध्ये नियमित वापरासाठी प्रवेश रस्ता आहे की नाही याबद्दल समजते.

सातबारा हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे. जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे याबद्दल यावरून माहिती मिळण्यास मदत होते. शिवाय एखादी जमीन खरेदी केल्यावर ती मालमत्ता तुमच्या नावे झाल्यावर सातबारामध्ये ती जमीन तुमच्या नावावर दिसते.

बँक कर्ज देताना जमिनीच्या या महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल विचारणा करते.

कायदेशीर विवादांमध्ये या कागदपत्राचा उपयोग करण्यात येतो.

७/१२ उताऱ्यावरील नोंदी

७/१२ वर होणारी प्रत्येक नोंद ही खातेदारासाठी महत्त्वाची असते. अनेक प्रकारच्या नोंदी ७/१२ वर करण्यात येतात. त्यासाठी तलाठी यांचेकडून फेरफार केला जातो. तो फेरफार मंडळ अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणित केला जातो. अशा प्रमाणित नोंदीचा अंमल ७/१२ वर घेतला जातो. या नोंदी बाबत आपण पुढील भागात पाहणार आहोत.

: bvberule@gmail.com

(लेखक उमरगा, जि. धाराशिव येथे नायब तहसीलदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT