Nagpur News : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाची कापूस खरेदी यंदाही लालफितीत अडकण्याची शक्यता आहे. परिणामी, या हंगामातही कापूस उत्पादकांना दराच्या बाबतीत मोठे चढ-उतार अनुभवावे लागतील, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून शासनाने पणन महासंघाला खरेदीसाठी बळच दिले नसल्याची स्थिती आहे.
बाजारात दर हमीभावापेक्षा खाली गेल्यास शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. त्या पार्श्वभूमीवर विविध शेतीमालाची खरेदी करून शासनाकडून बाजारात हस्तक्षेप होतो. त्याआधारे बाजार दर नियंत्रणासाठी पुढाकार घेतला जातो. राज्यात सुमारे ३९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते.
त्यामुळे या शेतीमालाच्या दरात घसरण झाल्यास त्याचा शेती अर्थकारणावर मोठा परिणाम होतो. कापूस बाजारात हस्तक्षेपासाठी पणन महासंघाची यंत्रणा होती. परंतु गेल्या काही वर्षांत शासनाकडून खरेदीसाठी बॅंक हमीच्या माध्यमातून पाठबळच दिले जात नाही. कर्मचारी भरतीदेखील करण्यात आलेली नाही. परिणामी, पणन महासंघ अखेरच्या घटका मोजत असल्याची स्थिती आहे.
दुसरीकडे यंदा कापसाचा हमीभाव ७०२० रुपये आहे. तर कापसाची खासगी खरेदी ७५०० रुपयांनी होत आहे. परंतु दरातील ही तफावत फारच कमी असल्याने यंदा पणन, ‘सीसीआय’ तसेच महासंघाला बाजारात हस्तक्षेप करावा लागणार असल्याचे जाणकार सांगतात.
त्यामुळे पणन महासंघाकडून पूर्वतयारी म्हणून शासनाला ‘सीसीआय’चा एजंट म्हणून खरेदीला मान्यता मिळावी, असे पत्र देण्यात आले आहे. त्या पत्राची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे खरेदीबाबत अनिश्चितता आहे.
२०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ अशी खरेदी पणन महासंघाने केली. यंदा हमीभाव आणि बाजार दरात जास्त तफावत नाही. परिणामी, पणन महासंघाने बाजारात हस्तक्षेप करावा, याकरिता शासनाला सीसीआय एजंट म्हणून मान्यतेसाठीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयी बैठक घेण्याचे मान्य केले आहे. तारीख अद्याप निश्चित नाही. परिणामी, खरेदीबाबत सध्या अनिश्चितता आहे.- अनंतराव देशमख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघ
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.