Agricultural Equipment Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Machinery Manufacturing : उदयनगर बनले कृषियंत्र निर्मितीचे केंद्र; रुजवली कृषियंत्र निर्मितीची संस्कृती

Agricultural Equipment : बुलडाणा जिल्ह्यातील पूर्वाश्रमीचे उंद्री आता केवळ उदयनगर झाले असे नाही, तर या गावाने कृषियंत्रांच्या निर्मितीतून विदर्भ, मराठवाडा, खानदेशात वेगळी ओळख बनवली आहे. येथे विविध प्रकारच्या कृषियंत्रांच्या निर्मितीची संस्कृती रुजविण्याचे श्रेय जाते ते पंढरी (अप्पा) गुंजकर यांना! त्यांच्या प्रेरणेने गावात २५ पेक्षा जास्त उद्योग उभे राहिले आहेत.

 गोपाल हागे

Udaynagar Machinery Manufacturing Hub : शेतीकामामध्ये यंत्राचा वापर वेगाने वाढत आहे. पूर्वी मशागतीची यंत्रे व अवजारे प्रामुख्याने परराज्यांतून येत असत. पण त्यांच्याकडून शेतकऱ्यांना विक्रीपश्‍चात सेवा मिळेलच, याची काही खात्री नसायची. उंद्री (आता उदयनगर) येथील पंढरी यशवंत गुंजकर यांनी सुरुवातीला अन्य उत्पादकांची यंत्रे आणून विकण्याचे काम सुरू केले. अशी यंत्रे आपणच का तयार करू नयेत, असा विचार गावातील पंढरी गुंजकर यांच्या मनात आला.

शेतकऱ्यांचे दोन पैसे वाचतील आणि खरेदीनंतरच्या सेवासुद्धा देणे शक्य होईल, या उद्देशाने पंढरी गुंजकर यांनी १९९७ मध्ये ‘यशवंत उद्योग’ सुरू केला. मजुरांची कमतरता भासू लागल्याने प्रत्येक शेतकरी नव्या नव्या यंत्रांच्या शोधात होता. अशा वेळी सुरू झालेल्या या व्यवसायाने चांगलाच जोम धरला. उदयनगर (उंद्री) हे अकोला-संभाजीनगर महामार्गावरील एक गाव असल्याने उदयनगरशी आजूबाजूची अनेक छोटी खेडी जोडली गेली आहे.

परिसरातील चांगली बाजारपेठ येथे वसली आहे. अशा ठिकाणी यंत्रनिर्मितीचा व्यवसाय पंढरी यांनी सुरू केला. केवळ नफ्याचा विचार न करता दर्जेदार यंत्र, चोख व्यवहार आणि ग्राहकांचा विश्‍वास टिकवण्याची काळजी ते कायम घेत आले आहेत. त्यामुळेच गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक व्यवसाय करत असूनही आजवर एकही तक्रार आली नसल्याचे ते ठामपणे सांगतात. मुळात वारकरी आणि पावलोपावली अध्यात्माची जोड देत संवाद साधणाऱ्या पंढरी गुंजकर यांना ‘अप्पाजी’ म्हणूनच ओळखले जाते.

उदयनगर बनले उद्योगनगरी

नेकीने आयुष्य जगून मिळालेली अनुभवाची शिदोरी तरुणांना वाटण्यात अप्पाजी कधी मागे राहत नाहीत. त्यांच्या उद्योगातून आजवर सहाशेवर कुशल कामगार घडले. यापैकी अनेकांनी आपापले वेगळे व्यवसाय थाटले आहेत. आज गुंजकर कुटुंबातीलच बरेच कारखानेही सुरू आहेत. येथे कार्यरत २७ कृषियंत्र निर्मितीच्या व्यवसायात प्रत्येकी ५ ते १५ कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

या व्यवसायातून वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. म्हणूनच कृषी यंत्रांच्या निर्मितीची उद्योगनगरी गावाला लौकिक मिळाला आहे. या गावात मशागतीसाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे नांगर, पेरणी यंत्र, पाळीपास (वखर), पंजी, तिर्री, कल्टीवेटर, फवारणी यंत्रे, ट्रॅक्टर ट्रॉली, टँकर, रोटाव्हेटर, बेड तयार करणारे यंत्रे, तुरीच्‍या खुट्या, हळद काढणीचे यंत्र अशी अनेक यंत्रे तयार केली जातात. येथील यंत्रांना बुलडाणा जिल्ह्यासह अकोला, वाशीम, परभणी, जालना, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांतून मागणी आहे.

अनेकांचे आश्रयदाते ‘अप्पाजी’

आज वयाच्या सत्तरीमध्ये पोचलेले अप्पाजी गुंजकर आपल्या मृदू स्वभावामुळे सर्वांचे लाडके आहेत. कपाळी टिळा, गळ्यात तुळशीमाळा, पांढरे शुभ्र धोतर-कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी आणि खांद्यावर रुमाल असा त्यांचा पेहराव. यंत्रनिर्मिती, शेती आणि गोदामांचे भाडे यातून काही रक्कम बाजूला काढून ते मोकाट जनावरांच्या विशेषतः गोपालनाचे काम करतात.

त्यासाठी टाकरखेड हेलगा येथील आपल्या शेतात गाईंसाठी गोठा, पिण्याच्या पाण्याचा मोठा हौद तयार केला आहे. आज त्यांच्याकडे ८० पेक्षा जास्त स्थानिक जातीची जनावरे आहेत. त्यांच्या संगोपनासाठी कोणतेही अनुदान त्यांनी घेतलेले नाही. त्यांची तळमळ, सात्त्विक वृत्ती, प्रयोगशीलता आणि उद्योगप्रियता अशा गुणांमुळे विविध धार्मिक, सामाजिक व कृषी विषयक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर स्थान दिले जाते.

कृषियंत्र निर्मितीत ‘उदयनगर’ बनले हब

वर्षभर तरुणांच्या हातांना काम.

दर्जेदार यंत्रांच्या निर्मितीला प्राधान्य.

अप्पाजी गुंजकरांनी रोवली मुहूर्तमेढ.

वर्षाला कोट्यवधींची उलाढाल.

पंढरी (अप्पा) गुंजकर ८४५९६३०८५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT