Amravati News: खरिपातील नगदी पीक अशी ओळख असलेल्या तुरीचे दर कमालीचे घटले आहेत. खुल्या बाजारात हमीदराच्या तुलनेत पाचशे रुपये कमी दराने तूर विकल्या जाऊ लागली आहे. सोयाबीन व कापसाचे भाव पडले असताना आता तुरीचेही दर पडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशातच केंद्राने तूर आयातीला एक वर्ष मुदतवाढ दिल्याने भविष्यात आणखी दर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयाबीन व कापसासोबत शेतकरी खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घेतो. बहुतांश शेतकरी सलग तुरीची लागवड करीत नसून सोयाबीन व कापसाच्या मधात काही तास तुरीची पेरणी करतात. दोन्ही पिकांतून आलेला तोटा तुरीच्या उत्पन्नातून भरून निघतो, असे शेतकऱ्यांचे अर्थचक्र आहे. या वर्षी तीनही पिकांनी शेतकऱ्यांना रडविले आहे.
खरिपातील नवीन तूर बाजारात दाखल झाली असून, दररोज तीन हजार पोत्यांवर येथील बाजार समितीत आवक आहे. केंद्राने तुरीला ७ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल हमीदर दिला आहे. खुल्या बाजारात नवीन तुरीला सरासरी ७ हजार ५० रुपये दर मिळत आहे. बुधवारी (ता. २९) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार १३ पोत्यांची आवक झाली.
खरेदीदारांनी नवीन तुरीला ६७०० ते ७६५० रुपये दर दिला. तुरीचे दर वधारतील ही आशा असली तरी केंद्राच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. सोयाबीन व कापसापाठोपाठ खुल्या बाजारात तुरीचेही दर पडल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक चिंता वाढली आहे.
आयातीस एक वर्ष मुदतवाढीचा परिणाम
केंद्राने तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे, गतवेळची आयातीची मुदत संपण्यापूर्वीच ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ती मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे. गेल्या नोव्हेंबरपर्यंत दहा लाख टन तूर आयात झाली असून, आणखी तूर आयात करण्याच्या केंद्राच्या धोरणाचा फटका देशी तुरीला बसणार आहे. आतापासूनच तुरीचे दर हमीदराच्या खाली आले आहेत.
शासकीय खरेदीची मागणी
तुरीचे पडते दर बघता शेतकऱ्यांना किमान हमीदर तरी मिळावा, यासाठी सोयाबीन व कापसाप्रमाणे शासकीय खरेदी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळाने तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.