Tur Import: तुरीच्या खुल्या आयातीला एक वर्षाची मुदतवाढ; बाजारावर काय परिणाम होणार?

Impact on Market: शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येत असल्याने बाजारभाव हमीभावाच्याही खाली आले आहेत. असे असताना सरकारने शुल्कमुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांची नवी तूर बाजारात येत असल्याने बाजारभाव हमीभावाच्याही खाली आले आहेत. असे असताना सरकारने शुल्कमुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत जवळपास १० लाख टन तूर आयात झाली आहे. यंदा उत्पादनही वाढीचा अंदाज असून नव्या तुरीची आवक महीनाभरात वाढणार आहे. त्यामुळे सरकारने मुदतवाढ देण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि अभ्यासकांनी व्यक्त केली. 


देशातील तुरीचे उत्पादन गेली सलग दोन वर्षे कमी झाले होते. त्यामुळे तुरीच्या भावात वाढ झाली होती. मागील हंगामात देशात केवळ ३४ लाख टन तुरीचे उत्पादन झाले होते. तर देशाला वर्षाला ४५ ते ४६ लाख टन तूर लागते. तुरीचा उच्चांकी भाव मागील हंगामात १२ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचला होता. तुरीचे वाढते भाव लक्षात घेता सरकारने तुरीच्या आयातीवरील शुल्क कमी करून शुल्कमुक्त आयात सुरु केली. तसेच आयातीवर कोणत्याही प्रकारचे बंधन ठेवण्यात आले नाही. 

Tur
Tur Procurement : तूर खरेदीचेही वाजले तीन तेरा

सरकारने ३१ मार्च २०२५ पर्यंत तुरीच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती. पण ही मुदत संपण्याधीच सरकारने पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ दिली. सरकारने तुरीची शुल्कमुक्त आयात ३१ मार्च २०२६ पर्यंत कायम ठेवली आहे. सरकारने देशातील तुरीची पुरवठा वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण यंदा देशातील तुरीची लागवड वाढली. त्यामुळे उत्पादनही वाढण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत शुल्कमुक्त तूर आयातीला परवानगी देण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

Tur
Tur Price : दबावात असलेल्या तुरीच्या दरात सुधारणा

उत्पादनाचे अंदाज

गेल्या हंगामात देशात ३४ लाख टन उत्पादन झाले होते. पण यंदा देशातील तूर लागवड जवळपास १४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे उत्पादनही अधिक होण्याची शक्यता आहे. सरकारने आपल्या पहिल्या अंदाजात यंदा ३५ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज दिला. मात्र प्रत्यक्षात उत्पादन ३८ लाख टनांच्या दरम्यान पोहचू शकते, असा अंदाज व्यापारी आणि उद्योगांनी व्यक्त केला. केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सचिवांनीही उत्पादन जास्तच राहील, असा अंदाज दिला आहे. 

आयातीचा लोंढा

सरकारने तुरीची आयात खुली केल्यानंतर देशात तूर आयातीचा लोंढाच आला. चालू आर्थिक २०२४-२५ वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांध्येच देशात जवळपास १० लाख टन तुरीची आयात झाली. २०२३-२४ च्या संपूर्ण आर्थिक वर्षात ७ लाख ७१ हजार टन आयात झाली होती. म्हणजेच तुरीची आयात यंदा विक्रमी पातळीवर पोचणार आहे. आधीच उत्पादन जास्त आणि आयातही वाढल्याने शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देण्याची गरज होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरावर काय परिणाम होणार? 

देशात यंदा उत्पादन वाढण्याचा अंदाज असला तरी मागील हंगामात शिल्लक तूर खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे आवकेच्या काळात तुरीचे भाव हमीभावाच्या खाली राहीले तरी मार्चपासून दरात सुधारणा दिसू शकते. पण ज्या शेतकऱ्यांना मार्चच्या आधी तूर विकायची आहे त्यांनी सरकारला हमीभावाने तूर घालावी. यंदा तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. मार्चनंतर बाजारात तूर आधी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांची पातळी दाखवू शकते. नंतर पुन्हा दरात ५०० ते ८०० रुपयांची तेजी दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. तरीही शेतकऱ्यांनी बाजारातील घडामोडींकडे लक्ष ठेऊन असावे, असे आवाहनही केले आहे. 

तुरीचा बाजार उच्चांकी दरावरून ५ हजाराने कमी झाला. सरकारने आयातीला मुदतवाढ दिली तरी त्याचा बाजारावर परिणाम होणार नाही. सध्या बाजारात चांगल्या मालाचे भाव ७५०० ते ७८०० रुपये आहे. पुढील दोन महिन्यांनंतर यात आणखी एक हजार ते दीड हजारांची वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावे. 
दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्लेषक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com