Karvand fruit benefits : करवंद हे काटेरी व सदापर्णी झुडूप अॅपोसायनेसी कुळातील असून, त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. भारतातील वनांमध्ये विशेषत: शुष्क व खडकाळ भागांत आढळते. याशिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. याची उंची सुमारे २ मीटरपर्यंत असते.
- खोड ः आखूड असून फांद्या व लांब काटे द्विभक्त असतात.
- पाने ः साधी, समोरासमोर, लंबगोल, चिवट, गुळगुळीत आणि चकचकीत दिसतात. फूल किंवा फळ तोडल्यास पांढरा चीक येतो.
- फुले ः पांढरी, अपछत्राकृती व लव असलेली असतात.
- फळे ः करवंदाची फळे छोट्या गोल आकाराची, काळ्या रंगाची असतात. करवंदामध्ये शरीराला आवश्यक अशी अनेक पोषण तत्त्वे आहेत. ही फळे कोकण भागात रानमेवा म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत.
करवंदामधील औषधी गुणधर्म
- करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्वचेचे विकार करवंदांच्या सेवनाने दूर होतात. हृदयविकारामध्ये करवंदांचे सेवन उपयुक्त ठरते. यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
- करवंद हा रानमेवा असून, नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतो.
- जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल, तर रोज मूठभर करवंदे खावीत. रक्ताची कमतरता भरून येण्यास मदत होईल.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
- करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिड असून, उष्णतेमुळे होणार त्रास कमी करते. उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह कमी करण्यासाठी करवंदांचे सरबत उपयोगी ठरते.
- मळमळ, उलटी अशा त्रासामध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
- करवंदांची पानेही औषधी असून, मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
- नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर असून, हाडांच्या विकारांमध्ये उपयोगी ठरतात.
करवंद हे हंगामी फळ आहे. वर्षभर करवंदांचे लाभ मिळविण्यासाठी त्यापासून लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे. त्याच प्रमाणे
करवंद फळांपासून मावा, सुकी करवंदे, मुखवास, चटणी, सिरप, जाम, करवंद वडीही बनवता येते. परिसरामध्ये करवंदांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्यास असे पदार्थ तयार करून विक्री करणे शक्य आहे. हे काम वैयक्तिक, बचत गटाकडून करता येते. त्याची विक्री परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे यांच्या काउंटरवरून करणे शक्य आहे.
करवंदाचे अन्य उपयोग
करवंद ही एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय वनस्पती आहे. मुख्य पिकापेक्षाही मुख्यतः कुंपणासाठी त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळे गुरे खात नाहीत. करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते. बियांपासून रोपे तयार करून अभिवृद्धी करता येते.
करवंद मुरंबा
घटक : एक किलो करवंदे (बिया काढलेली), साखर किंवा गूळ ७५० ग्रॅम
कृती ः प्रथम करवंदे अर्धा तास पाण्यात भिजत घालून मग स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यातील बिया काढून ती व साखर मोजण्याच्या कपाने मोजून घ्यावीत. करवंदांच्या गोडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करावे. मध्यम आचेवर दोन्ही एका पॅनमध्ये घेऊन सतत हलवत घट्टसर असा मुरंबा बनवून घ्यावा. तयार झालेला मुरंबा थंड झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ व कोरड्या बरणीमध्ये हवाबंद करावा. वर्षभर हवा तेव्हा खाता येतो.
शुभांगी वाटाणे देशमुख, ९९२१३२९०९४
(प्रमुख गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.