कोरडवाहू जमिनीमध्ये करवंद लागवड

हलक्या, मुरमाड, डोंगरी भागात कमी खर्चामध्ये येणारे पीक म्हणून शेतामध्ये किंवा बांधावर करवंद लागवड करावी. फळामध्ये लोह, प्रथिने, खनिजे, शर्करा, चरबी, कॅल्शिअम व जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त आहे.
कुंपणासाठी करवंद लागवड.
कुंपणासाठी करवंद लागवड.
Published on
Updated on

हलक्या, मुरमाड, डोंगरी भागात कमी खर्चामध्ये येणारे पीक म्हणून शेतामध्ये किंवा बांधावर करवंद लागवड करावी. फळामध्ये लोह, प्रथिने, खनिजे, शर्करा, चरबी, कॅल्शिअम व जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त आहे. करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय फळपीक आहे. शेताभोवती सजीव कुंपण करून मुख्य पिकाव्यतिरिक्त अधिक उत्पन्न मिळण्याबरोबर जंगली किंवा मोकाट प्राण्यांपासून शेताचे संरक्षण होते. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानात योग्य वाढ होते. मुसळधार पाऊस आणि पाणी साचलेली जमीन फळपिकास उपयुक्त नाही. लागवड वालुकामय चिकण माती, जांभा, वाळू व काळी माती असलेल्या जमिनीमध्ये केली जाते. खडकाळ, मुरमाड, पडीक, कातळ आणि हलक्या जमिनीत सुद्धा चांगले वाढते. चांगल्या वाढीसाठी सखोल, सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. सामू ५ ते ८ असावा.  फळाच्या आणि गराच्या रंगावरून जाती ठरविल्या जातात. कोकण बोल्ड ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागवडीसाठी याची शिफारस आहे. फळे उत्कृष्ट दर्जाची, १४-१५ ग्रॅम वजनाची, गोलाकार आकार, जास्त काळ टिकणारी, घोसाने येणारी, जास्त गराचे प्रमाण असलेली व गडद काळ्या रंगाची असतात. केंद्रीय शुष्क प्रदेशीय संशोधन संस्थेने मरू गौरव ही नवीन व जास्त उत्पादनक्षम जात विकसित केली आहे.  अभिवृद्धी 

  • सामान्यतः बियाण्याद्वारे अभिवृद्धी करतात. याशिवाय जून फांद्यांचे छाट कलम,गुटी कलम आणि बडिंग कलमाद्वारे अभिवृद्धी करतात. 
  • बिया २४ तास शेण स्लरीमध्ये किंवा जिबरेलिक ॲसिडमध्ये बुडवून ठेवल्याने उगवण क्षमता चांगली वाढते. 
  • लागवड

  • ४५ × ४५ × ४५ सेंमी आकाराचे खड्डे करावेत. त्यामध्ये माती, कुजलेले ५ किलो शेणखत, १०० ग्रॅम निंबोळी खत आणि २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरावे.
  • सजीव कुंपणासाठी एका ओळीत, नागमोडी किंवा जोडओळीने २ ते ३ फुटांवर रोपांची लागवड करावी.  
  • खाण्याच्या जातीची लागवड ३ × ३ मीटर किंवा ६ × ३ मी. अंतरावर करावी. 
  • कलम लावल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात. प्रति कलमास सुमारे २० लिटर पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. दुसऱ्या वर्षापासून कलमास पाणी देण्याची आवश्यकता नाही.
  • खत व्यवस्थापन 

  • सजीव कुंपण म्हणून लावलेल्या रोपास जास्त खत लागत नाही. प्रत्येक वर्षी जून- जुलै महिन्यात १० ते १५ किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे. 
  • तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षापासून शिफारस केलेली मात्रा प्रत्येक कलमास जुलै-ऑगस्ट महिन्यात द्यावी. २५ किलो शेणखत, १०० ग्रॅम युरिया आणि ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत द्यावे. यामुळे जोमदार वाढ व जास्त उत्पादन मिळते.
  • जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये १० लिटर देशी गायीचे गोमूत्र रिंग पद्धतीने किंवा ठिबकमधून दिल्यास फूल आणि फळ धारणा लवकर व जास्त होण्यास मदत होते.
  • छाटणी 

  •   हे झाड काटेरी असल्यामुळे एका किंवा दुहेरी फांदीवर योग्य आकार द्यावा. 
  •   फळधारण केलेल्या झाडांना साधारणपणे कोणत्याही छाटणीची आवश्यकता नसते. परंतु बागेमध्ये किंवा शेतामध्ये ये-जा करण्यास अडचण होऊ नये यासाठी चौथ्या किंवा पाचव्या वर्षापासून दर वर्षी फळे काढणीनंतर मे- जून महिन्यात काही प्रमाणात फांद्यांची छाटणी करावी. रोगट व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • पाणी नियोजन

  • या पिकास पाण्याची गरज खूप कमी आहे. परंतु नव्याने लावलेल्या झाडांना पाणी द्यावे. पावसाळ्यात लावलेल्या रोपांना जास्त पाण्याची गरज नसते. तथापि, हिवाळ्यात १५ ते २० दिवसांनी आणि उन्हाळ्यामध्ये ७ ते १० दिवसांनी पाणी दिल्याने फूल व फळधारणा योग्य होते.
  •  व्यापारीदृष्ट्या लागवड केलेल्या बागांमध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब करावा.
  • तोडणी आणि उत्पादन 

  •  तीन वर्षांनी बागेपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. झाड जसजसे मोठे होत जाईल, तसतशी उत्पादनात वाढ होते.
  • प्रत्येक वर्षी फळधारणा होते. कोकण किंवा घाट माथ्यावरती फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फूल बहर येतो. एप्रिल किंवा मेमध्ये फळे पिकण्यास सुरुवात होते. मराठवाडा व विदर्भात सामान्यपणे एप्रिलनंतर फुलधारणा होऊन जुलै-ऑगस्टमध्ये फळे येतात.
  • सर्व फळे साधारणपणे एका वेळी परिपक्व होत नाहीत. म्हणून तोडणी साधारणपणे २ ते ४ वेळा करावी. पिकलेली फळे नाशीवंत असतात. 
  • एकरी सुमारे चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. 
  • औषधी गुणधर्म

  •  शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. 
  •  कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांसाठी उपयुक्त. 
  • हृदय विकारामध्ये अतिशय गुणकारी. 
  • फळात धाग्याचे भरपूर प्रमाण. 
  •  नियमित सेवनाने छातीत पित्तामुळे होणारी जळजळ कमी होण्यास मदत. 
  • लोहाचे प्रमाण ३९ टक्के आहे. जीवनसत्त्व ‘क’चा योग्य प्रमाणात समावेश.
  •  फळे लोणचे बनवण्यासाठी उपयुक्त. परिपक्व फळांमध्ये पेक्टिनचा समृद्ध स्रोत.
  •  फळांपासून जॅम, जेली, स्क्वॅश, सरबत आणि चटणीनिर्मिती. 
  • फळांमध्ये अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, सॅपोनिन्स आणि मोठ्या प्रमाणात कार्डियाक ग्लायकोसाइड्स, ट्राय-टेरपेनोइड्स, फिनोलिक संयुगे आणि टॅनिन असल्याने औषध उद्योगामध्ये वापर.
  • जातीनिहाय वैशिष्ट्ये पंत सुवर्णा :  गर ८८.२५%, टीएसएस ३.८३ %, उत्पादन  २२ किलो प्रति झाड पंत मनोहर : गर ८८.२८ %, टीएसएस ३.९२ %, उत्पादन २७ किलो प्रति झाड  पंत सुदर्शन : गर ८८.४८ %, टीएसएस ३.४५, उत्पादन २९ किलो प्रति झाड कोकण बोल्ड : मोठी फळे (१२-१५ ग्रॅम), घोसाने लागतात, फळाची प्रत उत्कृष्ट, गराचे प्रमाण, ९२ %, गोडी जास्त आणि कमी आम्लता सीएचईएस-के-२ :  गर ८८.४८ %, टीएसएस ६.१० %, उत्पादन १० किलो प्रति झाड सीझेडके-२०११:  गर ८८.४८ %, टीएसएस९.४ %, जीवनसत्त्व क ३५.८८ मिलिग्रॅम/१०० ग्रॅम   सीझेडके-२०२२ :  टीएसएस ८.५ %, जीवनसत्त्व क ३७.८० मिलिग्रॅम/१०० ग्रॅम सीझेडके-२०३१ : टीएसएस  ८.७ %, जीवनसत्त्व क ३७.४० मिलिग्रॅम/१०० ग्रॅम सीआयएसएच केआर-११ :  टीएसएस ६.१० %,  मरू गौरव :  चांगले उत्पादन देणारी जात, गर ८८.५० %, टीएसएस ९.४० ब्रीक्स, उत्पादन ४० किलो प्रति झाड - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com