Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : कांदा पीक जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ

Nashik Drought : पाण्याअभावी जिल्ह्यात लागवडी धोक्यात; शेतकरी अडचणीत

मुकुंद पिंगळे

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : नाशिक ः कमी पर्जन्यमान, त्यात कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी पाणीटंचाई, अशा प्रतिकूल स्थितीत लेट खरीप कांदा लागवडी झाल्या, तर उन्हाळ कांदा लागवडी सुरू होत्या. मात्र पाऊस व गारपिटीने रोपांची दाणादाण उडविली. लेट खरीप व उन्हाळ कांदा लागवडी अडचणीत सापडल्या. तरीही शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडी पूर्ण केल्या.

परंतु विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर वळणावर आहे. कांदा जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोरगरीब शेतकरी पैशांअभावी पाणी विकत घेऊ शकत नसल्याने कांदा लागवडी सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मागील महिन्यात उन्हाळ व खरीप कांद्याची आवक कमी असल्याने प्रतिक्विंटल ३,५०० रुपये दर होते. मात्र केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे दर निम्म्यावर आले. तर आता अनेक शेतकऱ्यांच्या शेतात विहिरींना पाणी नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणी विकत घेऊन कांदे जगविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

सिन्नर, देवळा, मालेगाव, येवला व चांदवड तालुक्यांतील पाणीटंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रति टँकरला ३००० ते ४००० हजार रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे दुसरा पर्याय नसल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

लागवडीवर परिणाम
मागील वर्षी २०२२-२३ हंगामात लेट खरीप कांद्याची लागवड ५१ हजार १२१ हेक्टर झाली होती. यंदा ती ४८ हजार ४८१ हेक्टरवर झाली. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २,६४० हेक्टर क्षेत्र घटले. तर २०२२-२३ हंगामात रब्बी उन्हाळ कांद्याची लागवड २ लाख २० हजार ८६४ हेक्टर झाली होती. तर मंगळवार (ता. २६)अखेर ही ५८ हजार ४५ हेक्टर झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ती केवळ २६ टक्के आहे. अंतिम लागवड स्थिती काय राहते, हे चित्र पुढील महिन्यात स्पष्ट होईल.

सप्टेंबरमध्ये लेट खरीप कांद्याची लागवड केली. मात्र कांदा पोसण्याच्या अवस्थेत पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे कांदा जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली. २० हजार लिटरच्या प्रति टँकरला ३,००० ते ३,५०० रुपये मोजावे लागतात. त्यातच निर्यातबंदी झाल्याने भाव नाहीत. मात्र सरकारला समस्यांकडे पाहायला वेळ नाही.
- विजय जायभावे, कांदा उत्पादक, गोंदे, ता. सिन्नर, जि. नाशिक

येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. लाल कांदा कसाबसा शेतकऱ्यांनी काढला आहे, तर काही ठिकाणी तोही हाती आला नाही. त्यामुळे उन्हाळा कांद्याचे उत्पादन होणार नाही.
- संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, साताळी, ता. येवला, जि. नाशिक

देवळा तालुक्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. कांद्यासाठी पाणी विकत आणावे लागत आहे. मात्र ज्यांच्याकडे पाणी नाही आणि भांडवल नाही त्यांनी लेट खरीप व उन्हाळ कांदा लागवडी सोडून दिल्या आहेत.
- संदीप मगर, कांदा उत्पादक, वाखारी, ता. येवला, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT