Bhor Farmer Story
Bhor Farmer Story Agrowon
ॲग्रो विशेष

Bhor Farmer Story : शेतकरी मित्रांच्या प्रयत्नातून गावाला मिळाला तीन कोटींचा रस्ता, पूल

मनोज कापडे

पुणे ः भोर तालुक्यातील पश्चिमेच्या दुर्गम (Bhor Remot Area) भागात असलेल्या चांदवणे गावाला (Chandavane Village) जगाच्या वाहतूक नकाशावर नेण्यासाठी चिंतामण धोंडिबा सपकाळ आणि दत्तू धोंडिबा शिंदे हे दोन शेतकरी मित्रांनी (Farmer Friends) दिलेला लढा चर्चेचा बनला आहे.

या जोडीने वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नातून गावात चक्क तीन कोटी रुपयांचा पूल बांधला गेला असून दोन कोटी रुपयांचा नवा रस्ता बांधला जात आहे. एक दिवस गावात एसटी आणण्याचे स्वप्न या मित्रांनी उराशी बाळगले आहे.

भाटघर धरणाच्या जलाशयामागील दुर्गम भागात चांदवणे गाव वसलेले आहे. या गावाला ५० वर्षांपूर्वीपर्यंत पूल नव्हता. शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून वेळवंडी नदी पार करीत घरी जावे लागत होते.

१९८४ मध्ये तत्कालीन सरपंच हरिभाऊ बोरेकर यांनी त्यावेळेचे मंत्री अनंतराव थोपटे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पादचारी लोखंडी पूल बांधला. मात्र, या अरुंद पुलावरून एका वेळी एकालाच केवळ पायी जाता येत होते. त्यामुळे गावात गाडी पोहोचत नव्हती.

शेतकरी श्री. सपकाळ म्हणाले की, गावात गाडी येत नसल्याने आम्हाला डोक्यावर बोजे घेऊन बाजाराला जावे लागत होते. शेतकरी आजारी पडल्यास झोळी करून दवाखान्यात जावे लागेल. त्यामुळे मी वाहतुकीच्या मोठ्या पुलासाठी पाठपुरावा सुरू केला. प्रथम सर्व शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना एक केले.

त्यांना सामुहिक पाठपुरावा कसा करावा लागेल हे समजावून सांगितले. बैठका घेतल्या. वारंवार अर्जफाटे सुरू केले. विशेष म्हणजे आमदार संग्राम थोपटे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले व त्यातून गावासाठी तीन कोटी रुपयांचा पूल उभा राहिला.

नदीवर नवा पूल झाला. मात्र, या पुलाला जोडणारे रस्तेच दोन्ही बाजूंनी शासनाने बांधले नाहीत. त्यामुळे सपकाळ व त्यांचे मित्र दत्तू शिंदे यांनी पुन्हा रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी दोघे जण वणवण भटकत राहिले.

त्यातून शेतीकडेही दुर्लक्ष झाले. रस्त्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे शासन दाद देत नव्हते. सरकारी भूसंपादनाची किचकट प्रक्रिया वर्षानुवर्षे चालेल, याची जाणीव या दोघा शेतकरी मित्रांना झाली. त्यातून त्यांनी पुन्हा गावकऱ्यांचे प्रबोधन सुरू केले.

‘‘आम्ही रस्त्यासाठी खासगी जागा मोफत उपलब्ध करून दिल्या. मात्र, नदीच्या पलीकडचा एक शेतकरी रस्त्यासाठी जागा देत नव्हता. आम्ही त्याच्याशी भांडलो नाही. उलट त्याच्याकडे पाया पडलो व मदतीची अक्षरशः भीक मागितली.

तो शेतकरीही उदार झाला व त्याने तत्काळ जमीन दिली. रस्त्यासाठी जागा ताब्यात आल्यानंतर आम्ही पुन्हा पाठपुरावा सुरू केला.

यावेळीदेखील आमदार थोपटे आमच्या मदतीला धावले. त्यांनी शासन दरबारी आमची व्यथा माडंली व दोन कोटींचा रस्ता मंजूर करून आणला,’’ अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

चांदवणे गावात आता नव्या पुलासाठी रस्ता बांधला जात आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. सपकाळ व शिंदे या जोडीने आता गावात एसटी आणण्याचे स्वप्नं उराशी बाळगले आहे. ‘‘वयाच्या १६ व्या वर्षीपासून मी गावात सामाजिक काम करतो आहे.

४० वर्षांपासून ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. पण, इच्छा असूनही कधीच सरपंचपद मिळाले नाही. परंतु, गावाने माझी पुतणी छाया मुकुंद सपकाळ हिला सरपंच केले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे. खूप समस्या येतात; पण गावासाठी मी यापुढेही झटत राहील,’’ असे सपकाळ यांनी सांगितले.

गावाच्या समूहशक्तीतून साकारली ही कामे

- तीन कोटींचा नवा पूल

- दोन कोटींचा नवा रस्ता

- २५ लाखांच्या जलवाहिनीचे काम सुरू

- गावात पाण्यासाठी दोन स्वतंत्र विहिरी

- जलसंधारण, मृद्संधारणाची कामे

- धान्य वाटप, बांबू लागवड, फळबागांची कामे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT