Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : दुष्काळी सोनोरीची सोनेरी वाटचाल

गणेश कोरे

गणेश कोरे

Sonori Village Story : काही वर्षांपूर्वी दुष्काळी असलेले पुणे जिल्ह्यातील सोनोरी (ता. पुरंदर) गाव जलसंधारणाच्या सामूहिक कामांमधून पाणीदार होत आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्याचा ताळेबंद व त्याआधारे वापर करून अंजीर, सीताफळ आदी फळबागा शेतकऱ्यांनी फुलविल्या आहेत. अटल भूजल योजनेत सहभाग होत तीस लाखांचा पुरस्कार मिळवीत दुष्काळी सोनोरीची सोनेरी वाटचाल सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सोनोरी हे अंजीर, सीताफळ आणि पेरूसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या या गावात सुमारे ४५० हेक्टरवर फळबागा व अन्य शेती आहे. यात अंजीर सुमारे २०० हेक्टर, तर सीताफळ १६० हेक्टर आहे.

पूर्वी गावाला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायचे. एकत्र येऊन हा प्रश्‍न सोडविण्याची आवश्‍यकता ग्रामस्थांना वाटू लागली. विचारमंथनातून जलसंधारणाची कामे करण्यावर एकमत झाले. ‘सकाळ माध्यम समूहा’ने देखील या उपक्रमाला साथ देण्याची तयारी दर्शविली.

सातत्याने बैठका घेत जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. नव्या विहिरी आणि विंधन विहिरी खोदण्यावर बंदी घालण्यात आली. सन २०२१ मध्ये ओढा खोलीकरण होऊन पावसाचे पाणी साठण्यास व जिरण्यास प्रारंभ झाला.

बंधाऱ्यांची शृंखला उभारली

ओढा खोलीकरणाच्या टप्प्यानंतर ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा उपक्रम सुरू झाला. डोंगरापासून ते गावातील विविध टप्प्यांपर्यंत ओढ्यावर टप्प्याटप्प्याने २७ बंधारे बांधण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून विहिरी आणि विंधन विहिरींनी पाणी टिकू लागले.

पावसाळ्यानंतर पुढे डिसेंबरच्य कालावधीत पाण्याची समस्या पूर्वी भेडसवायची. आता ती नाहीशी झाली. पाणी उपलब्ध होऊ लागल्याने बागा बहर धरू लागल्या. ‘भारत फोर्ज’ उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व निधीतून गाव विकास योजनेअंतर्गत सार्वजनिक पाणी योजनेवर जय मल्हार जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले.

त्यातून गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळू लागले. कंपनीकडून जिल्हा परिषदेची अत्याधुनिक शाळा उभारण्यासाठीही मदत झाली. अन्य कंपन्यांनीही मदतीचा हात पुढे करत शाळेला स्वच्छता गृह आणि शुद्ध पाणी यंत्रणेची सुविधा उपलब्ध करून दिली.

शिवार झालेय हिरवेगार

प्रसिद्ध मल्हारगडाच्या कुशीत सोनोरी गाव वसले आहे. त्या अनुषंगाने फळबागा, भाजीपाला शेती विकसित करण्यासह पर्यटन विकासाचेही गावाचे प्रयत्न सुरू आहेत. गडावर पर्यटकांची पावले वळत आहेत पण पडझड झाली असल्याने त्यांची संख्या कमी आहे.

गडाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्‍त्याचे काम झाले आहे. तसेच गावपरिसराच्या पर्यावरणपूरक विकासासाठी मागील चार वर्षांत सामाजिक संस्था आणि उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून ५० हजार झाडे लावण्यात आली आहेत.

त्यामुळे शिवार हिरवेगार झाले आहे. गावपरिसरात वन विभागाची जागा आहे. काही ठिकाणी माळरान आहे. गावातील भूगर्भातील पाणीसाठा टिकण्यासाठी माळरान संवर्धनाबरोबरच वन विभागाच्या क्षेत्रावर देवराई करण्याचे प्रयत्न असल्याचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भारत मोरे यांनी सांगितले.

पाण्याचा पाझर

अटल भूजल योजनेंतर्गत गावच्या भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ओढ्यात सलग २० रिचार्ज पॉइंट करण्यात आले आहेत. यात १०० फुटी कूपनलिका व त्यामध्ये सछिद्र पाइप वापरण्यात आले आहेत.

या पाईप्समध्ये वाळू, माती, खडीचे थर देण्यात आले असून तोंडाशी दगडी बांध व जाळीने बंदिस्त केले आहे. यामुळे ओढ्याला आलेले पाणी वाहून न जाता त्याचा पाझर होऊन ते
भूगर्भात मुरणार आहे. परिसरातील विहीरी आणि कूपनलिकांना त्याचा फायदा होणार आहे.


तीनशे शेततळ्यांचे गाव

गावाने पाण्याचा ताळेबंद मांडला. तीनशे शेततळी असलेले गाव म्हणूनही सोनोरी ओळखले जाऊ लागले आहे. पाण्याच्या शाश्‍वत उपलब्धतेमुळे सीताफळ, अंजिराच्या बागा फुलल्या आहेत.

अंजिराचा उन्हाळी हंगाम (मीठा बहर) घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. सर्वाधिक शेततळ्यांचे उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल योगेंद्र गिरासे यांचा २०२३ मध्ये उत्कृष्ट कृषी सहाय्यक म्हणून कृषी आयुक्तांच्या हस्ते गौरव झाला आहे.

योगेंद्र गिरासे, ९०६७७६७३२८

प्रतिक्रिया

माझी तीन एकर शेती आहे. गावात जलसंधारणाची कामे झाल्याने विहिरींना पाणी टिकत आहे.
त्यामुळे अंजिराचा उन्हाळी बहर घेण्यासह वाटाणा, भुईमूग, पावटा, कोथिंबीर अशी पिकांमध्ये विविधता ठेवणे शक्य झाले आहे.
- अप्पा दिनकर झेंडे

माझी सात एकर शेती आहे. अंजीर, सीताफळ यासह वाटाणा आणि भाजीपाल्यांची पिके घेतो. मी उपसा सिंचन योजनेत सहभागी झालो असून दोन शेततळी उभारली आहेत. त्याचा
उपयोग शाश्‍वत सिंचनासाठी होऊन शेती बागायती झाली आहे.
- राजेंद्र भगवान काळे

अटल भूजल योजनेची फलश्रुती २०२२ मध्ये दिसून आली. सन २०२३ मध्ये पाऊस झाला नाही.
पण झालेल्या कामांमुळे २०२२ मध्ये जो पाऊस चांगला मुरला त्याचे पाणी मागील वर्षी दीर्घकाळ
पुरले. अंजिराचा उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना घेता आला. पुढील काळात डोंगरावर समतल चर आणि सीसीटी बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. आता लवकरच गाव जलस्वयंपूर्ण होईल असा विश्‍वास आहे.

संतोष काळे, ९१४५७२५५७०
सरपंच, सोनोरी

माझ्या सरपंचपदाच्या काळात गावाला अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हा पातळीवरील द्वितीय क्रमांकांचा ३० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला याचा अभिमान आहे. गाव भूजल समृद्ध करण्यासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांची चांगली साथ मिळाली. भविष्यातील समृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.

भारत शांताराम मोरे, ७५८८५९३३५७
माजी सरपंच व विद्यमान सदस्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT