Sharad Pawar Baramati : आज ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर हे तंत्रज्ञान इतर पिकांमध्ये येईल. त्यातून शेती क्षेत्राचा कायापालट होईल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता.१५) व्यक्त केला. बारामती येथील ऊसाच्या शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या परिसंवादात पवार बोलत होते. यावेळी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सकाळ समूहाचे प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरही चिंता व्यक्त केली. पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या होत्या. आता पुन्हा शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. यामध्ये सर्व संस्थांसह केंद्र-राज्य सरकारला लक्ष घालावं लागेल, असंही पवार म्हणाले. तसेच ऊस उत्पादकांच्या समस्यांकडे पवारांनी लक्ष वेधलं.
पवार म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर साखर उद्योगात सुरू झाला आहे. ऊस उत्पादकांसमोर लागवडीचा कालावधी, योग्य वाणांची निवड, जमिनीचं बिघडतं आरोग्य, खत-औषधांचा वापर, पाण्याचा वापर, कीड रोगांचा प्रादुर्भाव, साखरेचा उतारा कमी होणं, हार्वेस्टरच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे वाढता उत्पादन खर्च वाढत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही" असं प्रतिपादन पवारांनी केलं.
विस्माचे अध्यक्ष ठोंबरे यांनी राज्यातील साखर उद्योगाच्या समस्यासह ऊस उत्पादकता वाढीकडे लक्ष वेधलं. राज्यातील ऊस उत्पादनाकडे गांभीर्याने पाहावं. बेण्याची फेरपालट करणे, ठिबकचा वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या त्रिसूत्रीमधून महाराष्ट्र येत्या पाच वर्षात ऊस शेतीचं चित्र बदलेलं, असा विश्वास विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, "मागील काही काळात ऊसाची उत्पादकता वाढली नाही. त्यामुळे ऊसाची उत्पादकता वाढवणे गरजेचं आहे. त्यासाठी सर्वसमावेशक विकास घडवून आणावा लागेल. सध्या मराठवाड्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सरासरी ८१ दिवसांवर आला आहे. ऊसाच्या अभावी कारखाने बंद होत आहेत. ऊस उत्पादकतेवर परिणाम होत आहे. ऊसाची उत्पादकता सरासरी ८८ टन होती. आता ७० ते ७२ प्रति टनांवर आली आहे." असंही ठोंबरे म्हणाले.
तर कृषी आणि वाणिज्य मंत्रालयाने एकत्र काम केलं पाहिजे. तरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. दरम्यान, राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.