Mahavikas Aghadi Agrowon
ॲग्रो विशेष

Election Result 2024 : महाविकास आघाडीची मुसंडी

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला पाया भक्कम करत कमी जागा लढवून अधिक जागा निवडून आणल्या.

Team Agrowon

Mumbai News : दोन पक्षांतील फूट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका, प्रचार रॅली आणि भाजपच्या आक्रमक प्रचाराला निष्प्रभ करत महाविकास आघाडीने तब्बल २९ जागांवर विजय मिळवत महायुतीला चितपट केले. ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला १८ जागांवर आणत लगाम घातला. तर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला पाया भक्कम करत कमी जागा लढवून अधिक जागा निवडून आणल्या.

महाविकास आघाडीने दिलेल्या कडव्या लढतीत भाजपच्या तीन राज्यमंत्र्यांना पराभव पत्करावा लागला तर २१ विद्यमान खासदारही पराभूत झाले. सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि शिवसेनेतील जागावाटपाच्या वादानंतर बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करत विजय मिळविला.

यवतमाळ, हिंगोली, नाशिक, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण, शिर्डी आणि धाराशिव या मतदारसंघात शिवसेनेने बाजी मारत जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बारामती, दिंडोरी, भिवंडी, शिरूर, नगर, माढा या सात मतदारसंघांत विजय संपादन केला.

काँग्रेसने सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवत नंदूरबार, अमरावती, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या मतदार संघात झेंडा फडकावला. कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांनी १ लाख ४६ हजार ८९० हजार मतांनी खासदार संजय मंडलिक यांचा पराभव केला. तर सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी ७८ हजार २५ मतांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात ॲड. उज्वल निकम यांनी सकाळी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत कायम ठेवली होती. २३ व्या फेरीपर्यंत निकम यांना ४१ हजार ८३७ मताधिक्य होते. मात्र, शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये गायकवाड यांनी मुसंडी मारत निकम यांना १३ हजार ६५ मतांनी पराभूत केले. जालन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना नवख्या कल्याण काळे यांनी ५६ हजार ८२० मतांनी पराभूत केले.

मराठा आरक्षण लढ्यात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मंगेश साबळे यांनी १ लाख १६ हजार २३० मते घेतली. चंद्रपूर मतदार संघात भाजपचे दिग्गज नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करीत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विजयश्री खेचून आणला. अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उद्धव ठाकरे यांना आव्हान देत त्यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवणाऱ्या राणा यांना काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी धूळ चारली. येथे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या दिनेश बूब यांनीही आव्हान दिले होते मात्र, ते निष्प्रभ ठरले.

भाजपला झटका

भाजपने ११ जागांवर विजय मिळविला. नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी विकास ठाकरे यांचा १ लाख ३४ हजार २५७ मतांनी पराभव केला. जळगावमध्ये स्मिता वाघ आणि रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी अनुक्रमे २ लाख ४५ हजार आणि २ लाख ७१ हजार मतांनी विजय मिळवून खडसे यांचे महत्त्व अधोरेखित केले. अकोल्यात प्रथमपासून काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर होते. मात्र, ही आघाडी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये मोडून काढत भाजपच्या अनुप धोत्रे यांनी ३७ हजार ३५८ मतांनी विजय पटकावला.

धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी आघाडी टिकवून ठेवली मात्र, अखेरच्या काही फेऱ्यांत सुभाष भामरे यांनी २९ हजार मतांनी विजय मिळवला. पालघरमध्ये ठाकरे गटाच्या भारती कामडी यांचा हेमंत सावरा यांनी १ लाख ८३ हजार मतांनी पराभव केला. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्यात कडवी लढत झाली. या लढतीत बजरंग सोनवणे यांनी आघाडी टिकवून ठेवली. मात्र मुंडे यांनीही अखेरच्या टप्प्यात आघाडी घेत १६ हजार हून अधिक मताधिक्य कायम ठेवले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव करून कोकणात पाया भक्कम केला. तर साताऱ्यात अनपेक्षित आघाडी घेत उदयनराजे भोसले यांनीही विजय संपादन केला.

वंचित बहुजन आघाडी निष्प्रभ

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह अन्य पक्षांच्या १० हून अधिक जागांवर प्रभाव पाडत पराभव करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत मतदारांनी पूर्ण बेदखल केले. अकोला लोकसभा मतदार संघात प्रकाश आंबेडकर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्री. आंबेडकर यांना २ लाख ७३ हजार ५० मते मिळाली. काँग्रेसच्या अभय पाटील यांना ४ लाख ११ हजार ४०६ तर विजयी उमेदवार अनुप धोत्रे यांना ४ लाख ५० हजार १२८ मते मिळाली. आंबेडकर यांना तब्बल १ लाख ७७ हजार ७८ मतांनी पराभव पत्करावा लागला. अन्य मतदार संघांत काही हजारांत मते मिळाली.

अजित पवार गटाचा धुव्वा

शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्या अजित पवार गटाला केवळ रायगडमधील सुनील तटकरे यांची जागा राखता आली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. तसेच शिरूर, धाराशिव या जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, येथे मोठा पराभव पत्करावा लागला.

काँग्रेसला उभारी

भाजपने या निवडणुकीत २८ जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी केवळ ११ जागांवर यश मिळाले तर काँग्रेसने १७ जागांवर उमेदवार उभे करून १२ जागांवर यश मिळविले, तर एक जागा सायंकाळपर्यंत आघाडीवर होती. भाजपची मोठी फळी प्रचारात उतरली असतानाही अपयश आल्याने मागील काळात केलेल्या अनेक चुकांची उजळणी सुरू झाली. मागील लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने जोरदार पुनरागमन करत पाया भक्कम केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT