Nashik News : राज्यातील आदिवासी बांधवांना शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ रोजगार निर्मितीसाठी अर्थसाह्य करते. याच माध्यमातून जवळपास गेल्या काही वर्षांत शेतकरी उत्पादक कंपन्या व वनधन केंद्रांना महामंडळाने अर्थसाह्य केले आहे. त्यातील जवळपास ५० कंपन्यांनी व्यावसायिक पद्धतीने काम करत उत्पादने विकसित केली आहेत. या उत्पादनांना प्रीमियम सेगमेंटमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाने ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रँड विकसित केला आहे. येत्या काळात तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
पूर्वी महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी तरुण-तरुणींना व्यवसायासाठी अर्थसाह्य केले जायचे; मात्र गेल्या काही वर्षांत संस्थात्मक पातळीवर हे अर्थसाह्य करण्यात येत आहे. या माध्यमातून स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध उत्पादने विकसित केली आहेत. अशा उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शबरी महामंडळाने व्यावसायिक संकल्पना पुढे आणली आहे. या माध्यमातून मोह, नागली, बांबू यापासून निर्मित उत्पादनांना चालना मिळणार आहे.
आदिवासी बांधवांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतीमालाची संस्थात्मक पातळीवर यापूर्वी खरेदी व्हायची. मात्र दर्जा व गुणवत्तेच्या तुलनेत मिळणारा दर स्पर्धात्मक नव्हता. त्यामुळे महामंडळाने याबाबत अभ्यास करून व्यावसायिक विस्तार व उत्पन्न वाढीसाठी ‘शबरी नॅचरल्स’ हा ब्रॅण्ड विकसित केला आहे. हाताळणी, प्रतवारी यांसह ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग व मार्केटिंगवर भर दिला जात आहे. अशी गुणवत्तापूर्ण उत्पादने प्रीमियम सेगमेंटमध्ये विक्री व्हावी हा यामागील मुख्य उद्देश आहे.
येणाऱ्या काळात कंपन्यांच्या उत्पादनाची विस्तृत श्रृंखला ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रॅण्डखाली विक्री होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक ब्रॅण्डिंग व पॅकिंग करून या उत्पादनांची विक्री केली जात आहे, त्यास ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
उत्पादने
मोह उत्पादने : सुकवलेली मोहफुले, मोह मनुका, मोह सिरप, चॉकलेट्स, तेल, मॉइश्चरायजर, साबण व लाडू
नागली : निवडलेली नागली, नागली सत्त्व, बिस्कीट, लाडू
तांदूळ : इंद्रायणी, हातसडी, ब्राऊन व काळा भात
मध : मोहरी, तुळस, वन्य असे ७ प्रकारचे मध
बांबू : बास्केट्स, दिवाळी आकाश कंदील, लाइट माळा
गुणवत्तापूर्ण चारोळी
ब्रॅण्डिंगमध्येही आदिवासी कलेला स्थान
‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उत्पादने पुढे आणली आहेत. या उत्पादनांच्या लेबल्सवर आदिवासी चित्रशैली मुद्रित करण्यात आली आहे. ज्यामध्ये वारली, गोंड, सिंधुदुर्ग भागांतील ठाकर चित्रकथींना स्थान देण्यात आले आहे.
‘शबरी नॅचरल्स’ या नावाने नवा स्टार्टअप सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना प्रीमियम उत्पादने मिळावीत हा प्रयत्न आहे. त्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म निर्मिती केली जात आहे. याशिवाय समाज माध्यमांवर प्रमोशन केले जात आहे. येणाऱ्या काळात या व्यावसायिक मॉडेलची मालकी आदिवासी बांधवांची असेल. फक्त अर्थसाहाय्य नव्हे तर त्यांचा व्यावसायिक विस्तार हे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यातून आदिवासी बांधवांचे अर्थकारण उंचावेल, मूल्य व पुरवठा साखळी विस्तारत जाईल.लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालिका-शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.