Pune News : ‘‘कृषी व्यवसायात गुणवत्तेचे उत्पादन करणे एकवेळ सोपे आहे. मात्र मार्केटिंग हे सर्वात जिकिरीचे काम आहे. कृषी व्यवसाय हा दोनचाकी सायकलीसारखा आहे. एक पायाचे पायडल म्हणजे उत्पादन निर्मिती तर दुसरे पायडल विपणन असते.
ही दोन्ही चाके सुरळीत चालविली तरच कृषी व्यवसाय यशस्वीपणे चालू शकतो. यासाठी ‘डायरेक्ट टु कस्टमर’ हे विपणनाचे तंत्र वापरले पाहिजे,’’ असा कानमंत्र ‘टु ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म’चे सहसंस्थापक, यशस्वी कृषी उद्योजक अजिंक्य हांगे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘सकाळ-ॲग्रोवन’संलग्न ‘एसआयआयएली’च्या ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या १० व्या वर्षीच्या बॅचला मंगळवारी (ता. ३) सुरूवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हांगे बोलत होते.
या वेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, सकाळ माध्यम समुहाचे संचालक (पीपल आणि कल्चर) विनोद बिडवाईक, ‘एसआयआयएलसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित माहेश्वरी उपस्थित होते.
बॅंकिंग क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे सेंद्रिय शेतीचा व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय अजिंक्य व सत्यजित हांगे या दोघा बंधूंनी केला. त्यातून टु ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म या ब्रँडने कंपनीला सुरवात केली.
आज देश-विदेशात या ब्रॅन्डखाली उत्पादनांची मोठी मागणी आहे. यात यशस्वी होण्यासाठी विपणन कशा प्रकारे केले व त्यासाठी कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, याबाबतचा प्रवास हांगे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
डॉ. कौसडीकर म्हणाले, ‘‘जीवनात यशस्वी होण्यासाठी कौशल्ये आवश्यक असतात. ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, संवाद तसेच शिस्तीचे कौशल्य वाढविण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर येऊन जे काही करायचं आहे ते आवडीने करावे. कुठे व कोणाला काय विकायचे आहे, हे जमणे महत्त्वाचे आहे.’’
‘‘आपल्याकडे मुबलक प्रमाणात यंग टॅलेंट आहे. विद्यार्थ्यांनी सारासार विवेकबुद्धी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. आपण जे करणार आहोत त्याचा चांगला परिणाम समाजावर झाला पाहिजे, यादृष्टीने आपल्या ज्ञानाचे मूल्यवर्धन केले पाहिजे. ‘हेल्थ आणि वेलनेस’ या दोन बाबी सर्व व्यवसायांना पूरक आहेत. त्यावर आधारित गरजा निर्माण करून व्यवसाय यशस्वीपणे करता येऊ शकतो,’’ असे बिडवाईक म्हणाले.
प्रास्ताविकात ‘सकाळ’ व ‘एसआयआयएलसी’च्या उपक्रमांविषयी माहेश्वरी यांनी माहिती दिली. ‘‘वर्तणूक बदलांवर संस्था अधिक भर देत असून विद्यार्थ्यांनीही त्याचा अवलंब करावा,’’ असे त्यांनी सांगितले. कृषी विभाग प्रमुख अमोल बिरारी यांनी स्वागत केले. शिक्षण विभाग प्रमुख डॉ. मंजूषा मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रकल्प व्यवस्थापक जयप्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी अमित मांजरे, स्वप्नील साखरे, मनिषा सोपने, अमृता सिंग, परवीन खान, पुनम पाटील यांनी परिश्रम घेतले. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी संपर्कः ९८८१०९९७५७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.