Black Honey
Black Honey Agrowon
ॲग्रो विशेष

Black Honey : जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी

Team Agrowon

जर्मनी या देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ३० टक्के क्षेत्र अरण्यांनी (Forestry) व्यापलेले आहे. यातील बहुतेक सर्व अरण्यांमध्ये सूचिपर्णी आणि रुंदपर्णी असे दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात. रुंदपर्णी वृक्ष ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळी रूपे दाखवतात. हेमंत ऋतूत त्यांची पाने लाल किंवा पिवळी होतात. शिशिर ऋतूत ती झडून गेल्याने वृक्ष निष्पर्ण होतात, तर वसंत ऋतूत ते कोवळ्या पोपटी पालवीने भरतात.

काहींना याच हंगामात फुले येतात, तर काही वृक्षांना फुलांचे परागीकरण झाल्यानंतर पालवी फुटते. ग्रीष्म ऋतूत त्यांच्या पर्णसंभाराचा पूर्ण विकास होतो; पण त्यामुळे ते नुसतेच हिरवे न दिसता वृक्षांच्या जातीनुसार त्यांच्यात हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसतात. या रम्य अरण्यांना अपवाद आहे तो नैर्ऋत्य जर्मनीतल्या श्‍वार्त्सवाल्ड नामक एका भूभागाचा.

श्‍वार्त्सवाल्ड या जर्मन शब्दाचा मराठीत अनुवाद होतो- काळे अरण्य. हा सर्व भूभाग सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्याने व्यापलेला आहे. हे वृक्ष सदाहरित असून, त्यांची पाने काळपट हिरव्या रंगाची असतात. सूचिपर्णी वृक्ष कधीच निष्पर्ण होत नसल्याने या अरण्यात सतत गडद काळी सावली असते. म्हणूनच या भूभागाला श्‍वार्त्सवाल्ड असे सार्थ नाव पडले असावे.

श्‍वार्त्सवाल्डचा मध हे येथील एक खास उत्पादन आहे. तो पेटीत ठेवलेल्या पाळीव मधमाश्‍यांकडूनच निर्माण केला जातो; पण तो डांबरासारखा काळाकुट्ट, अपारदर्शी आणि घणसर असतो. हा मध जर्मन लोक आवडीने खातात. काहींच्या मते तर त्यात विशेष औषधी गुणधर्म असतात. मी

सन १९५६ ते १९६० अशी पाच वर्षे उच्च शिक्षणाच्या निमित्ताने जर्मनीत घालवली. जीवशास्त्राचा अभ्यासक या नात्याने माझ्या मनात श्‍वार्त्सवाल्डच्या मधाबद्दल एक प्रश्‍न निर्माण झाला, तो म्हणजे सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यात फुले अजिबात नसताना मधमाश्‍या मध तरी कोठून आणतात?

सूचिपर्णी वृक्षांमध्ये फुलांऐवजी कोन (cone) या नावाने ओळखले जाणारे तपकिरी रंगाचे अवयव असतात. कोनमध्ये मकरंद नसल्याने त्यांचे परागीकरण तृणधान्यांप्रमाणेच वाऱ्याने केले जाते आणि परागीकरणानंतर कोनमध्ये बीजधारणा होते. श्‍वार्त्सवाल्डच्या मधाबद्दल जाणकार लोकांकडे चौकशी केल्यावर मला असे समजले, की या वृक्षांवर ॲफिड नावाचे कीटक असतात. मराठीत या कीटकांना मावा म्हणतात.

ते आपली सोंड वनस्पतींच्या खोडात घुसवून त्यातला अन्नरस शोषून घेतात. या कटीकांना त्यांच्या शरीराच्या मागच्या भागावर दोन नलिका असतात. वनस्पतींमधून शोषून घेतलेल्या अन्नरसापैकी बराचसा रस या नलिकांमधून सतत पाझरत असतो. या पाझरणाऱ्या द्रावात साखरेचे प्रमाण बरेच असते. फुलांचा नेसर्गिक मकरंद मिळत नसल्याने या अरण्यातील मधमाश्‍या ॲफिडच्या शरीरातून पाझरणारा शर्करायुक्त द्राव गोळा करून आपल्या पोळ्यांमध्ये मधाप्रमाणे साठवून ठेवतात.

पुढे १९७०च्या दशकात मी करडई पिकावर संशोधन करीत असताना मला या कीटकांचा अधिक अभ्यास करता आला. कारण करडईवर नेहमीच मावा कीटक असतात. वनस्पतींवरील मावा हे नेहमी मादी कीटकच असतात. सर्वच प्राणिमात्रांच्या माद्यांना प्रजोत्पत्तीसाठी जादा प्रथिनांची गरज भासते. वनस्पती प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे मुख्यतः साखर निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्या अन्नरसात साखरेचे प्रमाण अधिक आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असते.

मावा कीटक वनस्पतीमधून शोषून घेतलेल्या अन्नरसातली प्रथिने आपल्या प्रजोत्पादनासाठी वापरतात आणि नको असलेली अतिरिक्त साखर त्यांच्या शरीरातून बाहेर टाकली जाते. जर मकरंदाचा अभाव असेल तर मधमाश्‍या जिथे मिळेल तिथून साखर गोळा करून आणतात. (महाबळेश्‍वर येथे पावसाळ्यात निसर्गात फुले नसल्याने मधमाश्‍यांना खाद्य म्हणून साखरेच्या द्रावाने भरलेल्या बशा त्यांच्या पेट्यांजवळ ठेवल्या जातात.

आपल्या शहरातल्या रसवंतिगृहातसुद्धा रस काढून बाहेर टाकलेल्या चोयट्यांवर मधमाश्‍या घोंघावताना दिसतात.) याच नियमानुसार खरा मध न मिळाल्याने मधमाश्‍या माव्याच्या शरीरातून पाझरणाऱ्या शर्करायुक्त द्रावाचा आपल्या पोळ्यात संचय करतात.

मधमाश्‍यांसंबंधीची माझी आणखी एक आठवण आहे ती सन १९७०च्या दशकातली. मी त्या वेळी फलटण येथील निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचा (नारी) संचालक म्हणून काम पाहत असे. एक दिवस अचानक पुण्यातल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे (एनसीएल) संचालक डॉ. बाळ द. टिळक यांनी फोन करून मला पुण्याला बोलावून घेतले.

त्यांच्यासमोर एक समस्या होती. एका जर्मन कंपनीने एक नवीन कीटकनाशक बाजारात आणले होते. या कीटकनाशकाद्वारे उपद्रवी कीटक मारले जात. पण या कीटकनाशकाचा मधमाश्‍यांनांवर प्रतिकूल परिणाम होत नसे. कारण कीटकनाशकाच्या ज्या मात्रेने उपद्रवी कीटक मरत असत तेवढ्या मात्रेने मधमाश्‍यांना अपाय होत नसे.

हे कीटकनाशक बनविण्याचे पेटंट त्या जर्मन कंपनीकडे होते; पण या पेटंटला बगल देण्यासाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने हेच कीटकनाशक एका वेगळ्या पद्धतीने बनवण्याची कृती शोधून काढली होती. भारतातली एक कंपनी ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडून विकत घ्यायला तयार होती; पण या नव्या कृतीने बनविलेले कीटकनाशक उपद्रवी कीटकांना मारक असूनही मधमाश्‍यांना अपायकारक नाही याचे त्या कंपनीला प्रमाणपत्र हवे होते.

डॉ. टिळकांनी राहुरीचे कृषी विद्यापीठ आणि पुण्यातील सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट या दोघांकडे विचारणा केली. पण दोन्हींकडून असे प्रमाणपत्र देण्यास नकार आला होता. त्यांनी नकार देण्याचे नक्की कारण काय होते, ते मला कळले नाही; पण त्यात लाल फितीची काही तरी अडचण असावी, असा माझा समज झाला. पण कोणत्या का कारणाने होईना, त्या वेळी हे काम करण्याची संधी आमच्या संस्थेला मिळाली.

डॉ. टिळकांशी चर्चा केल्यावर मी फलटणला आलो. तिथे आमच्या संस्थेतील कीटकशास्त्रज्ञ मोहन केतकर यांच्याशी चर्चा करून डॉ. टिळकांना आमचा होकार कळवला. त्यानंतर केतकरांनी पुण्यातल्या त्यांच्या केतकर वाड्यातल्या एका खोलीत एक तात्पुरती प्रयोगशाळा उभी केली. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडून त्यांनी बनविलेल्या त्या विशिष्ट कीटकनाशकाचा नमुना घेतला. बाजारातून जर्मन कंपनीने बनवलेले कीटकनाशक विकत घेतले. सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटकडून मधमाश्‍या घेतल्या.

आणि योग्य ते प्रयोग करून केवळ आठच दिवसांत असे दाखवून दिले, की नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने बनविलेल्या कीटकनाशकाच्या ज्या मात्रेने उपद्रवी कीटक मरतात, त्या मात्रेने मधमाश्‍यांना काहीही अपाय होत नाही. त्यानंतर मी डॉ. टिळकांना जसे हवे होते तसे प्रमाणपत्र तर दिलेच; पण त्यासोबत केतकरांनी केलेल्या प्रयोगांची कृती आणि निष्कर्षही जोडलेले होते.

या लहानशा कामामुळे आमच्या संस्थेचे आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संबंध जुळले. त्यामुळे संस्थेचा आणि वैयक्तिक पातळीवर माझाही बराच फायदा झाला. त्यातला एक फायदा असा झाला की माझी पाच वर्षांसाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या जैवरसायनशास्त्र विभागाचा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आणि त्यातून निघालेल्या अनेक कल्पनांवर आधारित असे अनेक प्रकल्प आम्ही पुढे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीबरोबर राबवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT