Sangola News : सांगोला तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी खालावल्याने तालुक्यातील १० गावांतर्गत वाड्या- वस्त्यांवरील १७ हजार ३८९ बाधित लोकसंख्येला १२ हजार लिटर क्षमतेच्या ११ टँकरद्वारे दैनंदिन २० खेपा करून सुमारे दीड लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तसेच पारे, महूद व इटकी या तीन गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत तर दुसरीकडे दुष्काळाच्या तीव्रतेचे चटके नागरिकांना जाणवताहेत. एप्रिल महिन्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी अत्यंत खोलवर गेली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. सध्या विविध गावांतील वाड्या- वस्त्यांवर पाणीटंचाईच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतींकडून टँकर मागणीचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सांगोला व तहसीलदार सांगोला यांच्याकडे पाठवून दिले होते.
संबंधित प्रस्तावांची दखल घेऊन मंगळवेढा उपविभागीय अधिकारी बी. एस. माळी यांच्या आदेशान्वये तालुक्यातील लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, कटफळ, डोंगरगाव, यलमर मंगेवाडी, लोटेवाडी अजनाळे, चिकमहूद या गावांतील वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहेत. तसेच पारे, महूद व इटकी या तीन गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत.
जनावरांच्या चाऱ्याला मुरघासचा आधार
सांगोला तालुक्यातील डाळिंब बागा विविध रोगांमुळे नष्ट झाल्यामुळे शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. तालुक्यात सुमारे एक लाख ४८ हजार ८२ लहान- मोठी जनावरे असून सुमारे अडीच लाख शेळ्या-मेंढ्या आहेत. दुष्काळाच्या तीव्रतेमुळे जनावरांना चारा मिळणे सध्या मुश्किलीचे झाले आहे. शेतकऱ्यांनी मका पिकाचा केलेला मुरघास सध्या शिल्लक असल्याने चाराटंचाई म्हणावी तेवढी जाणवत नसली तरी पुढील महिन्यात तीव्र चाराटंचाई जाणवणार आहे. सध्याही दूध देणाऱ्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने दुधाचे उत्पन्न घटले आहे.
या वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी गावाचे नाव बाधित लोकसंख्या टँकरच्या खेपा
लक्ष्मीनगर १८१० २.५
अचकदाणी १२७५ २
बागलवाडी १३८७ २
सोनलवाडी १३२० २
कटफळ १८२५ १.५
डोंगरगाव ५७७ १
यलमर मंगेवाडी २०३० १.५
लोटेवाडी ११८० २
अजनाळे १४८५ २.५
चिकमहूद ४५०० २.५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.