Naresh Sayaji Gaikwad and Agriculture Agorwon
ॲग्रो विशेष

Krishi Karma Vidya: एका ग्रंथाचा शोध आणि बोध

Historical Agriculture: बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांनी विविध विषयांवर उत्तमोत्तम संदर्भ ग्रंथ निर्मितीस प्रोत्साहन दिले होते, त्यापैकी एक ग्रंथ म्हणजे ‘कृषिकर्मविद्या’. मुंबई इलाख्यातील जिरायती व बागायती शेती व्यवस्था दीडशे वर्षांपूर्वी कशी होती, याविषयी इत्थंभूत माहिती देणारा हा ग्रंथ आहे. ही माहिती मिळाल्यावर मग सुरू झाली ‘कृषिकर्मविद्या’ पुस्तकाची शोधयात्रा.

Team Agrowon

विजय सांबरे

Indian Agri Heritage:

शोध

साधारण सहा-सात वर्षांपूर्वीची ही घटना. गोव्यातील केरी-सत्तरी गावी राजेंद्र केरकरांच्या भेटीला गेलो होतो. गोव्यातील सह्याद्री, निसर्ग, शेती, पर्यावरण, नद्या, समुद्र व लोक संस्कृती समजून घ्यायची असेल, तर राजेंद्रभाई, पौर्णिमाताई व त्यांची कन्या समृद्धी यांची अवश्य भेट घ्यावी. गेली तीन दशके केरकर कुटुंब कोणताही गाजावाजा न करता निसर्ग व लोकसंस्कृतीच्या जतन संवर्धनासाठी अविरत अध्ययन, लेखन व प्रत्यक्ष गावसमाजातील विविध घटकांसोबत कार्यरत आहे. ‘विवेकानंद पर्यावरण ब्रिगेड’ या छोटेखानी संस्थेच्या माध्यमातून पन्नासहूनही अधिक तरुण-तरुणी गोव्याचा जैव-सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य करत आहेत. म्हादई नदी बचाव व खाणींच्या विळख्यातून सह्याद्रीला वाचवणं, यासाठी राजेंद्र केरकर हे अहोरात्र झटत आहेत. अनेकदा जिवावर बेतण्याचे प्रसंग आले, तरी त्यांनी गोव्याचे पर्यावरण जपण्याचा वसा टाकलेला नाही.

केरी-सत्तरीच्या रमणीय वातावरणात सांज समयी राजेंद्रभाई व पौर्णिमाताई यांच्याशी गोव्यातील पारंपरिक शेती-पशुपालन व्यवस्था व संस्कृती याविषयी चर्चा सुरू होती. कोणते संदर्भ ग्रंथ वाचावेत, याची यादीच भाईंनी दिली व अचानक एका पुस्तकाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, तुम्ही ‘कृषिकर्मविद्या’ पुस्तकाविषयी काही जाणून आहात का? म्हटलं नाही. बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांनी विविध विषयांवर उत्तमोत्तम संदर्भ ग्रंथ निर्मितीस प्रोत्साहन दिले होते, त्यापैकी हा एक ग्रंथ आहे. पुण्यातील एका मित्राकडे त्यांनी अत्यंत जीर्ण अवस्थेतील ‘कृषिकर्मविद्या’ ग्रंथ पाहिला होता. मुंबई इलाख्यातील जिरायती व बागायती शेती व्यवस्था दीडशे वर्षांपूर्वी कशी होती, याविषयी इत्थंभूत माहिती देणारा ग्रंथ अवश्य मिळवा व वाचा, असा आग्रह त्यांनी केला. मग सुरू झाली ‘कृषिकर्मविद्या’ पुस्तकाची शोधयात्रा.

राजेंद्रभाईंनी यांनी सुचविल्याप्रमाणे पुण्यातील सुनील भिडे यांच्याशी संपर्क साधला. श्री. भिडे यांच्याशी ‘मिशन देवराई’ उपक्रमाच्या माध्यमातून परिचय झालेला होता. एकेदिवशी खास वेळ काढून पुण्यात त्यांची भेट घेतली. डेक्कन जिमखाना परिसरात एका प्रशस्त इमारतीत ते राहतात. व्यवसायाने सी. ए., पण निसर्गप्रेम रक्तातच भिनलेले असल्याने त्यांनी घराच्या गच्चीवर उत्तम झाडोरा निर्माण केला आहे. रसायन अवशेषमुक्त शेती फुलवलेली आहे. हे सर्व पाहून झाल्यावर ‘कृषिकर्मविद्या’ पुस्तकाचा विषय निघाला.

हे पुस्तक त्यांच्यापर्यंत येण्याची कथा मोठी रंजक आहे. दिवंगत संजय गोडबोले हे श्री. भिडे यांचे मावस भाऊ. प्राचीन ग्रंथ साहित्य संग्रह करण्याचा श्री. गोडबोले यांना छंद होता. शेतीमध्ये रासायनिक खते, कीडनाशके, बी- बियाणे विकत न घेण्याच्या कालखंडात आपल्या देशातील वा राज्यातील कृषी व्यवस्था कशी होती, याविषयी श्री. भिडे यांना उत्सुकता होती. त्यांनी आपल्या भावाला यासंबंधी विचारणा केली. तर गोडबोले यांच्या संग्रही असलेले ‘कृषिकर्मविद्या’ हे जुने पुस्तक त्यांना मिळाले. हे पुस्तक अत्यंत जीर्ण झालेले होते. त्यामुळे फोटो कॉपी करणे शक्य नव्हते. त्यावर पर्याय शोधू असे आश्‍वासन भेटी दरम्यान श्री. भिडे यांनी दिले. दरम्यान ते काही काळ परदेशात गेल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

‘कृषिकर्मविद्या’ पुस्तक मला स्वस्थ बसू देत नव्हते. ग्रंथ मिळविण्यासाठी यत्न सुरूच होता. बडोद्यातील विविध संस्था, व्यक्ती यांच्याशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून होतो. एकदा सुरतमध्ये काही कामानिमित्त गेलो असता पुढे बडोद्याला जाऊन आलो, पण पुस्तकाचा काही ठावठिकाणा लागेना. बडोदा विद्यापीठातील ग्रंथालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अहिल्यानगरचे पत्रकार मित्र सतीश कुलकर्णी बडोदा येथे एका लेखन प्रकल्पाच्या निमित्ताने जायचे. त्यांना शोध घ्या, अशी विनंती केली. त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापक मित्रांना पुस्तकाचा शोध घेण्यास सांगितले.

गुजरातमध्ये नियमित प्रवास करणारे पुण्यातील योजक संस्था व सुरत येथील आंबेडकर वनवासी ट्रस्ट संस्थेतील मित्रमंडळींना पण शोध घेण्यास सांगितले. नाशकातील मित्र निनाद नांदुर्डीकर यांचे नातलग बडोद्याला होते. त्यांच्या माध्यमातून चौकशी झाली, पण सारे प्रयास व्यर्थ गेले. दरम्यान सर्वांनाच या ग्रंथाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.अखेर सुनील भिडे परदेशातून परतल्यावर त्यांनी जीर्ण झालेल्या ग्रंथाची पीडीएफ भांडारकर संस्थेतील मित्रांच्या मदतीने तयार केली. त्यासाठी अत्याधुनिक स्कॅनर मशिनचा वापर करावा लागला. मग मागील वर्षी कृषिकर्मविद्या हे पुस्तक डिजिटल स्वरूपात प्रथम पाहायला मिळाले. शेवटी कृषी-इतिहास सांगणारा दस्तऐवज संग्रही आल्याचा मोठा आनंद झाला.

बोध

बडोदा संस्थानाचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड (१८६३ ते १९३९) हे प्रागतिक विचारसरणीचे होते. बडोदा संस्थानातील प्रजेचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील असत. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिल्याचे दिसते. विविध क्षेत्रांतील विद्वानांचा सहभाग घेऊन त्यांनी वेगळी उंची आपल्या संस्थानाला दिली.

‘श्रीसयाजी ज्ञानमंजूषा’ या उपक्रमाची सुरुवात त्यांनी १८७५-९० या दशकात केली. “ शिक्षण घेते समयी एत्तदेशीय भाषेद्वारे मनास जितक्या अंशाने शाब्दिक बोध व ज्ञान प्राप्त होते, तितक्याच अंशाने त्याचा विकास होतो. परकीय भाषाद्वारे हे प्राप्त होऊ शकत नाही. आईच्या मांडीवर लोळताना व खेळताना जी भाषा आपण शिकतो, तिच्यातच आपली सर्व भावी वृत्ती, भावना व विचारमय जीवन गोविले जाते. एखादे मूल एकाच वेळी दोन भाषा शिकत वाढत असेल तर त्यात त्यांची तितकीच हानी होते.” ही भारतीय विचारधारा श्रीसयाजी ज्ञानमंजूषा उपक्रमाची होती. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर उत्तमोत्तम संदर्भ ग्रंथ बडोदे संस्थानाने प्रकाशित केले.

‘कृषिकर्मविद्या

१८७८ साली ‘मुंबई इलाख्यातील जिराईत व बागाईत शेतीचे वर्णन’ या नावाचा शेतीविषयक ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला. श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आज्ञेने सिद्ध झालेल्या ग्रंथाचे शोधक व प्रकाशक होते सन्माननीय त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर. सातशे चाळीस पानांच्या या पुस्तकाचे इंग्रजी नाव PRACTICAL TREATISE ON THE AGRICULTURE AND HORTICULTURE OF WESTERN INDIA असे होते. द्वितीय आवृत्तीच्या कामात कै. रामचंद्र सखाराम गुप्ते (सुपशास्र, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा आदी ग्रंथांचे कर्ते) आणि कै. रामचंद्र आबाजी राजे (विलासिनी व ऋणनिषेध ग्रंथांचे कर्ते) या मान्यवर अभ्यासकांचा सहभाग होता. पुढे या ग्रंथाची दुसरी आवृत्ती १८९६ मध्ये प्रकाशित झाली. श्रीसयाजी ज्ञानमंजूषा ग्रंथमालेच्या निर्मिती प्रकल्पात मुख्य मार्गदर्शक म्हणून न्या. महादेव गोविंद रानडे हे होते. त्यामुळे कृषिकर्मविद्या या ग्रंथासोबत इतर सर्वच ग्रंथांना एक वेगळी उंची मिळाली.

संपादक मंडळातील सदस्यांनी हा ग्रंथ परिपूर्ण व्हावा, यासाठी पंधरा वर्षे परिश्रम घेतले. शेतीतील सर्वसामान्य पिकांची माहिती देत असताना विशेष पिकांकडे पण दुर्लक्ष झाल्याचे दिसत नाही. अगदी अफूसंबंधी माळवा व गुजरातमधून तसेच कॉफी पिकाची माहिती तामिळनाडूतील निलगिरी व पलानी डोंगररांगेत जाऊन घेतली. ऊस पिकाची माहिती कोकण, देश व गुजरातमधून मिळवली. गव्हासाठी मध्य प्रदेश, कापसासंबंधी वऱ्हाड, खानदेश, भडोच, तसेच तंबाखू पिकासाठी पेटलाद, गाझीपूर या ठिकाणची माहिती मिळवल्याची नोंद पुस्तकाच्या प्रस्तावनेतून मिळते.

कृषिकर्मविद्या हे पुस्तक केवळ चाळले तरी विषयाची खोली व कंगोरे ध्यानी येतात. दीडशे वर्षांपूर्वी अनेक विद्वत वाचकांनी पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीविषयी प्रशस्ती (Testimonials) नोंदवली आहे, हे विशेष. हा ग्रंथ एकूण चार भागांत विभागलेला आहे.

पहिल्या भागात शेती व्यवस्थापनाविषयीचे सामान्य विचार मांडले आहेत. जमिनीची सुपीकता, मशागत, बीज संकलन, कलम, पाणी व घरगुती खत व्यवस्थापन, पिकांचे फेरपालट, रोग व किडींची ओळख व घरगुती उपाययोजना ते अगदी पावसाचा अंदाज बांधणे, असे वर्णन वाचायला मिळते.

दुसरा भाग जिराईत शेतीविषयी माहिती देणारा आहे. त्यात तब्बल एकोणचाळीस पिकांची माहिती मिळते. भादली, लांख, शिरस, नीळ या सध्या फार प्रचलित नसलेल्या पिकांची माहिती अभ्यासकांना उपयुक्त ठरणारी आहे.

पुस्तकाच्या तिसऱ्या भागात मात्र बागाईत शेती व विविध चोपन्न पिकांची सविस्तर माहिती दिलेली आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने भाजीपाला पिकांवर या भागात विशेष लक्ष दिल्याचे जाणवते. ऊस, केळी, द्राक्ष, पानमळा, हळद इत्यादी नगदी पिकांची सांगोपांग माहिती, हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय सांगता येईल.

अखेरचे चौथे प्रकरण बागबगिचा नावाने आहे. त्यात सत्तेचाळीस प्रकारच्या फळझाडांची माहिती दिली आहे. त्यात देशी व परदेशी फळझाडे देखील आहेत. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी व गौरीफळ (Black berry) याचा पण उल्लेख आहे. चौदा प्रकारचे पुष्पवृक्ष त्यात सोनचंपा ते कदंब व गुलतुरा ते केवडा अशी सर्व फुलझाडांची नोंद मिळते. अकरा प्रकारची फुलझाडे आहेत. त्यात गुलाब, अनंत, कण्हेर, मांदार ते अगदी धोतरा यांची सविस्तर माहिती आढळते. आठ प्रकारच्या पुष्पवेली, सहा प्रकारची फुले, की त्यापासून गुच्छ तयार होतात, पाण्यातील फुलांमध्ये कमळ, कल्हार व कुमुद यांची माहिती मिळते. विशेष म्हणजे वाळा, गवती चहा व रोशेल सुवासिक गवतांची लागवड कशी करावी, याविषयी मांडणी महत्त्वपूर्ण आहे.

पुस्तकाच्या अखेरीस परिशिष्टात विविध अवजारे, शेती कामासंबंधी पारिभाषिक शब्द व उपयुक्त माहिती देणारी कोष्टके दिलेली आहेत. जागोजागी शेतीविषयक संस्कृत श्लोक व त्यांचा मराठी भावार्थ वाचकास ज्ञान-समृद्ध करतो.

अडतीसपेक्षा अधिक देशी-विदेशी संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन निर्माण झालेला ‘कृषिकर्मविद्या’ हा ग्रंथ सर्वार्थाने उत्तम संदर्भ-स्रोत म्हणून सिद्ध झाला आहे, याची वाचताना प्रचिती येते. कृषिशास्र विषयातील अभ्यासक, पदवीधर, शेतकरी, पत्रकार, धोरणकर्ते या सर्वांनी अभ्यासावा असा हा ग्रंथ; पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या ग्रंथागारात पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे.

९४२१३२९९४४

vijaysambare@gmail.com

(लेखक शेती, पशुपालन व शाश्‍वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT