Pune News : राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नसून मुख्यमंत्री कोण यावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर हिवाळी अधिकवेशनाच्या तारखा समोर देखील आल्या आहेत. १६ डिसेंबर ते २४ डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकाल लागला असून अद्यापही सत्तास्थापन झालेली नाही. महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिवसेना शिंदे यांच्यात मुख्यमंत्रीपदासह महत्वाच्या खात्यांवरून तिढा कायम आहे.
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशावेळी भाजप राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरेल. तर सध्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे भाजपमध्ये देखील मुख्यमंत्रीपदावरून लॉबींग केले जात असल्याचे समोर आले आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून यंदाच्या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसनव्यवस्था असणार आहे. यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे.
यंदा ७८ आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. महायुतीचेच २३० आमदार असून अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. यामुळे २८८ आमदारांचे एक विशेष अधिवेशन मुंबईत होणार असून ते सत्ता स्थापनेच्या आधी होईल, असेही बोलले जात आहे.
महायुती आणि मविआचे बलाबल
सध्या विधानसभेत २८८ पैकी १३२ आमदार भाजपचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या असून यात उद्धव ठाकरे गटाच्या २० जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेस १६ आणि शरद पवार यांचे १० आमदार झाले आहेत. तर समाजवादी पार्टीचे २ आणि इतरांचे १० आमदार आहेत.