Nutrient Management Agrowon
ॲग्रो विशेष

Nutrient Management : अन्नद्रव्यांच्या उपलब्धीकरणाची क्रिया

Plant Nutrition : अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कुजविणाऱ्या जिवाणूसृष्टीमुळे होते. हा जिवाणूंचा एक गट असतो. जमिनीतील दुसरा गट पिकाच्या गरजेनुसार मागणीनुसार अन्नद्रव्य स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात आणतो आणि ती पिकाला उपलब्ध होतात.

प्रताप चिपळूणकर

प्रताप चिपळूणकर

Indian Agriculture : पिकाच्या केशमुळ्याभोवताली विविध उपयुक्त जिवाणूंचे अस्तित्व असते. प्रत्येक अन्नद्रव्यासाठी स्वतंत्र जिवाणूचा गट असतो. या गटात कित्येक जाती, प्रजाती सुप्तावस्थेत केशमुळाभोवती असतात.

वनस्पती आपल्या मुळातून काही स्त्राव सोडत असते. या स्त्रावातून पाहिजे असलेल्या अन्नद्रव्यांचा संदेश जिवाणूंना पोहचविला जातो. एका द्रव्यासाठी अनेक जाती, प्रजाती काम करीत असतात.

यापैकी कोणाला अनुकूल परिस्थिती असेल ते जिवाणू कार्यरत होतात. बाकीच्या प्रजाती शांत बसतात. जितकी मागणी असेल तितके अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी गरजेइतकी संख्या वाढवितात. अन्नद्रव्य गरजेइतके उपलब्ध करून दिल्यावर परत सुप्तावस्थेत जातात. मूळातील स्त्राव हे गरज असणारी अन्नद्रव्य उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचेच खाद्य असते.

वनस्पती आणि जिवाणू यांचे सतत स्त्रावावाटे संदेश वहन चालू असते. ही एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. पानात तयार होणाऱ्या एकूण अन्नद्रव्यांपैकी ३३ टक्के तयार झालेले अन्न केवळ या कामासाठी खर्ची पडते, असे संदर्भ शास्त्रीय ग्रंथामध्ये सापडतात.

पिकांची बाल्यावस्था, फुटीची अवस्था (असल्यास) वाढीची आणि शेवटी पक्वावस्था या प्रमाणे पिकाच्या अन्नद्रव्यांच्या गरजा बदलत असतात. त्याला गरजेप्रमाणे अन्न पुरवठा झाल्यास उत्पादन चांगले मिळते. संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी निसर्गाने पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाची किती उत्तम सोय करून ठेवली आहे.

हे अभ्यासून मन थक्क होते. प्रत्येक पिकाची अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. तसेच एकाच पिकाच्या दोन जातींची गरज वेगवेगळी असते. वरील सर्व पायाभूत विज्ञान अभ्यासल्यास स्थिरीकरण, उपलब्धीकरण तंत्र लक्षात येते.

कुजविणाऱ्या जिवाणू सृष्टीचे अन्न कुजवणारा पदार्थ ही जिवाणू सृष्टी सेंद्रिय खत तयार करते. हे सेंद्रिय खत हेच अन्नद्रव्य उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचे अन्न आहे. यासाठी कुजण्याची क्रिया जमिनीत सतत चालू ठेवणे गरजेचे आहे.

त्यासाठी कुजणारा पदार्थामुळे जमिनीतील पुढील जिवाणूंची सर्व चक्र व्यवस्थित चालतात. कुजविणारी जिवाणू सृष्टी जमिनीला सुपीकता देते. तर अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारी जिवाणू सृष्टी पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करते.

आपल्या शेती पद्धतीत आपण कुजविण्याची क्रिया जमिनी बाहेर करतो आणि चांगले कुजलेले खत जमिनीत टाकतो. यामुळे जमिनीला सुपीकता देणारी जिवाणू सृष्टी जमिनीत वाढण्यास वाव शिल्लक ठेवत नाही. अशा परिस्थितीमध्ये जमीन जैविक सुपिकतेपासून वंचित राहते. जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजविण्याची क्रिया किती महत्त्वाची आहे, ते आपण एका स्वतंत्र लेखातून अभ्यासणार आहोत.

अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूसृष्टीच्या गटाला शास्त्रीय भाषेत रायझोस्फियर असे म्हणतात. सूक्ष्मजीवशास्त्राच्या ग्रंथामध्ये रायझोस्फियर अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. ही सर्व क्रिया आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे सर्व साहित्य इंग्रजी भाषेत आहे. या विषयाची एक स्वतंत्र तांत्रिक भाषा आहे. ती अवगत असल्यासच वाचनात गोडी निर्माण होते. केवळ इंग्रजी भाषेचे ज्ञान यासाठी पुरेसे नाही.

रासायनिक खतांचा वापर आणि सेंद्रिय खताचा अन्नांश संबंध आहे. रासायनिक खतातील अन्नांश पिकापर्यंत पोहचविण्याचे काम जिवाणू करतात. त्यांना हे काम करण्यासाठी सेंद्रिय खतातून ऊर्जा मिळते. यासाठी जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. सेंद्रिय खत योग्य प्रमाणात नसेल तर दिलेल्या रासायनिक खताला पिकाकडून प्रतिसाद मिळणे केवळ अशक्य आहे.

शेतीचा सध्याची परिस्थिती अशीच आहे. अज्ञानापोटी भरमसाट रासायनिक खतांचा वापर चालू आहे. उत्पादन खर्च प्रचंड वाढत आहे. त्यामानाने उत्पादन वाढत नाही. रासायनिक खते आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो.

सरकारला त्यावर मोठी सवलत द्यावी लागते. अशा परिस्थितीत एका बाजूला परकीय चलनाची विल्हेवाट लागते.तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे नुकसान होते. शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. अनुदान हे मूळ रोगावर उपचार होऊ शकत नाही. येथे शेतकऱ्यांसाठी शास्त्राचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन गरजेचे आहे.

मी १९७० साली कृषी पदवीधर होऊन पूर्ण वेळ शेतकरी झालो. त्या काळी शैक्षणिक अभ्यास क्रमात वरील सूक्ष्मजीव शास्त्रीय ज्ञानाचा समावेश नव्हता. वडिलांच्या काळात रासायनिक खते आणि सेंद्रिय जोरखते (उदा.पेंडी) यांचा ५०- ५० टक्के वापर करण्याची प्रथा होती. यामुळे आमच्या हाती उत्तम जमिनी आल्या.

यामुळे पहिली १५ ते २० वर्षे उत्पादन चांगले मिळाले. त्यानंतर उत्पादन पातळी घसरली. का घसरली याच्या शोधयात्रेत वरील कारणांचा शोध लागला. ३५ ते ४० वर्षानंतर विद्यापीठाच्या चालू अभ्यासक्रमाची कृषी महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष माहिती काढली.

अभ्यासक्रमात रायझोस्फिअर हा शब्द आहे. या विषयी विद्यार्थांना शिकवले जात असावे असे वाटते. परंतु अजूनपर्यंत तरी हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. पीक पोषण हा विषय अजून रसायनशास्त्रीय धरला जातो.

शेतकरी मेळाव्यात या विषयी रसायनशास्त्राज्ञांचा धरला जाते. शेतकरी मेळाव्यात या विषयी रसायनशास्त्रज्ञ प्रबोधन करतात. तेथे भू-सूक्ष्मजीवशास्त्र कधीही नसतो. पूर्वी फक्त काही मोठ्या संशोधन केंद्रात सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ हे पद असे. आज ते नसावे. प्रादेशिक संशोधन केंद्रात ते प्रथमपासूनच नाही.

भू-सूक्ष्मजीवशास्त्राचा काही ग्रंथ शेतकऱ्यासाठी नाहीत. सर्व ग्रंथ पदव्युत्तर विद्यार्थांसाठी संदर्भ ग्रंथ लिहिलेले आहेत. ५००-६०० पानांचे पुस्तक वाचावे तेव्हा एखादा दुसरा सुताचा धागा सापडतो.

परंतु तो इतका महत्त्वाचा असतो की, शेतकऱ्याच्या आयुष्याचे कल्याण करू शकतो. अशी मानसिकता फक्त भारतात आहे असे नाही. जगभराच्या कृषी विद्यापीठात यापेक्षा दुसरी परिस्थिती नाही. या शास्त्राकडे दुर्लक्षामुळे शेतीत काय त्रुटी निर्माण होतात हे पुढील लेखात पाहणार आहोत.

खतांची कार्यक्षमता

सर्व खतांचे साधारण व्यवस्थापन, स्थिरीकरण व उपलब्धीकरण या मार्गाने होते. विद्राव्य खताचे तसे नाही. ही खते पिकाला उपलब्ध अवस्थेतच असतात. ती उपलब्ध करण्यासाठी जिवाणूंच्या मध्यस्थीची गरज नसते. जुनी खते म्हणजे सर्व कच्चामाल गोळा करून तयार केले जेवण तर विद्राव्य खते म्हणजे हॉटेलातून डबा आणून खाणे अगर उपहारगृहात जाऊन जेवणे.

हे वाचल्यानंतर शेतकरी म्हणतील हे काम खूप सोपे झाले. जिवाणू त्यांना लागणारे सेंद्रिय खत वगैरे सर्व व्याप संपला. परंतु ते तितके सोपे नाही. ते वापरण्यापूर्वी पिकाचे प्रत्येक आठवड्याच्या गरजेचे पूर्ण संशोधन करून त्याचे पेरणीपासून कापणीपर्यंत वेळापत्रक तयार करावे लागते. भारतात आजतरी असे संशोधन झालेले नाही. तुम्ही किती खत सोडता ते संपूर्ण गरज नसली तरी पिकाला वापरावे लागते.

पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे असते. नाहीतर खत निचरून जाऊन नुकसान होऊ शकते. जादा दिले तर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल स्थिती तयार होते. अशा अवस्थेत स्थिरीकरण, उपलब्धीकरणाचे तंत्र भारतीय अवस्थेत संतुलित वाटते. यासाठी जमिनीची स्थिरीकरण मर्यादा वाढविणे गरजेचे आहे.

वापरून स्थिरीकरण मर्यादा कमी होत जाते. तर योग्य व्यवस्थापनातून ती उच्च पातळीवर राखता येते. आपले शिफाररसीत खताचे हप्ते गरजेपेक्षा खूप जास्त आहेत. आज दिलेल्या खतांपैकी फक्त १८ ते २० टक्के पिकाकडून वापरले जाते.

येथे कार्यक्षमता वाढविण्यास खूप वाव आहे. समजा गरजेपेक्षा जास्त खत दिले तर ते त्या पिकाच्या कापणीनंतरही सुरक्षित राहून पुढील पिकाला उपयोगी ठरेल. लहान लहान हप्ते करून सूक्ष्म स्वरूपात देणे यावर हा पर्याय होऊ शकत नाही. सेंद्रिय शेती हा तर अजिबात पर्याय नाही. कार्यक्षमता वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे.

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

( लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT