ॲग्रोवन वृत्त
Solapur News : धर्मपुरी, जि. सोलापूर ः आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे गुरुवारी (ता. ११) सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, माजी आमदार रामहरी रुपनवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अकलूजचे प्र. उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातून सकाळी पावणेअकरा वाजता माउलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुद्दी, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माउलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
पालकमंत्र्यांनी केले सारथ्य
धर्मपुरी येथे सकाळी पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माउलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद होते. पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले.
टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी,
वाट ती चालावी पंढरीची
टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा... तुकाराम’चा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता. ‘टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी, वाट ती चालावी पंढरीची’ अशी काहीशी भावना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माउलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलीची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.