Palakhi Sohala 2024 : वारकऱ्यांनी आळंदी गजबजली

Ashadhi Wari 2024 : कपाळी केशरी गंध, बुक्का, गळ्यात तुळशीच्या माळा अन् खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून मोठ्या संख्येने दिंड्यांचे आगमन आळंदीत झाले.
Palakhi Sohala 2024
Palakhi Sohala 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : कपाळी केशरी गंध, बुक्का, गळ्यात तुळशीच्या माळा अन् खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून मोठ्या संख्येने दिंड्यांचे आगमन आळंदीत झाले. दरम्यान, शनिवारी (ता. २९) होणाऱ्या अलकापुरीतील माउलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रम अनुभविण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी वाढतच आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर, इंद्रायणी काठी आणि देऊळवाड्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गर्दी जास्त जाणवत आहे. राज्यभरातून आलेल्या दिंड्यातील वारकऱ्यांच्या गर्दीने शहरातील प्रमुख रस्ते आणि इंद्रायणीचा काठ गजबजून गेला आहे.

दर्शनासाठी अमाप उत्साह...

‘नाचत पंढरीये जाऊं रे खेळिया, रखुमाई पाहूं रे’

ही भावना उरी बाळगून संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी गेली चार दिवसांपासूनच आळंदीत वारकऱ्यांचे आगमन सुरू आहे. आळंदीतच नव्हे तर लगतच्या गावांतही वारकऱ्यांची गर्दी दिसत आहे.

Palakhi Sohala 2024
Palakhi Sohala 2024 : पालखी सोहळ्यात जलसंवर्धन दिंडी

चालून थकून आलेली पावले धर्मशाळा अन् राहुट्यांमध्ये विसावली आहेत. सकाळी इंद्रायणी स्नान झाल्यानंतर लगेच दर्शनाच्या रांगेत वारकरी उभा राहत आहे. जवळपास आठ ते दहा तासांहून अधिक वेळ दर्शनासाठी लागत होता. दर्शनाची रांग देऊळवाड्यातील दर्शन मंडपातून बाहेर इंद्रायणीकाठच्या भक्ती सोपान पुलावर पोहोचली होती.

पहाटेपासूनच ही दर्शनासाठीची रांग होती. दर्शनाची ही रांग देहूफाट्यापर्यंत पोहोचलेली तरी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दर्शनासाठीचा उत्साह अमाप होता. अधूनमधून पाऊस पडत असूनही माउलीनामाचे गोडवे गात वारकरी दर्शनाच्या रांगेतून पुढे सरकत होता.

अभिषेकासाठी मोठी गर्दी

दरम्यान, देऊळवाड्यात माउलींच्या चांदीच्या पादुकांवरही अभिषेकासाठी मोठी गर्दी होत होती. एकावेळी चार, पाच दहा भाविकांना उभे करून अभिषेक उरकले जात होते. देऊळवाड्यात महिला फुगड्या खेळत होत्या. वारकरी काही क्षणभर ओवऱ्यांमध्ये बसून माउलींच्या सान्निध्याचा आनंद घेत होते. आळंदीत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधूनमधून हलकासा पाऊस होत होता. यामुळे वारकऱ्यांच्या अंगावर पावसाचा शिडकावा होत होता. हवेत काहीसा गारवा असल्याने वारकरी सुखावून जात होते. अधूनमधून सूर्यदर्शन होत होत.

Palakhi Sohala 2024
Palakhi Sohala 2024 : आळंदीच्या मानकरी बैलांची पशुवैद्यकीय तपासणी

मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग...

माउलींच्या समाधी मंदिरात आणि महाद्वारात या वर्षी मोठ्या प्रमाणात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ठेवली. मागील वर्षी वारकरी विद्यार्थी आणि पोलिस यांच्यातील वादाच्या प्रसंगानंतर काहीसे सोहळ्याला गालबोट लागले होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला. याचबरोबर बंदोबस्तावरील पोलिसांनाही संयमाने वागण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिला.

तर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनीही आळंदी देवस्थान आणि पोलिस प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे गैरवर्तन करू नये. जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जबाबदार राहणार नाही. वारकरी विद्यार्थ्यांना कोणतेही स्वतंत्र पास दिले जात नाहीत. यामुळे प्रस्थान सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांनी दिंडीतील दिंडीप्रमुखांकडून पासेस घेऊन मंदिरात जावे, असे आवाहन जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रक काढून केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com