Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज (ता.२९) संपत आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी भरता येणार आहे. मात्र अद्यापही महायुती ४ आणि मविआचे १६ ठिकाणी उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. यावरून अनेकांचे लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये सर्वाधिक लक्ष लागलेल्या माढा मतदारसंघाचा तिढा सुटला असून अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी (ता.२९) पाचवी उमेदवारी यादी जाहीर केली. यात माढ्यासह पंढरपूर, मुलुंड, मोहोळ आणि मोर्शी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये संगित वाजे (मुलुंड), गिरीश कराळे (मोर्शी), अनिल सावंत (पंढरपूर) आणि राजू खरे (मोहोळ) यांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत पक्षाने ८७ मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत.
मढ्यात ट्विस्ट
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीसह महाविकास आघाडीत जोरदार रस्सी खेच पाहायला मिळाली. पण आता तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे इच्छुक होते. पण शरद पवारांनी अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पंढरपूरात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत
एकीकडे माढ्याचा प्रश्न निकाली काढण्यात मविआला यश आले आहे. मात्र दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून मविआचेच दोन उमेदवार रिंगणात असणार आहेत. येथून काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असतानाच आता शरद पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी संधी दिली आहे. तसेच भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, मनसेकडून दिलीप धोत्रे देखील मैदानात उतरले आहेत. यामुळे येथे चौरंगी लढत होणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहोळ मतदारसंघात उमेदवार बदलला
मोहोळ मतदारसंघात याआधी सिध्दी रमेश खरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण एकाच दिवसात वासे फिरले आणि येथून राजू खरे यांना यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत उमेदवार बदण्याची कल्पना दिली होती.
महायुती आणि महाविकास आघाडीचे जाहीर उमेदवार
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक असतानाच उरलेल्या जागांचे काय? त्या कधी जाहीर केल्या जातील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत भाजपने १४८, शिवसेना (शिंदे गट) ७८, आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ५१ उमेदवार घोषित केले आहेत. तर काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यात शेंच्युरी मारली असून १०२ उमेदवार घोषि केले आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेनं ८४ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ८७ जागांवर उमेदवार दिले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.