Mumbai News : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. ही सर्व शेती कामधेनूवरच अवलंबून असून त्यांच्याच माध्यमातून केली जाते. त्यामुळे शेतकरी जनावरांना आपल्या लेकराप्रमाणे जीव लावतात. टंचाई काळात त्यांना चारा मिळावा, म्हणून भाताच्या पेंढ्यांचे उडवे रचून ठेवलेले असतात.
मात्र, गेल्या आठवड्यात सलग सहा दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने पेंढ्यांचे उडवे भिजले आहेत. आता त्याला बुरशी येऊन तो काळा पडू लागला आहे. त्यामुळे मोखाड्यात गोधनाच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनावरांना चारा मिळावा, यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
मोखाड्यात खरीप हंगामाची शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. येथे यांत्रिक पद्धतीने शेती केली जात नाही. पारंपरिक पद्धतीने कामधेनूच्या माध्यमातूनच शेतीकाम केले जाते. तालुक्यात १३ हजार हेक्टरहून अधिक खरिपाचे क्षेत्र आहे. तालुक्यामध्ये दुधाळ गाई आणि म्हशींची संख्या आहे. याच जनावरांवर फेब्रुवारीमध्ये फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.
त्यामध्ये काही जनावरांचा मृत्यूदेखील झाला होता. प्रशासनाची सतर्कता आणि शेतकऱ्यांनी समयसूचकता दाखवून गोधन वाचवले होते. मात्र, मागील आठवड्यात सहा दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाची पुन्हा शक्यता असल्याने ताडपत्रीने चारा झाकण्यात आला आहे.
शेतावरील चारा प्लास्टिकचे आवरण टाकून वाचवण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, त्याला बुरशी येऊन तो काळा पडू लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाच्या काहिलीने अनेक ठिकाणी चारा शिल्लक नाही, तर साठवलेला पेंढाही खराब झाल्याने शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी वणवण भटकत, तो मिळविण्यासाठी धडपड करत आहेत.
छावण्या सुरू करण्याची मागणी
सरकारने नागरिकांना २० लिटर, तर मोठ्या जनावरांना ३५ लिटर, लहान जनावरांना १०, तर शेळी, मेंढ्या, कोंबडी आणि डुक्कर यांसाठी दोन लिटर पाण्याचा टॅंकरद्वारे पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे माणसांसह जनावरांनाही दिलासा मिळाला आहे. पाणी मिळाले, मात्र चारा नसल्याने आता जनावरांचे हाल आणि उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे आदिवासी भागात चारा छावण्या सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.