Pune News: अश्व धावती, रिंगणी धूळ उडती,
पालखीचा सोहळा, भक्ती रंगात न्हाती,
टापांचा ठेका, मनाला भिडतो खोल,
दिंडीचा उत्साह, जाणं विठ्ठल भक्ती मोल
या काव्यपंक्ती बेलवाडीच्या अश्व रिंगणाच्या भक्तिमय उत्साहाचे यथार्थ वर्णन करतात. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन, रिंगणात रंगलेला हा सोहळा भक्तांचे मन हरवतो आणि पंढरीच्या वारीचा उत्साह द्विगुणित करतो.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे शनिवारी (ता. २८) उत्साहात पार पडले. सणसर येथील मुक्कामानंतर पालखी सकाळी बेलवाडीत दाखल झाली. लाखो भाविकांनी रिंगणस्थळी गर्दी करीत, ‘राम कृष्ण हरी, ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर विठुनामाचा गजर केला.
अश्व रिंगण हा आषाढी वारीतील तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. मोकळ्या मैदानात रचला जाणारा हा सोहळा भक्तीचा उत्साह आणि वारकऱ्यांची शिस्तीचे प्रतीक आहे. अश्व रिंगण तुकोबारायांच्या भक्तीच्या प्रवासाचे स्मरण करवते, ज्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची तीव्र ओढ आणि हरिनामाचा गजर यांचा संगम होतो.
धावणारे अश्व वारकऱ्यांच्या मनातील भक्तीला चेतना देतात, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे समजून हा सोहळा सर्वांना विठ्ठलाच्या चरणी एकत्र आणतो. इंदापूर, बारामती, माळशिरस, नातेपुते येथील लाखो ग्रामस्थांनी या सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले. सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. फुगड्यांचे फेर आणि टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर विठुनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले.
रिंगणानंतर पालखी हनुमान मंदिरात विश्रांतीसाठी थांबली. स्वागत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, तहसीलदार जीवन बनसोडे, ॲड. शरद जामदार, सरपंच मयुरी शरद जामदार, कांतिलाल जामदार, अर्जुन देसाई, अॅड. शुभम निंबाळकर यांनी केले. या वेळी वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.