Rural Story : चार वर्षांपूर्वी विहिरीच्या बाजुला हा आणि याच बंधाऱ्यावर इतर तीन आंब्यांची रोप लावली होती.यातील दोन वर्षभरातच वाळली.एक आंबा मोठा होऊन अडिच वर्षांनंतर अचानक वाळला.विहिरीवरील हा एकमेव आंबा टिकला. छान वाढला.गतवर्षी तीन-चार आंबे लागले होते.शेवटपर्यंत एकही टिकला नाही.त्यामुळं चवही कळली नाही.
यावर्षी या आंब्याला मोहोर लागल्याचं मला दिसलं नाही.विहिरीलगतच हा आंबा असल्याने, इथं दिवसभरात चार-पाच चकरा होतात.सकाळी मी मोटार बंद करण्यासाठी विहीरीवर आलो.तेवढ्यात तिथं नरेशही आला.
या आंब्याच्या वाढीला अडथळा ठरत असलेली चार सीताफळाची झाडं,एक छोट कडुलिंबाचं झाड आणि काही फांद्या काढ,असं मी सांगत होतो..आणि अचानक नरेशचं आणि माझं या आंब्यांवर लक्ष गेलं..मामा,बघा तीन आंबे आहेत याला.
बघून मीही चकीत झालो..मी म्हटलं, इतक्या दिवसात आपल्याला कसे काय दिसले नाहीत हे आंबे? त्याचे फोटो काढून सध्या रुद्रा हटवर असलेल्या एखाद्या आंब्याशी हा जुळतो का बघितलं.बहुतेक वेगळा दिसतोय... कदाचित चार वर्षांपूर्वी वाळलेल्या मारूतीच्या आंब्याचं तर हे रोप नसेल? ... नक्की नाही सांगता येणार.
नरेशला म्हटलं,या तीन आंब्यांना एका सच्छिद्र कापडी पिशवीत बंद करू.हे आंबे टिकणं गरजेचं आहे.हा पिकल्यावर याची चव कळेल व तो कोणता आहे ते लक्षात येईल... रणरणत्या उन्हात या आंब्याने मस्त गारवा दिला.
उन्हामुळं विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली चाललीय.जेमतेम वीस फुट विहीरीत पाणी असेल.पाझरे नावालाच आहेत. शेततळ्यातील पाणी सहा फुट कमी झालयं.बागेला सतत पाणी लागतयं.वासरांसहित सगळी सात जनावरं,सात- आठ माणसं...पाणी लागतंच.उन्हाळ्यात नुसतं पाणी बघितलं तरी समाधान वाटतं.बराचवेळ नरेशसोबत पाण्यावर बोलत होतो.
विहीर ७२ फुट खोल घातली, विहिरीचं पुनर्भरण केलं. पाच-सहा बोअरवेल घेतल्या.त्यातली फक्त एक बोअरवेल डिसेंबर पर्यंत चालते.पाण्याची खरी गरज वाढते ती मे,जून महिन्यात.सगळ्यांनाच जादा पाणी हवं असतं...आणि इथं टंचाई सुरू होते.
आम्ही पाण्याचा एक थेंबही वाया घालवत नाही.आमचं सांडपाणी झाडांनाच जातं. आता सगळीचं झाड मोठी झालीत.पण ही झाडं हलक्या, खडकाळ जमिनीत आहेत.त्यांना वरवर पाणी द्यावं लागतंच.
आज गावातील माझे इलेक्ट्रिशियन मित्र भोसले शेतात आले होते.त्यांच्यासोबत बोअरवेल,पाणी,पाणाडी यावर मस्त चर्चा झाली.समारोप करताना भोसले म्हणाले,पाणी लागणं हा नशिबाचा खेळ आहे बघा साहेब ! मी म्हटलं,तसं असेलही कदाचित पण पाणी साठवून ठेवणं ,सांभाळणं आपल्या हातात आहे ,तेवढं तरी आम्ही करतोच!
काही वेळापूर्वी मी नरेशला गंमतीने म्हटलं,तु रात्रीच म्हटला होतास की,दोन दिवस आराम करा. तो म्हटला,मी तुम्हाला कामासाठी कुठं बोलावलो.. मी म्हटलं, तु बोलवलं नाहीस हे खरयं पण लक्ष्मी बागेतील फुलझाडं मला म्हणत होती... आम्हाला पाणी पाहिजे.
आज सकाळी सगळ्या फुलझाडांना पोटभर पाणी पाजलं तेव्हा मन शांत झालं...
समारोप करताना मी म्हटलं, रुद्रा हटवर दिवसा आरामात पडून राहाणं शक्य नाही..झाडं बोलावतात.काम आपोआप दिसतं.ते ही सांगत...हे कर,ते कर....
काम करणं हेच तर आपलं आवडीचं जगणं आहे.ते सोडलं तर आनंद कुठून आणायचा?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.