
नागपूर ः यशदाच्या धर्तीवर नागपुरात महाराष्ट्र प्रशिक्षण केंद्र (महारुद्र) स्थापन केले जाणार आहे. राज्यातील एक लाख ९२ हजार सरपंच तसेच ग्रामविकास विभागाशी संबंधितांच्या प्रशिक्षणाची सोय या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
मुनगंटीवार म्हणाले, ‘‘या राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्राकरिता १०० एकर जागेचा शोध घेतला जात आहे. त्या संदर्भातील सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांना देण्यात आल्या आहेत. या प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातूनही प्रशिक्षणाची सोय राहील. प्रशिक्षणार्थीच्या निवासासाठी आमदार निवास येथील व्यवस्था अपग्रेड करण्याचे प्रस्तावीत आहे. ग्रामविकास खात्याची ही योजना असून, सांस्कृतिक विभाग नोडल एजन्सी म्हणून हा प्रकल्प साकारणार आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.’’ यासोबतच चंद्रपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाचे स्कील डेव्हलपमेंट उपकेंद्र उभारण्यासाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाला कायदा करावा लागेल. येत्या हिवाळी अधिवेशनात किंवा मार्च २०२३ मधील अधिवेशनात संबंधित कायदा मंजूर केला जाईल. ट्रायल दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठाला केंद्र सरकारच्या आदिवासी खात्याचा निधी तसेच आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असेही त्यांनी सांगितले.
आशा भोसले महाराष्ट्र भूषण
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार नागपुरात हिवाळी अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. २९) तो प्रदान करण्यात येईल. यानिमित्त यशवंत स्टेडियम येथे दोनदिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.