climate change
climate change Agrowon
ॲग्रो विशेष

climate change : वातावरण बदलाच्या संकटाचा विळखा

Team Agrowon

- निलिमा जोरावर

दिवाळी (Diwali) पार पडली. सणाचा उत्साह आणि उन्माद दोन्हीही पहावयास मिळाले. आधीच प्रदूषित असलेल्या शहरांत आणि गावातही मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून लोकांनी हवेच्या प्रदूषणात (Pollution) भर घातली. रस्त्यावर विखुरलेले कागदांचे तुकडे पाहून यासाठी किती झाडांची कत्तल झाली असेल, याची जाणीव झाली. हवेतील धुरामुळे दारे-खिडक्या बंद करून बसणे अपरिहार्य होते. दम्याचा त्रास असणाऱ्यांची भूक मंदावली, वेळोवेळी श्‍वास घेण्यासाठी यंत्राचा वापर करावा लागत होता. आणि हे बाहेरच्या हवेमुळे झाले असे डॉक्टरांचे म्हणणे. माणसांप्रमाणेच आजारी झालेल्या आपल्याच घराचा म्हणजेच पृथ्वी, वसुंधरा हिचा विचार आपण करणार आहोत का?

विकासाच्या कथेत सतत प्रगतिपथावर असलेल्या एका देशाच्या राजधानीच्या शहराची ही कथा. ३००० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या शहराला गेले ८०० वर्ष राजधानीचा दर्जा मिळालेला आहे. तीन बाजूंनी उंच पर्वतरांगा आणि उरलेल्या बाजूने शहराभोवती बांधलेल्या मोठ्या भिंती यामुळे येथील राज्यकर्त्यांना राहण्यासाठी हे सुरक्षित शहर होते. सध्या या शहराची लोकसंख्या अडीच करोड असून, जगातले दुसऱ्या क्रमांकाची मोठी लोकसंख्या असणारे शहर आहे. सगळीकडून जोडणारे रस्त्यांचे, रेल्वेचे जाळे इथे मोठ्या प्रमाणात आहेच शिवाय जगातले दुसऱ्या क्रमांकाचे प्रवासी यातायात असणारे विमानतळ येथे आहे.

इतक्या मोठ्या लोकसंख्येला राहण्यासाठी तसेच कंपन्या वगैरेंसाठी अनेक गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या आहेत. चांगल्या दर्जाचे ८० विद्यापीठ या एकट्या शहरात आहेत. हे सर्व उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून, प्रसंगी तंत्रज्ञानाचा वापर करून अवाढव्य व तितकेच धोकादायक रस्ते तयार केले गेले आहे.

याचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले...

१) हवेच्या प्रदूषणातून वाचण्यासाठी श्रीमंत लोकांनी प्रदूषण निवळवणारी यंत्रे आपल्या घरात बसवली आहेत. काही अति श्रीमंतानी आपल्या घरांच्या बागेतही अशी यंत्रे बसवली आहेत. तर इथल्या आंतरराष्ट्रीय शाळांनी शाळेभोवती, मैदानाभोवती मोठे घुमट बांधून प्रदूषणापासून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच ही चैन इतर सर्व गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांना परवडण्याजोगी नाही. किंवा इतर सर्वच शाळांनाही असे मोठे घुमट बांधणे परवडणार नाही.

२) अचानक रस्ता खचून मोटारी इथे गायब होऊ शकतात. जमिनीतील पाण्याचा प्रचंड वापर इथे झाला आहे. त्यामुळे जमिनीत तयार झालेल्या पोकळी आणि भगदाड पडलेले डोंगर आणि प्रचंड इमारती व लोकसंख्येचा बोजा यामुळे काय परिणाम होणार आहेत हे भविष्यकाळ ठरवेलच. पण सध्या इथे पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच वादळ देखील. (एका लेखामध्ये हे शहर दरवर्षी जमिनीच्या आत धसत आहे असा दावा केला आहे, पण या विधानाला दुजोरा मिळू शकला नाही.) पण इथे भूस्खलनाचे (landslide) प्रमाणही लक्षणीय आहे. गेल्या ३० वर्षांत आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करण्यास सुरुवात केलेल्या चीनमधील बीजिंग शहराची ही स्थिती.

देवभूमी समजल्या जाणाऱ्या भारतातील केरळ राज्य. समृद्ध पश्‍चिम घाटातील डोंगर खोऱ्यांनी व्यापलेला प्रदेश. या डोंगरांवर समृद्ध वर्षावने आहेत. २०१८ मध्ये येथे अभूतपर्व असा पाऊस झाला. पावसाळ्यात एकूण पडणाऱ्या नियमित पावसापेक्षा हा फक्त १५ दिवसांत पडलेला पाऊस प्रचंड प्रमाणात झाला. धरणांच्या क्षमता संपून गेल्या. अतिरिक्त पाण्याचा साठा धरणांच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला. राज्यातील ३० पेक्षा जास्त धरणांतून मोठा विसर्ग झाला आणि केरळच्या १४ जिल्ह्यांत पुराने हाहाकार माजवला. सगळीकडे पाणी पाणी झाले. विशेष म्हणजे हा असा पाऊस पडणार आहे, याची कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. हा पाऊस कधी थांबणार याचीही माहिती नव्हती. अशा परिस्थितीत तेथे उद्‍भवलेल्या समस्येची नैसर्गिक व मानवनिर्मित कारणे समजावून सांगितली पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत अनियंत्रित पर्यटन, नदी नाल्यांच्या काठाला, समुद्र किनाऱ्यांवर झालेली अवाढव्य बेकायदेशीर बांधकामे आणि पोखरलेल्या डोंगररांगा व एकाच वेळी मोठ्या प्रमाणात धरणांतून झालेला विसर्ग यामुळे ही आपत्ती ओढवली.

साल २०२२, ऑगस्ट महिना. जागतिक महासत्ता बनलेल्या चीन देशात, उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पूर आला तर दक्षिण भागात कोरडा दुष्काळ पडला. आशिया खंडातील सर्वांत मोठी असणारी ‘यांग त्से’ नदी, चीनच्या आर्थिक उत्पन्नातील एक तृतीयांश वाटा असणारे शांघाय शहर आणि मोठमोठे जलविद्युत प्रकल्प व औद्योगिक प्रकल्प या भागात आहे. गेल्या चार वर्षांत यांग त्से नदीचे पाणी सततच्या दुष्काळामुळे ४० टक्के कमी झाले आहे. यंदाच्या दुष्काळामुळे तर पाण्याचे दुर्भिक्ष इतके वाढले आहे, की हजारो लोकांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक जलविद्युत, औद्योगिक प्रकल्प बंद करावे लागले. जलविद्युत प्रकल्प बंद झाल्यामुळे विजेची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे घरगुती आणि दुकानांचा वीजपुरवठा कमी करण्यात आला. दुष्काळाच्या चटक्यामुळे उष्णतेचा पारा प्रचंड वाढलेला असतानाही विजेच्या समस्यांमुळे माणसाने बनवलेली उपकरणे निकामी ठरली. उष्णतेची लाट निर्माण झाली. अन्नसुरक्षेचा प्रश्‍नदेखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या आणि अशा अनेक समस्या गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. साल २०२० हे उच्चांकी तापमान वाढीसाठी मागच्या अनेक वर्षांचा विक्रम मोडणारे ठरले आहे. या सर्व घटना मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न बिकट करणाऱ्या ठरू शकतात. माणसाने त्याच्या सुखसोयी आणि चंगळवादी वृत्तीची जोपासना करत विकास नावाच्या संकल्पनेला जो जन्म दिला, त्याचे हे फलित असेल का? विकास करणे म्हणजे नेमके काय? निसर्गाची मूलभूत रचनाच बदलवून कृत्रिम जग उभे करणे आहे का?

सुंदर हिरव्या डोंगरराजी, निळे मुक्त आभाळ, नदीचे खळाळणे, पक्ष्यांचे मुक्त गुंजन आणि निसर्गाचा अद्‍भुत सहवास याने माणूस प्रसन्न होतो, समाधानी होतो. पण त्याच हिरव्या डोंगरांत सिमेंटचे पांढरे इमारती जंगल उभे राहते तेव्हा डोंगरांना कुरूपता येते. आकाशात गगनचुंबी इमारती दिसू लागतात किंवा धूर फेकणाऱ्या चिमण्या अखंड काळा धूर सोडू लागतात तेव्हा डोळे व हृदय दोन्हीही होरपळते. नदीचे रूपांतर घाणेरडा वास येणाऱ्या नाल्यांमध्ये होते. जिची माता म्हणून पूजा केली जाते त्याच नदीचा गळा घोटला जातो. तेथे ना मासे, ना जलजंतू! फक्त काळी विषारी रसायने वाहून नेणारी एक धारा तेथे उरते.

गेल्या काही वर्षांत दिल्लीमध्ये प्रदूषणाचे धुके येत आहे. इतर शहरांतही हवेची गुणवत्ता फारशी चांगली नाही. चंद्रपूर हे महाराष्ट्रातील शहर भारताच्या प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे. वाढत्या तापमानापासून बचावासाठी घरोघरी वातानुकुलीत यंत्रे बसवली आहेत. माझ्या माहितीनुसार, मुंबई सारख्या शहरांतही काही ठिकाणी (कंपन्या आणि खासगी घर) एयर प्युरिफायर बसवले गेले आहेतच.

आता थोडं अजून जमिनीवर येऊया! मी ज्या घटना प्रातिनिधिक मांडल्या आहेत, त्या सर्व ‘जागतिक तापमान बदल’ या पुढ्यात थकलेल्या समस्येचा परिणाम आहेत, असे जगभर मानले जातेय. अतिरेकी पाऊस, अतिरेकी उष्णता, अतिरेकी दुष्काळ आणि सर्वच काही अनियमित व अनपेक्षित असे वातावरणातील चढ-उतार पाहावयास मिळतील, चक्रीवादळांची संख्या वाढेल, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल अशा अनेक गोष्टींबद्दल गेले काही वर्ष बोलले जात आहे. पण आम्ही जेव्हा आमच्या घरांत सुखरूप असतो, तेव्हा आम्हाला त्याची फारशी जाणीव होत नाही. पण या सगळ्याचा फटका आमच्या शेतीव्यवस्थेवर झाला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ऋतुचक्र बदललेले आहे. पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनावरांचे आजार वाढले आहेत. त्यातून अन्नधान्य-दुध-भाजीपाला यात महागाई शिगेला पोहचली आहे. शेतातले पिके नासत आहेत. हे सर्व आपल्याच तर डोळ्यासमोर होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

Indian Farmer : बळीराजा जागा हो...

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

SCROLL FOR NEXT