Inter Cropping  Agrowon
ॲग्रो विशेष

Inter Cropping : हरभरा-ज्वारी पद्धती ठरली फायदेशीर

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

चंद्रकांत जाधव

Rabbi Cropping Pattern : ममुराबाद (ता.जि.जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी मनोज चौधरी यांनी हरभरा आणि त्यात ज्वारी अशा पध्दतीचा अवलंब करून ती यशस्वी केली आहे. पक्षीथांबा, धान्य व कडबा अशा विविध अंगांनी ज्वारीचा त्यांना उपयोग होतो. शिवाय ज्वारी, हरभरा, गव्हाचे बीजोत्पादन घेऊनही शेतीतील नफ्यात मनोज यांनी चांगली वाढ केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथे मनोज सदाशिव चौधरी यांची १२ एकर शेती आहे.
भाडेतत्वावर ते ४० एकर शेती करतात. सिंचनासाठी तीन कूपनलिका व दोन कृषीपंप आहेत. एक छोटा व एक मोठा असे दोन ट्रॅक्टर्स आहेत. सुमारे ३० वर्षांपासून मनोज ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर करण्यासह भाडेतत्वावर देखील त्यांचा व्यवसाय करतात.

सन १९९६ मध्ये परिसरात सर्वप्रथम त्यांनी गावात हार्वेस्टर आणला. रोटाव्हेटर घेतला. आत्तापर्यंत सात मोठे ट्रॅक्टरही वापरले आहेत. ट्रॅक्टरमधील बिघाड ओळखणे, त्याची दुरुस्ती करणे यातही ते पारंगत आहेत. रसायन अभियांत्रिकीच्या पदविकेचे शिक्षण घेण्यास त्यांनी सुरवात केली होती. पण काही कारणाने ते पूर्ण करता आले नाही. पूर्णवेळ शेतीतच त्यांनी यशस्वी करिअर केले आहे.

मनोज यांची प्रयोगशील शेती

जमीन काळी कसदार आहे. कापूस (१० एकर), सोयाबीन (१० एकर), उडीद ही खरिपात तर रब्बीत हरभरा, दादर ज्वारी ही मुख्य पिके मनोज घेतात. हरभरा पिकात मिश्र पीक म्हणून संकरित दादर ज्वारीचे यशस्वी उत्पादनही ते अनेक वर्षे साध्य करीत आहे. सुबाभूळ १० एकर, ज्यूट १० एकर ही पिकेही ते धेतात.

खरिपात कुठल्याही एका पिकावर ते अवलंबून नसतात. विविध पिकांची समान पेरणी करण्यावर भर असतो. कारण अतिपाऊस, कमी पाऊस आदी धोके आणि बाजाराची चाल लक्षात घेऊन त्यांचे पीकनिवड व क्षेत्राचे नियोजन असते. उडीद, सोयाबीन या पिकांखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात रब्बी पिके घेतात.

हरभऱ्यात ज्वारी

दरवर्षी पाच ते सात एकरांत हरभरा असतो. त्यासाठी काळ्य कसदार जमिनीची निवड होते.
कारण अल्प पाण्यावर त्यात पीक जोमात येते. या क्षेत्रात आधी उडदासारखे पीक असते. त्याचे अवशेष जमिनीत गाडून पूर्वमशागत केली जाते. ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणी केली जाते. दसरा सणापूर्वी हे नियोजन पूर्ण होते. कारण या काळात अधिकची थंडी नसते. शिवाय जमिनीत वाफसा असतो. यामुळे पेरणी सिंचनाशिवाय यशस्वी होते. हरभऱ्याचे एकरी २० किलो बियाणे वापरले जाते.

त्यात दादर ज्वारीच्या १५० ते २५० ग्रॅम पर्यंत बियाण्याचा वापर होतो. मनोज ज्वारीचे बीजोत्पादनही घेतात मात्र हे पीक स्वतंत्र असते. हरभऱ्यात ज्वारी घेताना काही वेळेस त्याचे प्रमाण अधिक झाल्यास उगवणीनंतर विरळणी केली जाते. कारण पुढे हरभरा पिकात सूर्यप्रकाश हवा तसा येत नाही. मुख्य पीक वाढीवर परिणाम होतो.

काही वेळेस दाणे बारीक होणे, पिकात तूट येणे असे प्रकारही होतात असे निरीक्षण मनोज यांचे आहे. दोन्ही पिके सुमारे चार महिन्यांच्या कालावधीची आहेत. उपलब्ध ओलाव्यावरच पेरणी असल्याने त्यावेळी सिंचन केले जात नाही. पुढे वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत एक किंवा दोन वेळाच सिंचन केले जाते. रासायनिक खतांचा वापरही कमीतकमी केला जातो.

पक्षी थांब्यासाठी उपयोग

ममुराबाद व परिसर कोरडवाहू क्षेत्रातील दादर ज्वारी, हरभरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागात सर्वत्र दादर ज्वारी दिसते. हरभऱ्यातील दादर ज्वारीचा उपयोग मनोज यांना पक्षी थांब्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. ज्वारीवर येणारे पक्षी हरभरा पिकातील अळ्या, किटकांचा नायनाट करतात. यामुळे किमान दोन फवारण्यांवरील एकरी प्रत्येकी १२०० रुपये खर्च वाचतो.

धान्यासह कडबा उत्पादन

हरभऱ्याचे एकरी सहा ते कमाल १२ क्विंटल तर दादर ज्वारीचे दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळते. ज्वारीचा सकस कडबा एकरी २५ पेंड्या व हरभऱ्याचे काड घरच्या जनावरांसाठी चारा म्हणून उपलब्ध होते. मागील वर्षी हरभऱ्यातील ज्वारीच्या ओल्या कणसांची हुरडा म्हणूनही विक्री करून त्यातून मनोज यांनी नफा मिळविला होता. दादर ज्वारीचा कडबा सर्वात महाग असतो. त्यास मोठा उठाव परिसरात किंवा खानदेशात आहे.

हरभऱ्याचे काडही दूध उत्पादक थेट जागेवर येऊन खरेदी करतात. अलीकडे कापणी, मळणीचा खर्च वाढला आहे. मजूरटंचाई देखील असते. यामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्वारीस प्रति क्विंटल तीनहजार ते चारहजार रुपये तर पेंडीस पाचहजार रुपये प्रति शेकडा दर मिळत आहे.

बीजोत्पादनातून २५ टक्के अधिक फायदा

मनोज ज्वारी, हरभरा, गहू आदींचे बीजोत्पादन करतात. त्यातून २० ते २५ टक्के अधिक नफा मिळतो. मागील वेळेस ४६०० रुपये प्रति क्विंटल दर दादर ज्वारीला संबंधित बियाणे कंपनीने दिला होता. त्यावेळी बाजारातील दर ३२०० ते ३६०० रुपये होता. त्याचप्रमाणे हरभऱ्यास सहाहजार ते सातहजार रुपये दर बीजोत्पादनासाठी मिळाला. बाजारातील दर त्यावेळी ४२०० रुपये होता.

बीबीएफ यंत्र वापरात हातखंडा
मनोज मागील पाच वर्षे खरिपातील व अन्य पिकांची पेरणी बीबीएफ तंत्राने करीत आहेत.
या तंत्राचा उत्तम उपयोग केल्यासंबंधी ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) त्यांचा सत्कार केला आहे. मनोज सांगतात की ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राद्वारे सुमारे १८ पिकांची पेरणी शक्य आहे. त्यात कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, तीळ आदींचा समावेश आहे.

शिवाय आंतरपिकेही याच यंत्रणेद्वारे घेता येतात. त्यातून श्रम, वेळ व बियाणे वापरातही बचत होते. केव्हीकेचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) वैभव सूर्यवंशी, विशाल वैरागर, किरण जाधव तसेच कृषी विभागाचे मार्गदर्शन त्यांना मिळते. दोन वर्षे नैसर्गिक समस्या किंवा कमी- अधिक पाऊस असतानादेखील एकरी पाच क्विंटलपर्यंत तर कापसाचे एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन मनोज यांना साध्य करता आले आहे.

मनोज चौधरी - ९९२२०५९४९४, ९४२२१९३०६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

Cotton Soybean Subsidy : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसाह्यासाठी ई-केवायसी करावी

Soybean Market : सोयाबीनसाठी लातुरात जिल्ह्यात चौदा खरेदी केंद्रे मंजूर

SCROLL FOR NEXT