Bharat Jodo Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचे यश टिकवण्याचे आव्हान

‘भारत जोडो’ यात्रेची सांगता होताना देशातील तेरा विरोधी पक्ष सहभागी होत आहेत. यात्रेपूर्वी देशात विरोधक नाहीतच, अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेनंतर हे चित्र बदललेले दिसते. आता आव्हान आहे ते यात्रेत निर्माण झालेला हुरूप टिकवण्याचे.

विकास झाडे

अखेर राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेची (Bharat Jodo Yatra) संकल्पपूर्ती झाली. अनेकदा धो-धो पाऊस अंगावर घेत सात सप्टेंबरला कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या पदयात्रेने साडेतीन हजार कि.मी.चा पल्ला गाठून काश्मिरात पदयात्रेची सांगता झाली.

या यात्रेची नोंद इतिहासात होणार आहे. तब्बल पाच महिने पायी चालणे गंमत नाही. जम्मू-काश्मिरात सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी शक्यता आधीच व्यक्त करण्यात येत होती. शुक्रवारी झालेही तसेच.

जम्मूतील बनिहालमधून सुरू झालेली यात्रा काश्मीर खोऱ्याच्या (Kashmir Valley) काझीगुंड भागात प्रवेश करीत असताना लोकांनी सुरक्षाकडे भेदत राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षेतील पोलिस गायब झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. राहुल गांधींना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

यात्रा दिल्लीत असतानाही पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. दिल्ली आणि जम्मू-काश्मिरात कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे मोदी सरकारला लक्ष्य करण्याची संधी विरोधकांना आयतीच मिळाली.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षेकडे लक्ष देण्याची विनंती करताना संशयही व्यक्त केला आहे. अन्य राज्यांप्रमाणे इथेही ‘भारत जोडो’चे स्वागत झाले.

२०१६मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या ‘जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षा’च्या मेहबूबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांचा यात्रेतील सहभाग ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ इतका ओसंडून वाहणारा होता.

अर्थात, या यात्रेने मोदी विरोधकांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली. जम्मू-काश्मिरातील कलम ३७० रद्द केल्यानंतर या राज्यातील नागरिकांनी प्रथमच भयमुक्त होत राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’त सहभाग घेतला.

रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली. सातत्याने अन्याय होत असलेले पंडित राहुल गांधींना भेटले. कलम रद्द करूनही खोऱ्यातील स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे सांगत राहुल गांधींत आशेचा किरण शोधू लागले.

बेरोजगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न

आज या यात्रेची सांगता होताना देशातील १३ विरोधी पक्ष त्यात सहभागी होत आहेत. यात्रेपूर्वी देशात विरोधक नाहीतच, अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले होते. यात्रेनंतर ते बदललेले दिसते. देशातील स्वयंसेवी संस्था, कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आदी या यात्रेत सहभागी झाले होते.

याचा अर्थ देशात सर्व काही आलबेल नाही. परिवर्तनाची आस असल्याने लोक उत्स्फूर्तपणे राहुल गांधींना भेटत होते. बेरोजगारांमध्ये निराशा आहे. परदेशातील भारतीयांच्या नोकऱ्या जात आहेत. अनेक तरुण भारतात परत येत आहेत.

जे उत्तम शिक्षण घेत पदवीधर झालेत, ते बेरोजगार म्हणून फिरताहेत. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या धाकट्या भावंडांना आपल्या मोठ्या भावाची समाजात होणारी उपेक्षा पाहण्याची वेळ आली आहे.

आपल्यावरही हीच परिस्थिती ओढवण्याची भीती त्यांच्यात आहे. त्यांना धीर देण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. अजून सगळं काही संपलेलं नाही, ही आशा त्यांच्यात जागवण्यात आली आहे.

मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’चा नारा देत यांत्रिक ‘बब्बर शेर’चा लोगो प्रकाशित केला होता. परंतु सरकारला हा उपक्रम झेपला नाही. सिंह केव्हा गायब झाला हे कळलेही नाही. उद्योगाला चालना मिळावी आणि बेकारांच्या हाताला काम मिळावे हा त्यामागचा हेतू होता.

हाच धागा पकडत राहुल गांधींनी ‘भारत जोडो’तून तरुणांना निराशेतून बाहेर काढताना त्यांच्यात असलेल्या कौशल्याकडे वळण्याचा सल्ला दिला. प्रतिकूल परिस्थितीत आशेकडे नेणारा एक किरण भारत जोडोतून दिसून आल्याच्या जनसामान्यांच्या भावना आहेत.

ज्यांना देशात बदल व्हावा, या देशात धर्मनिरपेक्षता शिल्लक राहावी, असे वाटत होते ते सगळेच आपले बंध सोडून यात्रेत सहभागी झाले होते. महागड्या मोटारगाडीतून नेते लोकांपर्यंत पोहोचले, तर त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही, उलट त्यांच्याकडे द्वेषाने पाहिले जाते.

राहुल गांधी पायी चालत गेले. बांधावर शेतकऱ्यांना भेटले. कामगार, विद्यार्थी, महिला, वरिष्ठ नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकल्या, प्रश्‍न जाणून घेतले. लोकांमध्ये त्यांनी हुरूप निर्माण केला. असे असले तरी ते टिकवून ठेवणे हे काँगेसपुढे खूप मोठे आव्हान आहे.

‘भारत जोडो यात्रे’च्या काळातच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक झाली. खर्गे अध्यक्ष झाले. तीन महिने झाले; परंतु ते राजस्थानमधील गुंता सोडवू शकले नाहीत. राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करूनही गहलोत-पायलट यांच्यातील युद्ध शमले नाही. महाराष्ट्रातील कॉँग्रेसचे काही नेते भाजपात केव्हाही जाऊ शकतात अशी स्थिती आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे ज्येष्ठ नेत्यांशी सूर जुळत नाहीत. प्रत्येक राज्यातच काँग्रेसची स्थिती थोड्याफार फरकाने सारखीच आहे. अध्यक्ष असूनही पक्षावर खर्गेंचा फारसा प्रभाव नाही. सर्व सूत्रे के. सी. वेणुगोपाल यांच्या हाती असल्याचे काँग्रेसचे नेतेच सांगतात. ते राहुल गांधीच्या जवळचे आहेत.

ज्या राज्यांतून ‘भारत जोडो यात्रा’ गेली, त्यानंतर तिथल्या प्रदेश कॉँग्रेस संघटनांनी राज्यात पक्ष बळकट होण्यासाठी काय केले? उत्तर निराशाजनक आहे. काँगेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी संघटनात्मक बांधणीचे काम करण्याची गरज आहे.

‘२४, अकबर रोड’ येथे ‘साफसफाई’ करावी लागेल. पण त्याचे अधिकार खर्गेंना आहेत का?. २६ जानेवारीपासून काँग्रेसचे ‘हात से हात जोडो’ अभियान तीन महिने राबविले जाणार आहे.

यात मोदी सरकारच्या अपयशाबाबत राहुल गांधींचे म्हणणे घरोघरी पोचविण्याचा प्रयत्न व्हावा, असा विचार आहे. पण गांधी परिवारासमोर चमकोगिरी करणारे किती नेते दारोदारी जातात, तेही पाहावे लागेल.

‘भारत जोडो’च्या निमित्ताने लोकांमध्ये आशा पल्लवीत झाल्या आहेत, त्या टिकून राहण्यासाठी काँग्रेस पक्ष उभा राहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, सर्व मेहनतीवर पाणी फिरवले जाईल. मोदींचा झंझावात थोपवणे काँग्रेससाठी सोपे नाही.

२००९मध्ये काँग्रेसकडे असलेली मध्यमवर्गातील मोठ्या प्रमाणातील मते २०१४ मध्ये भाजपकडे वळली. २०१९मध्ये त्यात भर पडली, ती केवळ मोदींच्या नावावरच. ही मते परत वळविण्यासाठी काँग्रेसला डावपेच आखावे लागणार आहेत.

मतदारही आता हुशार झाला आहे. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांच्या दिवशीच ओडिशाच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

मतदारांनी एकाच वेळी राज्यासाठी नवीन पटनाईक यांच्या नावावर बिजू जनता दलाला मते दिली, तर लोकसभेसाठी मोदींच्या नावावर भाजपला. त्यामुळे लोकसभेत भाजप एका जागेवरून आठवर गेली आणि ‘बीजेडी’च्या आठ जागा कमी झाल्या.

एकाच वेळी निवडणूक असली तरी मतदारांच्या डोक्यात देशाचे आणि राज्याबाबतचे गणित वेगळे असते. ‘भारत जोडो’मुळे काँग्रेसचे भाकीत आताच करता येणार नाही. परंतु एक झालं, राहुल गांधींकडे आश्‍वासक नेता म्हणून पाहिले जात आहे.

त्याची छाप याच वर्षात कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांत होणाऱ्या निवडणुकीत पडते का, ते पाहावे लागेल. बाजूने कल आला तरच साडेतीन हजार कि.मी. लांबीच्या ‘भारत जोडो’ यात्रेतील खोलीचेही दर्शन होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT