Pune News : राज्यात शुक्रवारी (ता. १०) झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने फळपिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे. ठिकठिकाणी ओढे, नाले ओसंडून वाहिले. विशेषतः नाशिकसह पुणे, नगर, सातारा आणि अकोला जिल्ह्यांना तडाखा बसला. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्यात सिन्नर, दिंडोरी, कळवण व चांदवड तालुक्यांत वादळी पावसाने भाजीपाला पिकांची व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दैना केली. तुफान वादळी पावसाने पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाढेगाव भागात भाजीपाला आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले. नाले दुथडी भरून वाहिले. काढणी केलेला कोबी, फ्लॉवर, टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. बांबू आणि तारा तुटल्याने या बागा भुईसपाट झाल्या. उन्हात ठेवलेला कांदा भिजला. आंबा, द्राक्षबागांचे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात धोडंबे, कानमंडाळे, कुडांणे येथे घरांचे, शेडनेट, पोल्ट्री फार्म यांचे नुकसान झाले.
पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शहरासह उपनगरांत तसेच जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले. लोहगाव परिसरात हंगामातील सर्वाधिक ५९.८ मिमी पावसाची नोंद झाली, तर वडगावशेरी, शिवाजीनगर भागांत सर्वाधिक पाऊस झाला. गुळंचवाडीतील तुकाराम देवकर, गणपत देवकर, सुभाष देवकर, रामदास देवकर, शिवाजी कोतवाल यांच्या आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले.
नगर जिल्ह्यात सखोल भागात पाणी साचले. ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर, रोहित्रांवर पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला. आंबा व अन्य फळपिके तसेच भाजीपाला, कांदा उत्पादकांना काहीसा फटका बसला. अकोले तालुक्यात राजूर- मोहंडुळवाडी शिवारातील शेतकरी पंढरीनाथ जयवंत मुर्तडक (वय ७४) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी परिसराला वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शाळेसह, दुकानगाळे आणि घरांवरील छप्पर वादळात उडून गेली. रस्त्यांवर तसेच वाहनावर झाडे मोडून पडली. विजेचे खांब कोसळल्याने विभागातील वीजपुरवठा खंडित झाला. साधारणपणे दीड तास झालेल्या पावसाने अनेक ठिकाणचे ओढे-नाले दुथडी भरून वाहिले. वादळाने आंब्याचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडांखाली कैऱ्यांचा अक्षरशः सडा पडला.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात श्रीधर जवळा येथे वीज पडल्याने तीन जनावरे दगावली. टेंभुर्णी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आडगाव भूमे, पाथ्री, निधोना, वाहेगाव, बाबरा, भालगाव, फरशी, वडोद बाजार आदी परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी पाऊस झाला. अकोला, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर व इतर तालुक्यांत वादळाचा फटका बसला. मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. काही घरांवरील टीनपत्रे उडाले. संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी आदी पिकांचे थोडेफार नुकसान झाले.
थोडक्यात महत्त्वाचे...
नाशिक जिल्ह्यात भाजीपाला, कांदा उत्पादकांना फटका; पोल्ट्री शेडचे नुकसान
पुण्यात शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस
नगर जिल्ह्यात अकोल्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
साताऱ्यातील ढेबेवाडी परिसरात वादळी पावसाचा तडाखा, शनिवारीही हजेरी
अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगरलाही फटका
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.