Crop Damage : बागा करपल्या, भाजीपाला उगवण मंदावली

Summer Heat : तापमान वाढीचा थेट परिणाम मराठवाड्यातील महत्त्वाच्या फळ पिकांसह भाजीपाला पिकांवर होत आहे. आधीच पाणीटंचाई त्यात उन्हाची काहिली यामुळे अनेकांना आपल्या बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : तापमान वाढीचा थेट परिणाम मराठवाड्यातील महत्त्वाच्या फळ पिकांसह भाजीपाला पिकांवर होत आहे. आधीच पाणीटंचाई त्यात उन्हाची काहिली यामुळे अनेकांना आपल्या बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे.

ज्या बागा फळात आहेत, त्या जगविण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. दुसरीकडे आधीच मोठ्या प्रमाणात क्षेत्रात घट झाली असताना भाजीपाला उगवण व वाढीचा वेगही प्रचंड मंदावला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्रात ५ ते ९ मे दरम्यान जमिनीच्या १० सेंटिमीटरच्या थरातील तापमान सरासरी ३७.२ ते ३७.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव लातूर या पाच जिल्ह्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळिंब, आंबा आदी फळ पिकांसह ऊस, भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. या पिकांवर प्रखर सूर्यप्रकाश, उष्ण वारे, कोरडी हवा यांचा विपरीत परिणाम होतो आहे.

Crop Damage
Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

फळ पिकांमध्ये वाढत्या तापमानाचे परिणाम

- सर्वच फळपिकांत बहराच्या काळात मोठी फूल- फळ गळ

- पुरेसे पाणी मिळत नसल्याने रोपांतर्गत आंतरशाखीय प्रक्रियेत बिघाड

- परिणामी फळपिकांत अन्ननिर्मिती कमी होऊन वाढीवर - उत्पादनावर परिणाम

- फळांना इजा होऊन ती विक्री योग्य राहत नाहीत

- बहरात बिघाड निर्माण होऊन अपेक्षित उत्पादन मिळत नाही

- फळांचा हंगाम मागेपुढे होत असून फळांचा आकार, प्रत व चव यावर परिणाम

- फळझाडांचे आयुर्मान कमी होण्याचा धोका

- फळझाडांच्या पेशीत संजीवकांचे असंतुलन

छत्रपती संभाजीनगरचे तापमान (तुलनात्मक)

छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्रातील नोंदीनुसार एप्रिल २०२३ मधील सरासरी कमाल तापमान ३४.७७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.४८ अंश सेल्सिअस होते. एप्रिल २०२४ मध्ये सरासरी कमल तापमान ३३.२६ तर किमान २२.३८ अंश सेल्सिअस राहिले. मेच्या पहिल्या आठवड्यात २०२३ मध्ये कमाल तापमान ३८.२५, तर किमान तापमान २१.०७ अंश सेल्सिअस होते. मी २०२४ मध्ये पहिल्या आठवड्यात सरासरी कमाल तापमान ३३.२६ तर किमान २२.३८ अंश सेल्सिअस राहिले.

Crop Damage
Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

जमिनीचे तापमान

छत्रपती संभाजीनगर केव्हीकेच्या माहितीनुसार, जमिनीचे तापमान १० ते ७० सेंटिमीटर खोलीपर्यंत म्हणजे विविध पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या खोलीनुसार मोजले जाते. एप्रिल २०२३ व एप्रिल २०२४ चा तुलनात्मक विचार करता खोलीनिहाय १ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत जमिनीचे सरासरी तापमान यंदा वाढले आहे. दुसरीकडे मे २०२३ मधील पहिल्या आठवड्यातील मोजमापानुसार एक ते चार अंश सेल्सिअसपर्यंत जमिनीच्या तापमानात सरासरी वाढ झाली आहे.

पंधरा दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान आहे. या आठवड्यात तर ते ४३ वर गेले. शिवारातील पाच ते सहा जणांना आपल्या बागा काढून टाकाव्या लागल्या.
- उमेश वाघ, मोसंबी उत्पादक, मैनपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना
तापमान वाढून जमिनीतले पाणी झपाट्याने कमी झाले, जिथे एक किलो बियाण्याला २०० जुडी भाजीपाला निघायचा तिथे पाच किलो निघेना. उगवण शक्ती ४० ते ५० टक्क्यांपर्यंत मंदावली. त्यामुळे उत्पादनात थेट घट झाली आहे.
- रामेश्वर पळसकर, भाजीपाला उत्पादक, पळशी, जि. छत्रपती संभाजीनगर
खोडव्याचा ऊस करपून चालला आहे, ज्या विहिरी तासभर चालायच्या त्या आटल्या, ज्या तीन-चार तास चालायच्या, त्या एक-अर्धा तासावर आल्या. पिण्याचे पाणी भगवावं की उसाला पाणी द्यावं यात अनेकांनी ऊस अवकाळी पाऊस येईल यावर सोडलाय.
शंकर गुळभिले, दिपेवडगाव, ता. केज, जि. बीड.
तापमानवाढीचा परिणाम फळ पिकांवर मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी फळबागा वाचविण्यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व उत्पादनापेक्षा बाग जगविण्यावर भर देण्याची गरज आहे.
- डॉ. संजय पाटील, प्रभारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर
परिस्थिती बिकटच आहे. परंतु शेतकऱ्यांना अशाही स्थितीत फळबागांसह आपली इतर पिके कसे जगवता येतील, याविषयी प्रत्यक्ष बांधावर जाऊन उपाय सुचवत आहोत. ते उपाय शेतकरी अवलंबत आहेत.
- डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com