Shivarmati.com Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : मातीच्या कवितेचे पसायदान

Shivarmati Dot Com : सध्या बदलत चाललेल्या भयानक वास्तवाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी संस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत आहे. या भयानक वास्तवाचा शोध घेणाऱ्या मुकुंद वलेकर यांच्या कवितांचा संग्रह म्हणजेच ‘शिवारमाती डॉट कॉम’.

Team Agrowon

प्रा. डॉ. वामन जाधव

Book Updates : पुस्तकाचे नाव : शिवारमाती डॉट कॉम

कवी : मुकुंद वलेकर,

प्रकाशक : शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा

मूल्य : १५० रुपये

सध्या बदलत चाललेल्या भयानक वास्तवाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी संस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत आहे. या भयानक वास्तवाचा शोध घेणाऱ्या मुकुंद वलेकर यांच्या कवितांचा संग्रह म्हणजेच ‘शिवारमाती डॉट कॉम’. त्यात ‘मातीची थोरवी’, ‘शिवारमातीचं ऑडिट’, ‘मळ्याच्या मातीचं रक्त’, ‘लढा मातीचा’, ‘माती म्हणाली’, ‘आम्ही कुणबी’, ‘रुमणे आणि फाळ’, ‘रुजताना मातीत’, ‘नांगरणी’, ‘अगा पावसा’, ‘वेदनांची शेती’, ‘दुबार पेरणी’,

‘कृषिप्रधान भारत : एक अफवा’, ‘शेतकरी क्रांतिगीत’, ‘स्वप्न शाश्‍वत शेतीचं’, ‘स्मार्ट शेतीतलं स्मार्ट मरण’ या अनेक कवितांमधून बदलत चाललेल्या कृषी संस्कृतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न कवी करतात. शेतकऱ्यांच्या श्रमाचे मूल्य नाकारणाऱ्या व्यवस्थेविषयी कवी म्हणतो,

‘‘मी करावं म्हणतोय सर्व्हिसिंग...

स्वतःचं, शेताचं,

बाजारपेठांचं अन् ...

दर ठरवणाऱ्या

बिनडोक व्यवस्थेचं!’’

खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाने शेतीशी निगडित अनेक प्रश्‍न तयार झाले आहेत. करार शेती, शेतीमाल, बाजार, कृषी माल निर्यात केंद्रे, बियाणे विषयक कायदे, सेझ, औद्योगिक आणि दळणवळण प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन हे एका बाजूला सामान्य नागरिकांना विकासाची स्वप्ने दाखवीत असले तरी त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे.

शेतीशी निगडित परंपरागत व्यवसाय नाहीसे झाले आहेत. कुशल कारागिरांनी शहरांचा रस्ता धरला आहे. शहरामध्ये समृद्धीची सूज दिसत असली, तरी प्रत्येक कोपऱ्यावर झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामीण कुटुंबाची ससेहोलपट सुरू आहे.

मुळातच बेभरवशाचा असलेला शेती व्यवसाय वातावरण बदलामध्ये आणखीन बेभरवशाचा बनत चालला आहे. तरी शेतकरी सारे जगणेच पणाला लावणारा एक प्रकारचा जुगार खेळतो. प्रत्येक वेळी मॉन्सून नावाचा अवलिया जादूगार वेगळीच कोणतीही तरी गोष्ट पोतडीतून काढून त्याचा आश्‍चर्याचा धक्का देतो. आधीच खोलात असलेला बुडत्याचा पाय रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. अशा शेतकऱ्यांचे कष्टमय व संघर्षपूर्ण जीवन हाच या या कवितांचा आत्मा आहे. ‘‘शेती मातीचा विटाळ आणि टाळाटाळ करणाऱ्यांनो...

डाउनलोड करून खाता येते का पाहा भाकरी?

आणि जगता येते का पाहा डिलिट मारून शेतकरी?’’ असा प्रश्‍न कवी डिजिटल व्यवस्थेत डुंबणाऱ्या समाजाला विचारतो. शेतकऱ्यांच्या स्थितीगतीचे, त्यांच्या अगतिकतेचे व अस्वस्थतेचे चित्रण कवितेत कवी करतो.

‘‘जसजशी अक्षरे मातीत मळू - लागली...

शिवारमातीची दुःखे मनास छळू - लागली...

यातनांचा कल्लोळ मनात प्रेशर कुकर- वाणी दाटला...

विद्रोहाचा ज्वालामुखी कवितेच्या अंगोअंगी सांडला...!’’

शेतीसोबतच शब्दांची शेती करण्याची त्याची धडपड त्याला साहित्याकडे खेचते. -

‘‘मातीतल्या पिकांची खूप केली शेती..

आता मातीतल्या वेदनांची करून - बघतो शेती!’’

कवितेत सर्वसामान्यांना परिचित असणाऱ्या शेत -शिवारातील अनेक प्रतिमा कवितेत वापरल्या आहेत. या कवितेला स्वतःची एक भाषा आहे. ती मांडण्याची उत्तम अशी शैलीही आहे. भाषा म्हणजे केवळ शब्दांचा पुंजका नाही. या कवितेत येणारा प्रत्येक शब्द शेती संस्कृतीतून भिजून आला आहे. नांगर, तिफण, मोगडा, कोळपं, काशा- कुंदा, संकरित वाण, भाकड ढोर, विहीर, औंदा, पेरणी, भळ, कोंब, ढेकळं, नरडं यांसारखे शेतशिवारातील अनेक शब्द सहजपणे अवतरतात. तिला राजकीय जीवनाचेही वावडे नाही. योग्य तिथे राजकारणावरही ती भाष्य करते.

प्रा. डॉ. वामन जाधव, ९८९०७१२६४४

(लेखक ग्रामीण साहित्याचे अभ्यासक व समीक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT