Book Update : पुस्तकाचे नाव :वंडरलॅंड ऑफ हनी बी
लेखक : सुरेश पुंड
प्रकाशक : माधुरी पुंड, नाशिक
किंमत : ५०० रु.
मधमाशीपालन हा आता पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाही. त्यात अधिकाधिक शास्त्रीय आणि व्यावसायिक दृष्टिकोन वाढीस लागला आहे. मधमाशीपालक संघटित होत आहेत. परागीभवनासाठी मधपेट्या, मध उत्पादन यापुढे जाऊन मधमाशीपालनातील विविध मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला चालना मिळत आहे. त्यामुळेच या विषयात अधिकाधिक ज्ञानवृद्धी, अभ्यास करणे व प्रशिक्षण हा या व्यवसायातील महत्त्वाचा भाग झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सुरेश पुंड यांनी त्याच अनुषंगाने मधमाश्यापालनाविषयी मूलभूत, शास्त्रीय अर्थात ‘थेअरी’ आणि ‘प्रॅक्टिकल’ अशा स्वरूपातील माहिती पुस्तकाच्या रूपाने पुढे आणली आहे. ‘वंडरलॅंड ऑफ हनी बी’ असे या इंग्रजी पुस्तकाचे नाव आहे. नावाप्रमाणेच मधमाशीचे संपूर्ण आश्चर्यकारक विश्व त्यातून लेखकाने उलगडले आहे. लवकरच मराठी व हिंदी भाषेत हे पुस्तक सादर करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.
लेखक पुंड हे ‘मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा व्यवसायही आहे. सेंद्रिय शेती, ‘गार्डनिंग’, ‘नर्सरी, गांडूळ खत, कमी खर्चात जैविक खते व कीडनाशके उत्पादन यांच्यासह मधमाशीपालन व या व्यवसायाला उपयोगी ठरणारी साधने निर्मिती हे त्यांचे आवडते विषय आहेत.
भारतातील मधमाशीपालनाच्या संक्षिप्त आढाव्यापासून पुस्तकाला सुरुवात होते. ३८२ पाने असलेल्या या पुस्तकाचे इंग्रजी ‘ए ते जी’ अशा सात विभागांत वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात मधमाशीचे शरीरशास्त्र उलगडले आहे. यात शरीराचे विविध भाग, मेंदू, चेतासंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था मधमाश्यांची दृष्टी, बोलण्याची भाषा (सिग्नलनिर्मिती) नृत्यशैली आदींची शास्त्रीय माहिती सविस्तर दिली आहे.
दुसऱ्या विभागात मधमाश्यांची जैवविविधता, त्यांच्या एपीस फ्लोरिआ, सिराना, डॉरसॅटा, मेलिफेरा, दंश न करणारी (स्टिंगलेस) माशी अशा विविध जातींचा धांडोळा घेतला आहे. त्यातून मधमाश्यांच्या प्रत्येक जातीचे संवर्धन करण्याला किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते. अवयव, खाद्य, आयुष्यकाळ अशा सुमारे १९ प्रकारांतील वर्गीकरणातून कामकारी माशी, ड्रोन, राणीमाशी यांतील फरक स्पष्ट केला आहे.
तिसऱ्या विभागात परागीभवन, त्याचे प्रकार, मधमाशीचे खाद्य, मधाचे प्रकार, त्याचे शास्त्रीय निकष, प्रतवारी, भेसळ, रॉयल जेली, मेण, प्रोपोलीस आणि भविष्यात या व्यवसायातून उपलब्ध होणारे मानवी खाद्य याविषयी प्रकाश टाकला आहे. चौथ्या विभागात मधपेटी, पोळे यांची रचना, आधुनिक बांधणी, पोळ्याची हाताळणी, शास्त्रीय दृष्टीने मधाची काढणी, त्यासाठीची सामग्री- यंत्रे याविषयी सविस्तर मांडणी आहे.
पाचवा विभाग मधमाशीचे जीवनचक्र, तिची वर्तणूक, स्थलांतर, अनुवंशशास्त्र, माशीला होणारे रोग, शत्रू, परभक्षी याबाबतची माहिती उलगडून सांगतो. सहाव्या विभागात बंबल बी, मुंग्या, गांधीलमाशी, हॉर्नेटस, वाळवी यांची विस्तृत ओळख होते. सातव्या विभागात प्राचीन काळापासून ते अलीकडील काळापर्यंत मधमाशीपालन क्षेत्रातील व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक यांचा आढावा घेतला आहे.
मधमापालनाचा जागतिक इतिहास, मधमाशीपालकांच्या जगातील संघटना, कीटकांचे एकूण जग, लेखकाचे प्रयोग असा वेधही घेतला आहे. केवळ शब्दांच्या रूपाने सर्व माहिती न देता भरपूर शास्त्रीय आकृत्या व छायाचित्रांद्वारेही विविध संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. भाषा इंग्रजी असल्याने देशभरातील मधमाशीपालक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विद्यार्थी व एकूणच या विषयातील प्रत्येकासाठी हे पुस्तक पथदर्शक ठरणारेच आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.