Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update : पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

श्रीकांत कुवळेकर

Monsoon Rain Sowing Update : मागील आठवड्यापर्यंत मोसमी पावसाने वेगवेगळ्या कारणांमुळे दडी मारल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले होते. शेती सोडाच पण अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले होते. एरवी राज्यातील शेतकरी पेरण्या किंवा पुरेसा पाऊस झाला नसल्यास निदान जमिनीची पेरणी-पूर्वमशागत करूनच आषाढी वारीला निघण्याचा प्रघात.

परंतु या वर्षी पावसाने हात दाखवल्याने यातील काहीच न करता पंढरपूर यात्रेला निघालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला अखेर विठ्ठलच धाऊन आला म्हणावं लागेल. कारण एकादशीच्या आसपास मोसमी पावसाचे दणक्यात आगमन झाले.

अर्थात, राज्याच्या अनेक भागांत अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही किंवा जेथे झाला आहे तेथे देखील पेरण्या कराव्या, की थोडी वाट पाहूनच पुढे जावे याबद्दल संभ्रम आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असे सांगितले आहे.

एकंदर जुलै उजाडला तरी खरीप पेरण्या चांगल्याच पिछाडीवर आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या सुरूच झालेल्या नाहीत. ही अवस्था केवळ आपल्या राज्याचीच नसून संपूर्ण देशाचीच आहे.

शुक्रवार अखेर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार देशात भाताच्या पेरण्या २६ टक्के पिछाडीवर आहेत. ही देशाच्या दृष्टीने मोठ्या चिंतेची बाब आहे. खास करून गव्हाची हमीभाव खरेदी २६ दशलक्ष टन म्हणजे उद्दीष्टाच्या तुलनेत २६ टक्के कमी झालेली असतानाच गुंडाळण्यात आलेली असताना भात उत्पादनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. ही गोष्ट दीर्घ कालावधीसाठी महागाईपूरक परिस्थिती निर्माण करत आहे.

कडधान्यांचा पेरा जवळ जवळ मागील वर्षाइतका दिसत असला तरी त्यातील ६० टक्के केवळ मूग असून, तुरीचे क्षेत्र ८० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. सध्या तूरडाळ बाजारातील परिस्थिती पाहता चालू हंगामातील पेरण्यांची स्थिती येणाऱ्या काळात सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. मूग, उडदातील क्षेत्रवाढ पाहता शेतकरी केवळ छोट्या अवधीची व कमी पाणी लागणारी पिके घेण्याला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

तसेच बाजरी क्षेत्रात विक्रमी १७७ टक्के वाढ होऊन ते २६ लाख हेक्टरवर गेलेले दिसत आहे. ज्वारी आणि नाचणी क्षेत्रदेखील तुटक आघाडी दाखवत आहे. म्हणजे कमी पाण्यावर लागणारी पिके घेण्याकडेच अजून तरी कल आहे.

अर्थात, ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’’ साजरे केले जात असताना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून ज्वारी-बाजरीची लागवड वाढलेली असू शकते. परंतु मका अजूनही २४ टक्के पिछाडीवर आहे.

याव्यतिरिक्त सोयाबीन पेरण्या १७ टक्के कमी असून कापसाचे क्षेत्रदेखील १४ टक्के मागे आहे. एका अर्थी राज्याच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे. याचे कारण म्हणजे अजूनही चालू हंगामातील आणि काही प्रमाणात मागील हंगामातील सोयाबीन शेतकाऱ्यांकडे पडून आहे.

चालू हंगामात पीक परिस्थिती सुधारली नाही तर किमती वाढण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत जाईल आणि या जुन्या साठ्यांना देखील बरा भाव मिळू शकेल. अर्थात यात थोडी जोखीम असून संयम राखावा लागेल. मात्र भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, असे अनुमान प्रसारित केल्याने कृषी क्षेत्राबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.

जागतिक बाजार

जागतिक कमोडिटी बाजारात मागील आठवड्यात जीवघेणे चढ-उतार अनुभवायला मिळाले. आठवड्याच्या पूर्वार्धात सोयाबीन, मका आणि गहू जोरदार घसरलेले दिसून आले तर शुक्रवारअखेर सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड ४-७ टक्के उसळी मारून बंद झाले. परंतु मका मात्र ५ डॉलरच्या खाली घसरला असून, डिसेंबर २०२० नंतरची ही सर्वांत कमी पातळी आहे.

१२ जुलैला प्रसिद्ध होणाऱ्या अमेरिकी कृषी खात्याच्या (यूएसडीए) अत्यंत महत्त्वाच्या अहवालाची प्रतीक्षा असताना शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या त्रैमासिक स्टॉक आणि पेरणी अहवालानंतर बाजाराचा कलच बदलून गेलेला दिसून आला.

या अहवालानुसार अमेरिकेतील मक्याच्या पेरण्या ९४ दशलक्ष एकर म्हणजे अपेक्षेहून खूपच जास्त झालेल्या दिसून आल्यात. तर सोयाबीन क्षेत्रात मोठ्या वाढीची अपेक्षा असताना ती मागील वर्षाहून ५ टक्के पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे सोयाबीन आणि उपपदार्थ यांच्या वायदेबाजारात जोरदार तेजी नोंदवली गेली, तर मका अडीच वर्षातील सर्वांत कमी किमतीवर येऊन स्थिरावला.

यानंतर १२ जुलैच्या मासिक अहवालात कापसाचे क्षेत्र आणि उत्पादन याबाबत अमेरिकन आणि एकंदर जागतिक पातळीवर मागील वर्षाच्या तुलनेत बऱ्यापैकी कपात दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळेच वर म्हटल्याप्रमाणे कापूस आणि सोयाबीन साठेधारकांना दिलासा मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. शेवटी बाजाराच्या मनात काय दडलेले असते हे सांगणे कठीण असले, तरी मागणी-पुरवठा समीकरण गणितीय बाबतीत तरी उत्पादकांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.

हळद तेजी दुसऱ्या चरणात

मागील काही दिवसांत खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या किमतीमध्ये जोरदार तेजी येताना दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने होणाऱ्या उत्पादनघटीच्या अपेक्षेने ही तेजी असल्याने त्यात थोडी सट्टेबाजी असली तरी मूलभूत घटक (फंडामेंटल्स) मजबूत असल्यानेच ही तेजी अजून वाढण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्याअखेर हळदीचे ऑगस्ट वायदे १६ महिन्यानंतर प्रथमच १०,००० रुपयांची पातळी ओलांडून गेले आणि त्या पातळीखाली बंद झाले आहेत. राज्यासहित दक्षिणेतील प्रमुख हळद क्षेत्रात अजूनही पाऊस न झाल्याने उत्पादनात १५-२५ टक्के घट येण्याची प्राथमिक अनुमाने बाजारात फिरत असून, त्यामुळे हळद १०,५०० रुपये आणि नंतर ११,८०० रुपये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु पावसाने सकारात्मकदृष्ट्या आश्‍चर्यचकित केल्यास या बाजारकलात बदल होऊ शकतो. त्यामुळे या तेजीचा आधार घेऊन चढ-उताराच्या पुढील काळात आपापले विक्री नियोजन करणे योग्य राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT