Solapur News : विधानसभा निवडणुकीचा गुलाल उधळण्यापूर्वी सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा गुलाल उधळण्याची तयारी काही जणांनी केली होती. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देत, बाजार समितीचा गुलाल काही दिवस बाजूला ठेवला होता.
शासनाच्या या निर्णयाविरोधात सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून दोन याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यातील शेतकऱ्याच्या एका याचिकेवर २७ नोव्हेंबरला सुनावणी झाली असून आता पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. बाजार समितीसाठी न्यायालय तारीख पे तारीख देऊ लागले आहे.
या दोन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या प्रत्येकी दोन मुदतवाढ देण्यात आल्या होत्या. सोलापूरसाठी पणन उपसंचालक मोहन निंबाळकर हे प्रशासक म्हणून तर बार्शीसाठी विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तिघांचे अशासकीय सदस्यांचे प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. या दोन्ही बाजार समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली होती. एका दिवसात अर्जही दाखल झाले होते. तोपर्यंत या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकांना सहकार विभागाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती ३१ डिसेंबरपर्यंत आहे.
स्थगिती संपण्यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुकीचा प्रयत्न करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या कारणास्तव बाजार समित्यांच्या या निवडणुका स्थगित झाल्या होत्या. आता विधानसभेची निवडणूक झाल्या आहेत.
या याचिकांवर न्यायालय आता काय निर्णय देणार?, स्थगितीची ३१ डिसेंबरची मुदत संपेपर्यंत वाट पहावी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच या दोन्ही बाजार समित्यांसाठी गुलाल उधळला जाण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
सोलापुरात विधानसभा निवडणुकीचे पडसाद
सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातून भाजपचे विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी पुन्हा आमदार झाले आहेत. त्यांच्यासोबत शहर मध्यमधून भाजपचे देवेंद्र कोठे पहिल्यांदा आमदार झाले आहेत. उत्तर तालुक्यातील गावातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजू खरे आमदार झाले आहेत. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील नवीन आमदारांमुळे नवीन समीकरणे जन्माला येण्याची शक्यता आहे.
बार्शीत नवीन आमदार, नवीन समीकरणे
बार्शी बाजार समितीसाठी ज्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी बार्शीची आमदारकी राजेंद्र राऊत यांच्याकडे होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बार्शीची आमदारकी आता दिलीप सोपल यांच्याकडे आली आहे. बार्शीची आमदारकी जवळ नसली तरीही ज्यांच्या उमेदवारीवर राजेंद्र राऊत यांनी आमदारकी लढविली ती शिवसेना सत्तेत असण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तेची ताकद राऊत यांच्याकडे आहे तर आमदारकी मिळाल्याने सोपल यांच्याकडे आत्मविश्वास आहे. बार्शी बाजार समितीसाठी नवीन आमदार, नवीन समीकरणे दिसण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.