Akola News : राज्यात प्रत्येक तालुक्यात असलेल्या तालुका बीज गुणन केंद्रापैकी (टीएसएफ) बहुतांश केंद्रे ही सध्या ‘पांढरा हत्ती’ झालेली आहेत. या ठिकाणी उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त होत आहे. त्यामुळे कृषी खात्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.
अमरावती विभागस्तरावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्राच्या कामकाज, उत्पन्नावरून चिंता व्यक्त करीत सुधारणांसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देऊन लक्ष देण्याची सूचना विभागीय सहसंचालकांनी केल्याची माहिती मिळाली आहे.
कृषी विभागाकडे प्रत्येक तालुक्यात बीज गुणन केंद्र (टीएसएफ) आहेत. काही ठिकाणी याला लागून नर्सरीही आहेत. या केंद्रांवर कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकांची नियुक्ती राहते. तसेच कामांसाठी मजुरांची तजवीज असते. कामांसाठी प्रत्येक केंद्राला २०११ मध्ये ट्रॅक्टर व इतर यंत्रे देण्यात आली.
ही यंत्रणा चालविण्यासाठी पूर्णवेळ चालक नसल्याने गरजेवेळी नेमणूक करून कामे केली जातात. या केंद्रावर प्रामुख्याने बीजोत्पादनाचे काम चालते. ‘महाबीज’च्या सहकार्याने बीजोत्पादन घेतले जाते. दिवसेंदिवस या बीज गुणन केंद्रांचा खर्च डोईजड होत चालला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नुकसानकारक ठरत आहे.
उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षेत ही केंद्रे येतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देऊन कामकाजावर लक्ष ठेवणेही अभिप्रेत आहे. या कर्तव्याची जाणीव सहसंचालकांनी झालेल्या बैठकीत करून दिली. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही लक्ष ठेवण्यासाठी सूचना करावी, असेही सहसंचालकांनी सांगितले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘टीएसएफ’चे क्षेत्र काही तालुक्यांत मोठे आहे. मात्र बहुतांश भाग कोरडवाहू असून सिंचनाच्या पुरेशा सोयी नाहीत. कामासाठी ठेवल्या जाणाऱ्या मजुरांचे चुकारे वेळेवर होत नाहीत. चार-पाच महिने निधी मिळत नाही. हा खर्च संबंधितांना वरचेवर भागवावा लागतो. या प्रकारांमुळे मरगळ दिवसेंदिवस वाढत आहे.
भंगार वास्तू, तुटलेली यंत्रसामग्री
गुणन केंद्राच्या ठिकाणी उभारलेल्या वास्तूंची दुर्दशा झाली आहे. दरवाजे, खिडक्या गायब असून, फरशा उखडल्या आहेत. वास्तूंच्या अवतीभोवती गवत, झाडझुडपांचा वेढा आहे. ट्रॅक्टर धूळ खात आहेत. यंत्रांना गंज चढला आहे. काही यंत्रसामग्री वर्षानुवर्षे एकाच जागेवर असल्याने भंगार झाली आहे.
उत्पादकता अत्यंत कमी
बहुतांश बीज गुणन केंद्रांवर घेतल्या जाणाऱ्या पिकांची उत्पादकता अत्यंत कमी आहे. याला तत्कालिक कारणेही आहेत. तेल्हारा तालुक्यातील तालुका बीज केंद्राच्या प्रक्षेत्रावर गेल्या हंगामात सोयाबीन (जेएस ३३५) या वाणाच्या पायाभूत बियाण्याची २.८० हेक्टरवर लागवड केली होती. यासाठी २.१० क्विंटल बियाणे वापरले.
या क्षेत्रात १४ क्विंटल बियाणे तयार झाले. सततचा पाऊस, आंतरमशागत कमी झाली. तसेच कुंपण नसल्याने मोकाट जनावरांनी नुकसान केल्याचे कारण देण्यात आले. केंद्रात ६.८० हेक्टरवर ४२.३६ क्विंटल बियाणे मिळाले. बाळापूरच्या केंद्रावर ३ हेक्टरमध्ये २.४० क्विंटल बियाणे पेरणी करून केवळ ८ क्विंटल बियाणे उत्पादित झाले. केंद्रांच्या खर्चाचे आकडे लाखावर असताना उत्पादन हजारातही मिळत नसल्याची स्थिती एका जबाबदार अधिकाऱ्याने मान्य केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.