Jowar Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Production : कहाणी-गोड धाटाच्या ज्वारीची

Sweet Sorghum Production : गोड धाटाची ज्वारी साध्या ज्वारीसदृश असून उसाप्रमाणे तिच्या धाटात जास्त प्रमाणात साखर साठवली जाते. तिच्या कणसातून धान्य मिळते, धाटातून गोड रस मिळतो आणि रस पिळून राहिलेला चोथा हा जनावरांसाठी उत्तम चारा आहे. चोथ्यापासून कागदही बनवता येतो.

Team Agrowon

अनिल राजवंशी, नंदिनी निंबकर

Jowae Crop : गेले २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी ‘आंतरराष्ट्रीयभरडधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले होते. भरडधान्ये ही बारीक दाण्याची, वैविध्यपूर्ण गवते असून, जगभरात सर्व ठिकाणी अन्नधान्य आणि जनावरांचा चारा यासाठी लावली जातात. ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), कांगणी (राळा), शामुल, कोद्रा, कुट्टू (मोठी), वरी (भगर) या भरडधान्यांत मोडणाऱ्या काही प्रमुख वनस्पती आहेत. त्यांची इतर अन्नधान्य पिकांच्या तुलनेत लागवड करणे सोपे असते, कारण त्या हवामान घटकांच्या ताणाला व कीड-रोगाला प्रतिरोधक असतात. सुपीक जमीन किंवा भरपूर पाणी याची त्यांना गरज नसते. ही धान्ये ग्लुटेनमुक्त असतात. ही दीर्घमुदतीच्या उत्पन्नाचा स्रोत बनू शकतात. कारण ती लावण्यासाठी फारच कमी गुंतवणुकीची आवश्यकता असते.

हरितक्रांतीच्या आधी भारतात लावण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांतला ४० टक्के वाटा भरडधान्यांचा होता. परंतु तेव्हापासून तांदळाचे उत्पादन दुप्पट, तर गव्हाचे तिप्पट झाले आहे. भरडधान्यांच्या वापरातही घट झाली आहे. गेल्या ६० वर्षांत भारतातले भरडधान्यांचे खुंटलेले उत्पादन हाच कल दाखवतो.

सरकारच्या गेल्या काही वर्षांतल्या रेट्यामुळे यात बदल होऊन लोक भरडधान्ये खाऊ लागतील, अशी आशा आहे. असे असले तरी भारत सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार अन्नधान्यांपासून मद्यार्क बनवण्याला परवानगी दिली आहे. ही पिके मद्यार्क बनवण्यासाठी वापरली जात नाहीत ना, हे पाहणे जरुरीचे आहे.

नारीचे गोड धाटाच्या ज्वारीवरील काम
निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) गेले अर्धशतक गोड धाटाच्या ज्वारीवर काम करत आहे. गोड धाटाची ज्वारी हे शुष्क प्रदेशातील पीक असून, उसापेक्षा त्याला किती तरी कमी पाणी लागते. गोड धाटाच्या ज्वारीचा कालावधी सुमारे चार महिन्यांचा किंवा त्याहूनही कमी असल्यामुळे एकाच जमिनीच्या तुकड्यावर वर्षाला दोन किंवा तीन पिके घेता येणे शक्य आहे.

नारीचे संस्थापक आणि त्या वेळचे अध्यक्ष बनबिहारी निंबकर यांनी १९६८ मध्ये अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया’च्या प्रायोगिक केंद्राला भेट देऊन तेथून ब्रॅाली, कॅालिअर, रेक्स, रिओ आणि ट्रेसी या गोड धाटाच्या ज्वारीच्या वाणांचे बियाणे भारतात प्रथमच आणले.

या सर्व जातींमध्ये जास्त प्रमाणात साखर होती. त्या सर्वांचा तुलनात्मक अभ्यास १९६९ पासून नारीमध्ये करण्यात आला. त्यात रिओ हे वाण सर्वोत्तम असून त्याचे धाटाचे उत्पादन हेक्टरी ३२.४ मे. टन आणि त्यातील सुक्रोजचे प्रमाण १०.६ टक्के असल्याचे आढळले. परंतु या सर्व अमेरिकन जाती निकृष्ट प्रतीच्या धान्याचे कमी उत्पादन देत असल्याचे दिसून आले.

तेव्हा १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला नारीमधील शास्त्रज्ञांनी  रिओसारख्या अमेरिकन जातींचा मालदांडीसारख्या चारा आणि उत्तम प्रतीचे धान्य देणाऱ्या जातींशी संकर करून रसाळ धाटे आणि चांगल्या प्रतीचे धान्य देणाऱ्या गोड धाटाच्या ज्वारीच्या नव्या जाती निर्माण केल्या. यातून भारतात प्रथमच मधुरा या गोड ज्वारीच्या संकरित वाणाचा विकास झाला.

आमचा सुरुवातीचा हेतू उसाचा हंगाम संपल्यावर मधल्या काळात साखर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून गोड धाटाच्या ज्वारीचा उपयोग कसा करता येईल, हा होता. परंतु गोड धाटाच्या ज्वारीपासून साखर बनवण्याचे प्रयत्न तिच्या धाटातील रसात असलेल्या स्टार्च व अॅकोनिटिक अॅसिड या घटकांमुळे अयशस्वी ठरले. यामुळे स्फटिकमय साखर तयार होत नव्हती. तेव्हा आम्ही या शर्करायुक्त पिकासाठी पर्यायी उपयोग शोधू लागलो.

गोड धाटाच्या ज्वारीपासून मद्यार्क अशा तऱ्हेने १९८० च्या दशकाच्या पूर्वार्धात नारीमध्ये गोड धाटाच्या ज्वारीपासून मद्यार्क बनवण्याचे काम सुरू झाले. ग्रामीण घरादारांमध्ये रॉकेल हे स्वयंपाकासाठी व उजेडासाठी इंधन म्हणून वापरण्याऐवजी मद्यार्क हे नवीकरणीय इंधन वापरण्यात यावे, ही यामागची प्रेरणा होती. १९७० आणि ८० च्या दशकात रशियाहून रॉकेलची आयात करून ते ग्रामीण भागात अतिशय अकार्यक्षम चुली आणि कंदिलांमध्ये वापरले जात होते.

तेव्हा आमच्या गोड धाटाच्या ज्वारीपासून मद्यार्क बनवण्याच्या कामामागे घरगुती वापरासाठी प्रदूषण निर्माण न करणारे इंधन वापरावे, ही इच्छा होती. मद्यार्क निर्मितीत वापरात येणाऱ्या उर्जेपैकी ८० टक्के ही ऊर्ध्वपातनात खर्च होते. ही ऊर्जा जास्त करून जीवाश्म इंधनातून मिळवली जाते.

मद्यार्क निर्मिती जितकी शाश्वत होऊ शकेल तेवढी करण्यासाठी गोड धाटाच्या ज्वारीपासून ऊर्ध्वपातनासाठी सूर्यऊर्जेचा वापर करणारे जगातले पहिले प्रयोगात्मक मद्यार्कनिर्मिती संयंत्र उभारले. या पथदर्शी प्रयोगाचा नामोल्लेख १९९० च्या दशकातल्या रोलेक्स अॅवॅार्ड बुक आणि अमेरिकेतील ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या प्रकाशनात (प्रकरण ११) करण्यात आला. याव्यतिरिक्त किण्वन प्रक्रियेचा एक मोठा कार्यक्रमही सुरू करण्यात आला. १९९० च्या दशकाच्या आरंभाला नारीने गोड धाटाच्या ज्वारीच्या संशोधन व विकासाचा जगातला सगळ्यात मोठा कार्यक्रम प्रस्थापित केला.

यात गोड धाटाच्या ज्वारीच्या पैदास, तिच्या रसावरची किण्वन प्रक्रिया (आंबवणे), ऊर्ध्वपातन आणि मद्यार्कावर चालणाऱ्या स्वयंपाकाच्या आणि उजेडाच्या साधनांचा विकास या सर्वांचा समावेश होता. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या या घडामोडींचा परिपाक म्हणून युरोपियन इकॉनॉमिक कमिशनच्या गोड धाटाच्या ज्वारीवरच्या संघाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेली नारी ही एकमेव भारतीय संस्था बनली. नारीने विकसित केलेल्या मधुरा या संकरित जातीच्या जगभरातल्या अर्धा डझन देशांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या.

मद्यार्काचा स्वयंपाकासाठी व कंदिलातील इंधन म्हणून ग्रामीण घरांमध्ये उपयोग करायला प्रोत्साहन देणारी नारी ही जगातली पहिली संस्था होती.  हा उपक्रम यशस्वी होऊ शकला नाही, याचे कारण भारतात असलेले कठोर उत्पादनशुल्क कायदे. या कायद्यांमुळे मद्यार्काचा स्वयंपाकासाठी आणि कंदिलांसाठी इंधन म्हणून घरगुती वापर करायला परवानगी मिळू शकत नाही.

शेवटी गोड धाटाच्या ज्वारीपासून काकवी बनवण्याचा पर्याय निवडण्याचे आम्ही ठरवले. असे असले तरी मद्यार्कावर आधारित स्वयंपाक आणि उजेडासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांच्या विकासासाठी २००९ मध्ये नारीला स्वीडनमधील स्टॅाकहोम येथे एक मोठा पुरस्कार देण्यात आला.

(अनिल राजवंशी ‘नारी’चे संचालक, तर नंदिनी निंबकर अध्यक्ष आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT