Dr. Sanjay Bhave Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Farming Practices : एकात्मिक शेती पद्धतीतूनच कोकणाचा शाश्‍वत विकास

Dr. Balasaheb Sawant Konkan Agriculture University : एकात्मिक शेती पद्धतीतूनच शाश्‍वत कोकण विकासाला दिशा मिळणार आहे. त्यादृष्टीने दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्यासोबत साधलेला संवाद...

शिवप्रसाद देसाई

Integrated Farming : कोकण म्हटले, की भात शेती, मासेमारी, आंबा, काजू नारळ, सुपारीच्या बागा डोळ्यांसमोर येतात. मात्र हवामान बदलाच्या काळात नव्याने शेती व्यवस्थापनाची मांडणी करावी लागणार आहे.

एकात्मिक शेती पद्धतीतूनच शाश्‍वत कोकण विकासाला दिशा मिळणार आहे. त्यादृष्टीने दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्यासोबत साधलेला संवाद...

प्रश्‍न - संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्याला आपण कशाप्रकारे नवी दिशा देणार आहात?

- मी गेली ४२ वर्षे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी जोडलेलो आहे. कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि त्यानंतर सहायक प्राध्यापक ते संचालक पदांवर मी काम केल्यामुळे कोकणातील शेती प्रश्‍नांची माहिती आहे. आता कुलगुरू म्हणून जबाबदारी वाढली आहे. पहिल्या टप्यात मी विद्यापीठाच्या सर्व संशोधन केंद्रांना भेटी देत आहे. तेथील संशोधन आणि विस्तार कार्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृषी आराखडा तयार करीत आहे.

शासनाने कोकणात नवीन फळ पिकांच्या लागवडीस चालना देण्यास सांगितले आहे, त्यादृष्टीनेही संशोधनात्मक काम सुरू आहे. मसाला पिके, कंदपिके, वनौषधी आणि बांबू पिकातून कुटीर उद्योगाला चालना मिळणार आहे.

फळबाग, भातशेती, मत्स्यपालन, मसाला पिके, पूरक आणि प्रक्रिया उद्योग अशा एकात्मिक शेती पद्धतीवर भर आहे. विद्यापीठाच्या साथीने शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गटातून शाश्‍वत ग्राम विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न आहे.

प्रश्‍न - आंबा, काजू बागायतीबाबत आपल्या काय संकल्पना आहेत?

- आंब्याच्या प्रत्येक कलमापासून जास्तीत जास्त उत्पादन आणि प्रत्येक फळाच्या गुणवत्तेचा विचार महत्त्वाचा आहे. लागवड, पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने बॅगिंग तंत्रज्ञान, काढणीपश्‍चात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा आहे. आंब्याची कॅनॉपी कशी छोटी करता येईल याबाबत प्रयोग झाले आहेत. यात अचूकता येण्यासाठी आणखी काही संशोधनात्मक गोष्टी बाकी आहेत.

आयात काजू बीमुळे स्थानिक काजूला फटका बसतो, हे खरे आहे, पण आपण आयात थांबवू शकत नाही. सध्या आयात थांबविल्यास भारताला प्रक्रियेसाठी एक लाख टन काजू बीचा तोटा भरून काढावा लागेल. हे लक्षात घेता पडीक क्षेत्रात योग्य पद्धतीने काजू लागवड करून उत्पादन वाढवावे लागेल.

गेल्या काही वर्षांत वेंगुर्ला- ४ या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रणाचा अवलंब महत्त्वाचा आहे. विद्यापीठात काजूच्या ३१२ जातींचे संकलन आहे. यातील काही जाती घन लागवडीसाठी उपयुक्त आहेत. या लागवडीतून उत्पादन वाढेल, योग्य कॅनॉपी व्यवस्थापनातून काढणी सोपी होईल. काजू बी बरोबरीने बोंडूवर प्रक्रिया उद्योगावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

प्रश्‍न - नारळ, सुपारी बागायतीबद्दल आपण काय सांगाल?

- कोकणामध्ये पीक लागवडीबाबत ‘मास्टर प्लॅन’ कधीच केला नाही. यामुळे ज्याला वाटते तेथे तो कुवतीप्रमाणे पीक घेतो. आंब्यासाठी योग्य असलेल्या जागेत काजू, नारळ लागवड दिसते. नारळ, सुपारीसाठी योग्य जागेत आंबा लागवड झालेली आहे. याचा उत्पन्नावर परिणाम होतो. जिथे पाणी आहे तिथे नारळ, सुपारी घ्यायला हवी;

मात्र असे क्षेत्र मर्यादित आहे. स्थानिक नारळाचा दर्जा चांगला असल्याने दरही टिकून असतो. आता नारळ, सुपारी लागवड आणि विक्री व्यवस्थापनाच्या संकल्पना बदलण्याची गरज आहे. नारळ, सुपारी बागेत मसाला पिकांची लागवड उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाची आहे.

प्रश्‍न - भात पिकाबाबत आपले काय धोरण आहे?

- विद्यापीठाचा विस्तार शिक्षण संचालक असताना शेतीयोग्य तालुक्यांमध्ये मी विविध उपक्रम राबविले होते. त्यामुळे प्रत्येक कृषी मंडळातील किमान एक प्रयोगशील शेतकरी थेट माझ्या संपर्कात आहे. कोकणात सुमारे साडेचार लाख हेक्टर जमीन भात, नाचणीखाली आहे. काजू, आंब्याखाली तीन लाख दहा हजार हेक्टर आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात आंबा, काजूचे क्षेत्र जास्त आहे. मी दक्षिण कोकणाला ‘लाख रुपये कमवणारा प्रदेश’ आणि उत्तर कोकणाला ‘शेतीवर लाखोंचे अवलंबित्व असलेला प्रदेश’ मानतो. कारण या पट्ट्यात भात लागवड जास्त आहे.

भात आणि आंबा यांची तुलना करता येणार नाही. फळबागेत फायदा जास्त असेल; पण भाताला दुसरा पर्याय नाही. भात उत्पादकांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा काटेकोर अवलंब केल्यास निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. जे बदलता येते ते बदला; मात्र जे बदलू शकत नाही ते अधिक चांगल्या पद्धतीने विकसित केले पाहिजे. आपल्याकडे भाताच्या चांगल्या जाती आहेत. रत्नागिरी- ८ हा चांगला पर्याय विद्यापीठाने दिला आहे.

प्रश्‍न - हवामान बदलाचा शेतीवरील परिणामाचे आव्हान आपण कसे पेलणार?

- पहिल्यापासून हवामानात चढ-उतार होताहेत. एकूण पडणारा पाऊस तितकाच आहे; मात्र तो पडण्याची वारंवारता बदलली आहे. पाऊस उशिरा किंवा लवकर येतो, मध्येच ओढ देतो, पण शेवटी सरासरी पूर्ण करतो. या परिस्थितीनुसार मार्ग काढावा लागेल. हवामान बदलाला तोंड देणाऱ्या जाती, ताण सहनशील जाती येत्या काळात विकसित करत आहोत.

भातशेतीमध्ये पाणी साठवून ठेवायला पाहिजे असा समज आहे; मात्र जास्त उत्पादन देणाऱ्या भागात भात पिकास काही काळासाठी कमी पाणी देऊन ताण दिला जातो. पुन्हा पाणी दिले जाते. यामुळे उत्पादन वाढते.

आंबा, काजू पीक उत्पादनास हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. उष्णता, जास्त पाऊस, थंडी याचे वेळापत्रक राहिलेले नाही. त्यामुळे सिंचनातील उपाय योजून वातावरण बदलातील प्रत्येक प्रकारासाठी आपल्याकडे वेगवेगळे पीक व्यवस्थापनाचे नियोजन असले पाहिजे.

यावर संशोधनात्मक काम सुरू आहे. गेल्या २५ वर्षांत प्रत्येक विभागात नेमके काय प्रश्‍न तयार झाले याचा अभ्यास करून पुढील दिशा ठरवली जात आहे.

प्रश्‍न - सेंद्रिय शेती संशोधनाची दिशा कशी असेल?

- सेंद्रिय शेतीबाबत योग्य दिशा सुनिश्‍चित करावी लागणार आहे. सेंद्रिय खतांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या पिकाच्या जाती निवडल्या तर अपेक्षित उत्पादन मिळेल का? यासाठी मी हरितक्रांती आधीपासून आपल्याकडे असलेल्या काही जातींवर विशेष संशोधन करायला सांगितले आहे.

त्यातील कोणते जनुक सेंद्रिय व्यवस्थापन पद्धतीला प्रतिसाद देते ते शोधून नव्या जातींच्या विकासामध्ये वापरता येईल का? याबाबत आम्ही प्रयत्न करतोय. पूर्वी नवी जात विकसित करायला बारा वर्षे लागायची. आता नवीन तंत्रज्ञानामुळे पाच वर्षांत नवी जात विकसित होते. त्यादृष्टीने विद्यापीठातील प्रयोगशाळा नवीन तंत्रज्ञानाने सक्षम होत आहेत.

प्रश्‍न - कोकणातील शेती, बागायती फायद्यात येण्यासाठी काय करावे लागेल?

- परंपरागत शेतीत असलेल्या गोष्टींमध्ये थोडासा बदल केला तर शेतकरी लवकर स्वीकारतात. माझ्या मते शेतकऱ्यांचा संशोधनात सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे हे लक्षात घेऊन पुढील संभाव्य प्रश्नांवर काम करावे लागणार आहे. यापुढे बाजाराची गरज ओळखून संशोधनाची दिशा असेल. ग्राहकांना लाल भात हवा असेल तर त्याचे उत्पादन वाढवायला हवे. पारंपरिक, सेंद्रिय शेतीतील चांगल्या गोष्टी शोधून त्याला नवी तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल.

आपले ६० टक्के अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. दुसरी हरितक्रांती करताना शाश्‍वत पीक उत्पादनासोबत रोजगारनिर्मिती आवश्यक आहे. यासाठी आम्ही कमी कालावधीचे ‘कॅप्सूल कोर्स’ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे.

पाच दिवसांच्या कोर्समधून त्या भागात कोणता व्यवसाय उभा राहू शकेल याचे प्रशिक्षण दिले जाईल. शाश्‍वत कृषी प्रगतीतूनच आर्थिक समृद्धीची दिशा मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT