Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Story : ...अन् मळ्यात सुरेखा पुणेकरांनी खाल्ला पाडाचा आंबा

Mango Season : उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही आखाड्यावर रातच्यालाबी असायचो. वाऱ्याने झोके घेत पाडाचे आंबे रातभरातून झाडाखाली सडा टाकायचे. पहाटे-पहाटे उठून मी आणि आमचे चुलते बालूकाका खापराच्या बिनगीत ते वेचून जमा करायचो.

अरुण चव्हाळ 

Amba Mahotsav : गावाकडे ४० एक्कर जमीन नदीला खेटून होती. शेतीत नांग्या, वाळुक्या, नारंग्या, शेप्या, काळुश्या, आखाड्या, बदाम्या, शेंद्र्या, गोट्या, जवारीतला कलमी, नीलम, आंबट्या असे किमान एक डझन म्हणजे बारा प्रकारचे आंबे होते.

उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही आखाड्यावर रातच्यालाबी असायचो. वाऱ्याने झोके घेत पाडाचे आंबे रातभरातून झाडाखाली सडा टाकायचे. पहाटे-पहाटे उठून मी आणि आमचे चुलते बालूकाका खापराच्या बिनगीत ते वेचून जमा करायचो. सकाळी न्याहारीला शिळी भाकर, भुरकी- कांदा आणि आंबा चापून हाणायचो. वर दोन तांबे पाणी प्यायचो.

अंगात आंबा खाल्ल्यामुळे गर्मी यायची आणि वातावरणातील गर्मीचा मेळ साधायचा. लईच अंग गरम झाल्यावर दुधना नदीच्या डव्हात किंवा वाळूत इऱ्हा करून अंग गार-गार करायचो. ढोरं वळायचो. ढोरांना दुपारी पाण्यात बसवायचे.

वाळूच्या पाण्याच्या बगाला (काठाला) टरबूज-खरबूज वाडी असायची. भोई माणसं मृदंगासारखे आणि काही घागरी एवढाले लालचुटूक, पिवळेधम्मक फळं, खिरा काकड्या लावायचे. कधी-मधी मग आंबे द्यायचे अन् फळं खायचे. डव्हातल्या माशावरही ताव हाणायचा. गरमागरमीत सगळा मामला गरमीचा असूनही गार वाटायचा.

लोअर दुधना धरण (ब्रह्मवाकडी, ता. सेलू, जि. परभणी) झालं आणि आमचे वांजोळा गाव व जमीन-वाडे बुडित क्षेत्रात गेले. गावाचं पुनर्वसन मंठा (जि. जालना) येथे झाले. पण आंबे खाण्याची चंगळ विस्थापित होते की काय? प्रश्‍न लई सतवायचा.

मग बापाने परभणीला खेटून कौडगाव शिवारात नऊ एक्कराचा-जमिनीचा तुकडा घेतला. आज त्याला २७ वर्षे झाली. बापाचे भावाच्या धसकीतून ९ मे २००१ रोजी निधन झाले, म्हणजे भावाने आत्महत्या केली, त्याने गेला म्हणून हरिण काळजाचा बाप गेला अन् आजीबी गेली.

एका वर्षात तीन जीव गेले. वावर पोरकं झालं आणि त्या वेळी मी पोरसवदाच होतो. मी लगेच बाप गेल्यावर ४० दिवसांत १९ जून २००१ ला विहीर बांधून काढली आणि शेतात केसर, मलगोबा, दशेरी, मल्लिका आणि गावरान असे पंचआंबे असणारी बाग लावली. तिला खाण्याजोगे फळं पाच वर्षांनी म्हणजे २० मे २००६ रोजी आली.

बापाचे-भावाचे-आजीचे जाणे दुःखद होते आणि मी लगेच आंब्याची बाग लावली. आई आत्याला तिखट शब्दांत बोलली, की याला लाजबी वाटनं का? घरातले गेले आणि आंबे लावायलाय? पण मी गुमानं राहिलो. आता सतरा वर्षे झाली आंबेच आंबे आम्ही मनाजोगे खातो. काहींना वानोळा (भेट) देतो. आई सग्या-सोयऱ्यांना आंबे देताना लई आनंदी होते.

पोरं- पुतणे-दोस्त आंबे खाताना मज्जा करतात. घरात कैरी, पाडाचा आणि पिकलेला आंबा व साखर आंबा, खाराचा आणि केशरी पिवळा-हिरवा असा नारंगी आंबा खाताना लावणीतल्या ‘पाडाला पिकलाय आंबा’ या गाण्याची ओळही आठवते. पण ‘तो’ आंबा नुसता लावणीतच होता. पण प्रत्यक्षात आता उन्हाळ्यात आंब्याच्या झाडाखाली दिवसा गोधड्यावर बसून मी आंब्यावरून पडलेला ‘पाडाचा आंबा’ खातो, तेव्हा लई समाधान लाभते.

आम्ही दोघं आनंदात असताना अशाच एकदा ‘रानमेवा’ मळ्यात सुरेखा पुणेकर आल्या होत्या, त्यांनी सुद्धा तेव्हा ‘पाडाचा आंबा’ खाल्लेला आहे. तेव्हा त्यांच्यात अन् माझ्यात या ‘आंबा बहराचा’ संवाद झालेला आहे.

‘मोहर... मोहरापासून गिठुळ्या, गिठुळ्याच्या कैरी, कैरीचा पाड अन् पाडाचा होणारा आंबा, आंब्याचा रस अन् त्याची गोडी’, असा आमचा संवाद सुरू असताना ‘असं एखादं पाखरू आंबाळ, त्याला समजून देतंय चव्हाळ’ ओळी मनात तरळून गेल्या. सुरेखाबाईंनी मला सांगितलेले आंब्याचे काही प्रकार असे- पानाआड लपलेले ‘घरंदाज आंबे’, झाडावर असलेले मोठे अन् ठळक दिसणारे ‘पुढारी आंबे’, गळफांदीला लटकणारे ‘झुंबर आंबे’, दोन फांद्यांवर वेगवेगळे पण वाऱ्याने एकत्र येऊन टक्कर खेळणारे ‘राघू-मैना आंबे’, पाखरांनी गाभूळ टोकरलेले ‘करंट्या आंबे’, बारीक कोय-पातळसाल-गर अन् रस भरपूर असे ‘रसाळ आंबे’, झाडाच्या अगदी एकदम टोकावर भाल्यासारखे उंच असणारे व रावाच्या तोऱ्यातील ‘भालेराव आंबे’, जोड किंवा घोस असणारे ‘संघीय आंबे’.

बाईंनी एवढी छान नावं सांगितल्यावर मी त्यांच्या तळव्यावर टाळी दिली. मग बाईंनी एक मोलाचा सल्लाबी दिला. बाई म्हणाल्या, ‘आरु, आंब्याच्या झाडाच्या बुडाला रिंगण कर, खडे मीठ, काळा गूळ, भगरा-भगरा शेणखत घाल, पाणी दे, आंबा देखणा, गोड, देठाला पक्का होतो’. मी ते केलं. आंबा ‘राजस’ झाला. राजमान्य व लोकमान्यताही लाभली.

झाडाला आंब्याचे काही घोस असतात. ते घोस झुंबरासारखे टांगलेले दिसतात. त्याच झाडाखाली मी तेव्हा युवा पत्रकार असताना त्यांची ‘चित्रगंधा’साठी मुलाखत घेतली. ‘काळजाच्या झुंबराला दुःख माझं टांगलं...’ या शीर्षकाने ती खूप-खूप गाजली. आता मी परभणीत आंबा विक्री करतो.

मळ्यात फटफटी आणि कार यांची रांग लागलेली असते. मळ्यातील गडी स्वतःच्या बायकांना व लेकरांना पाडाचे आंबे खाऊ घालू लागले, याचा मला खरा आनंद झाला.

आता गाण्यापेक्षा लोक खाण्याने ‘पाडाचा आंबा’ अनुभवायला लागले... काळाचा फरक तो हाच... गावाकडच्या आंब्याप्रमाणे मी परभणीतही आंबा उत्पादक म्हणून प्रस्थापित झालो. आंब्याची गोडी जपली. ‘पान खाये सय्या हमारा...’ ते ‘पाड खाये सय्या हमारा...’ म्हणून कुटुंब आणखी खुश!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT