Indrjeet Bhalerao Agrowon
ॲग्रो विशेष

Indrjeet Bhalerao: 'मायीहूनही मायाळू' असं सुनिलकुमार लवटेंचं व्यक्तिमत्त्व!

पंढरपूरच्या नवरंगे अनाथालयात वाढलेले लवटे सर. ज्यांच्या आई-वडिलांचा पत्ता नाही. खाली जमीन वर आकाश एवढंच ज्यांचं संचित. तेच त्यांच्या आत्मकथनाचं नाव आहे.

Team Agrowon

- इंद्रजीत भालेराव

सुनिलकुमार लवटे सरांविषयी विचार करताना नेहमीच वाटत राहतं, साने गुरुजींना तर आपण पाहिलेलं नाही पण साने गुरुजी कसे असतील ? तर नक्कीच ते लवटे सरांसारखेच असतील. साने गुरुजींना आपण त्यांच्या लेखनातून अनुभवतो. आपलं सुदैव असं की लवटे सरांना आज आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो. त्यांना भेटल्यानंतर कुणाचीही प्रतिक्रिया अशीच होईल,

आंब्याहूनही रसाळ मधाहूनही मधाळ गायीहूनही दुधाळ स्निग्ध जिणे

सर्व मायेचे माहेर मानव्याचा जो आहेर सदा स्वार्थाच्या बाहेर ऊच्च कोटी

विद्वत्तेचा मेरुमणीवंचितार्पन लेखनीआपपर नाही मनीज्यांच्या कधी

बाह्या बाजुला सारून रणामधी उतरूनकस्ट अगाध करून सेवा देणे

फक्त देतच राहणेघेणे विसरून जाणेसदा जळत राहणेहाच धर्म

वय झाले पाऊणशेतरी थकवा ना दिसेसदा ऊल्हसित हासेमुखावर

पंढरपूरच्या नवरंगे अनाथालयात वाढलेले लवटे सर. ज्यांच्या आई-वडिलांचा पत्ता नाही. खाली जमीन वर आकाश एवढंच ज्यांचं संचित. तेच त्यांच्या आत्मकथनाचं नाव आहे. तेच त्यांच्या आयुष्याचं सार आहे. अशा माणसाला त्याची जात आणि त्याचा धर्म माहीत नसल्यामुळं त्याच्या इतका निरपेक्ष कुणी असूच शकत नाही. हा असा निराधार मुलगा शिकतो. खूप शिकतो. मोठा होतो. हिंदीचा प्राध्यापक होतो.

थोर लेखक वि. स. खांडेकर यांचा आवडता होतो. कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयाचा प्राचार्य होतो. आपण वंचित होतो म्हणून आयुष्यभर वंचितांसाठी काम करतो. अनेक चळवळींना हातभार लावतो.

पुष्कळ लेखन करतो. खांडेकरांची सर्व असंकलित सामग्री जमा करून त्याची अनेक संकलनं प्रकाशित करतो. कोल्हापूर विद्यापीठात खांडेकरांचं एक अप्रतिम स्मृतीसंग्रहालय उभं करतो. ते संग्रहालय पाहून अनेकांना वाटतं की मोठ्या माणसांचं संग्रहालय असंच असायला हवं. म्हणून कोकणात साने गुरुजींचं असंच स्मृतीसंग्रहालय उभं करण्याचं काम लोक त्यांच्यावर सोपवतात.

इकडं सोलापूर जिल्ह्यात बार्शीला कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीसंग्रहालयाचं कामही त्यांच्याकडंच चालून येतं. ही सगळी कामं हा माणूस अतिउत्तम दर्जाची करून देतो. एक माणूस, एका आयुष्यात काय काय करू शकतो ? याचं आश्चर्यचकित करणार उदाहरण महणजे लवटे सर.

लवटे सरांची माझी पहिली भेट झाली ती जवळ जवळ पंधरा-सोळा वर्षांपूर्वी. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा एकुलता एक मुलगा अवि पानसरे याचं अपघातात निधन झालं. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनाला कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी मी कोल्हापूरला गेलो होतो. त्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन लवटे सरांनी केलेलं होतं.

दुसऱ्या दिवशी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या दुकानात सरांची भेट झाली होती. अनिल कुमार मेहता यांनी त्यांचा परिचय करून दिला होता. दुसऱ्या वर्षी अवि पानसरेच्या स्मृतीदिनाला पुन्हा मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. तिथं लवटे सर रसिक म्हणून उपस्थित होते. तेव्हाच त्यांनी मला ते प्राचार्य असलेल्या महावीर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचं पाहुणा म्हणून येण्याचं निमंत्रण दिलं.

मी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत माझा विद्यार्थी मित्र नितीन लोहट आणि सहकारी प्राध्यापक उत्तमराव इंगळे यांना घेऊन गेलो होतो. सर महणाले 'कुठल्याही व्हीआयपी हॉटेलमध्ये मी तुझी व्यवस्था करू शकतो पण तू माझ्या घरी थांबावं असं मला वाटतं. तू तुझी पसंती सांग.' अर्थातच मला सरांच्या घरी थांबायलाच आवडणार होतं. आम्ही सगळे सरांच्या घरी थांबलो. मी प्रमुख पाहुणा आणि सोबत आलेले हे दोघेजण आणि माझा ड्रायव्हर सरांनी सगळ्यांनाच आपल्या मायेने भारून टाकलं. आपुलकीनं कवेत घेतलं. ह्या सगळ्यांना कायमचं स्वतःला जोडून घेतलं.

नितीन तर इतका भारावून गेला की तिथून परत आल्यावर आपणही सरांसारखं काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे असं त्याला वाटत राहिलं. तो म्हणाला मी काय करू सर ? म्हटलं, लवटे सरांशी संपर्क कर आणि त्यांनाच विचार म्हणजे मग ते तुला सामाजिक काम सुचवतील.

नितीन लवटे सरांना म्हणाला, 'मीही काही वंचित मुलांना सांभाळतो. अशी काही मुलं माझ्याकडं पाठवा.' लवटे सर म्हणाले, 'मी कशाला पाठवू ? तुझ्याच परिसरात अगणित शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या निराधार मुलांसाठी तुला काही करता येतं का पहा.' नितीननं त्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंत अडीचशे ते तीनशे मुलं नितीननं त्याच्या वस्तीगृहात मोफत ठेवून त्यांच्या निवास भोजनाची, शिक्षणाची पूर्ण व्यवस्था करून, त्यातल्या अनेकांना नोकऱ्या लावून देऊन, आयुष्यात उभं केलं.

सर जिथं जातील तिथं आपल्या मायेच्या माणसांचा एक गोतावळा तयार करतात. परभणीतही त्यांचा एक मोठा गोतावळा तयार झाला. परभणीच्या चतुरंग व्याख्यानमालेत बारा पंधरा वर्षांपूर्वी सर आले होते. तेव्हापासून विलास पानखडे, अरुण चव्हाळ ही माणसं लवटे सरांच्या घरचीच झाली. या प्रत्येकाची चौकशी प्रत्येक फोनच्या वेळी ते माझ्याकडे करतात.

या सगळ्यांना कोल्हापूरला बोलावून मायेनं त्यांचा आदर सत्कार करतात. सरांचं बोलणं मोठं लाघवी असतं. प्रत्येकाचं कौतुक करण्याची त्यांची एक खास शैली आहे. त्याच्या वागण्या, बोलण्याची नेमकी गुणवैशिष्ट्ये हेरून त्यावर सरांनी केलेली टिपणी मोठी मार्मिक आणि मजेदार असते.

हेमराजजी जैन यांच्याशीही त्यांचा असाच लळा निर्माण झाला होता. मला जेव्हा अमेरिकेचा लाभसेटवार पुरस्कार मिळाला तेव्हा त्या पुरस्कार समितीचे समन्वयक लवटे सरच होते. सर म्हणाले आम्ही परभणीत येऊनच तुला पुरस्कार प्रदान करणार आहोत. कार्यक्रमाचे आयोजन करणारं कोणी असेल त्यांचं नाव सुचव. खर्च आम्ही करू. मी हेमराजजींचं नाव सुचवलं. तो देखणा कार्यक्रम शारदा महाविद्यालयात पार पडला. तेव्हापासून हेमराजजी जैन आणि लवटे सर यांचंही एक अतूट नातं निर्माण झालं. इथल्या चळवळीतल्या, सार्वजनिक जीवनातल्या, सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेकांशी सरांचा लळा-जिव्हाळा आणि लोभ आहे.

जिंतूरच्या शब्दसह्याद्रीचा बाळू बुधवंत याच्याशीही सरांचा असाच लळा-जिव्हाळा आहे. कोरोना काळात बाळूनं घेतलेल्या काही उपक्रमात सर ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झालेले होते. तेव्हापासून बाळूचे आणि त्यांचे चांगलेच सुर जुळले. माझ्या साठीच्या निमित्तानंही बाळूनं सरांना माझ्यावर ऑनलाईन बोलण्याची विनंती केली. ती मान्य करून सर अतिशय उत्कटपणे तास-दीडतास माझ्यावर बोलले. खरंतर त्याआधीही लाभसेटवार पुरस्काराच्या वेळी सरांनी माझ्यावर लोकसत्तामधून मोठा लेख लिहिलेला होता.

वेळोवेळी माझ्या पुस्तकांवरही त्यांनी लिहिलेलं आहे. मी एवढा लहान असून सरांनी माझ्यावर अनेकदा लिहिलं पण माझंच सरांवर लिहायचं राहून गेलं होतं. तशी संधीच येत नव्हती. निमित्त सापडत नव्हतं. पण परवा (०२-०७-२०२३) कोल्हापुरात झालेल्या भेटीनं पुन्हा एकदा सरांच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. लगेच लिहिलं नाही तर तसंच राहून जाईल म्हणून मी आवर्जून लिहायला बसलो.

दोन-तीन वेळा सर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परभणीला आलेले आहेत. मलाही त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरला बोलवलेलं आहे. प्रत्येक वेळी आपुलकीनं मायेनं चौकशी करत राहतात. संकट समई धीर देत राहतात. आनंदाच्या समयी अभिनंदन करतात. जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं सन्मानाची संधी देतात.

सरांचं आत्मकथन 'खाली जमीन वर आकाश' आलं तेव्हा मला ते इतक्यांदा विकत घ्यावं लागलं की कुणी वाचायला नेलेलं परतच येत नव्हतं. वाचलेला प्रत्येक माणूस शिफारस करून पुढं पुढंच पाठवत होता. भारावून जात होता. कारण एवढ्या कठीण आयुष्यात हा माणूस स्वतःला इतका बुलंदपणे उभं करू शकतो याचा आदर्श अनेकांनी आपल्या जीवनात घेतलेला आहे. उत्तम कांबळे यांनी 'लढणाऱ्यांच्या मुलाखती' या पुस्तकात सरांची घेतलेली दीर्घ मुलाखतही अशीच खूप उत्कट आहे.

काही दिवसापूर्वी कोल्हापूरकरांनी सरांचा भव्य सत्कार केला. त्याच दिवशी मी नेमका चंद्रपूरच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. आग्रहाचं निमंत्रण असनही मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. पण या कार्यक्रमाचे समन्वयक विश्वास सुतार यांनी मला एक काम सांगितलं. ते म्हणाले, लवटे सरांचा या निमित्ताने प्रकाशित होणारा जो गौरवग्रंथ आहे त्याच्या ब्लर्बवर तुमची कविता द्या. मलाही खूप आनंद वाटला. सरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी होती. त्यावेळी मी लिहिलं होतं,

।। हा ।।

हा कर्दमवनी उपजोनी, दुःखाच्या नाभीतूनी हा विकसत गेला गुणी, किती सतेज सर्वांगांनी

हा वंचित होता तरीही, हा संचित वाटीत गेला कुणी नव्हते याचे तरीही, सगळ्यांचा होऊन गेला

कुणी कृतघ्न झाला तरीही, वैशम्य न किंचित याला हा सुगंध उधळीत गेला, दशदिशाही उजळीत गेला

पाठीवर देऊन थाप, कितीकांना ऊर्जा दिली रुतलेली चिखलामधली, नावही वाहती केली

हा भाऊक आहे फार, हा भाव पेरणी करितो पिकवून मळे भावांचे, कणसांना कुरवाळीतो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management : सुदूर संवेदन माहितीसाठ्याचा प्रत्यक्ष उपयोग

Rajarambapu Sugar Factory : राजारामबापू साखर कारखान्याचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीत, प्रदूषण मंडळाकडून नोटीस

Bribe News : सिंचन विहिरीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहायकाला अटक

Pumpkin Seed : भोपळा बियांचे आरोग्यदायी फायदे

Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

SCROLL FOR NEXT