Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

SugarCane Management : ऊस खोडवा व्यवस्थापनाचे तंत्र

ऊस खोडव्याचे खर्च लागणीच्या उसापेक्षा ३० टक्यांनी कमी येतो. जमीन मशागत, बेणे आणि लागणीच्या खर्चामध्ये पूर्णपणे बचत होते.

डॉ. भरत रासकर

ऊस (Sugar Cane) खोडव्याचे खर्च लागणीच्या उसापेक्षा ३० टक्यांनी कमी येतो. जमीन मशागत, बेणे आणि लागणीच्या खर्चामध्ये पूर्णपणे बचत होते. खोडवा ऊस पिकाचे उत्पादन (SugarCane Production) तंत्रज्ञान वापरल्यास लागणीच्या उसापेक्षा उत्पादन जास्त येवू शकते असे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील संशोधनावरून दिसून आले आहे.

ऊस तोडणीनंतर शेतामध्ये हेक्टरी ८ ते १० टन पाचट उपलब्ध होते. पाचट जाळल्याने त्यातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्क्याहून अधिक भाग जळून जातो. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत जाते. लागणीच्या उसामध्ये उगवण कमी असल्यास खोडव्यात नांगे पडतात. हे नांगे वेळेवर न भरल्यास हेक्टरी उसाची संख्या कमी भरते.

खोडव्याचे उत्पादन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने कमी येते. त्यामध्ये प्रामुख्याने तळापासून बुडखे न छाटल्यामुळे जोमदार फुटवे फुटत नाही. खोडव्यासाठी जास्त फुटवे फुटणाऱ्या जातींची निवड केली जात नाही. खोडवा पिकासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अपुरा पुरवठा केला जातो. बुडख्यावरील पाचट बाजूला केले जात नाही.

लागण उसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्व मशागत करावी लागत नसल्याने मशागतीवरील ५० टक्के खर्च कमी होतो. एक टन उसामागे दहा टक्क्याने खर्च कमी होतो. शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. २) खोडवा पिकास फूट होण्यासाठी जमिनीतील कांडयावर भरपूर डोळे असतात. त्यामुळे उसाची संख्या लागणीच्या उसापेक्षा जास्त मिळते. खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करीत असल्याने उत्पादनात फारशी घट येत नाही.

खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापनामुळे जमिनीवर अच्छादन होऊन ओलावा टिकून राहतो. पाण्यामध्ये बचत होते. पाण्याची कमतरता असल्यास पीक तग धरण्यास मदत होते आणि सेंद्रिय कर्ब वाढतो.

बुडखे छाटणी

ऊस तुटल्यानंतर शेतात पडलेली कांडी गोळा करून घ्यावी. तोडणीनंतर बुडख्यावर असलेले पाचट सरीमध्ये लोटावे, बुडखे उघडे करावेत, जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील. तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास आणि उसाचे बुडखे मोठे राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत.

ट्रॅक्टर यंत्राद्वारे बुडखा छाटणी आणि पाचटाचे तुकडे करणे ही कामे सुलभरीत्या करणे शक्य झाले आहे. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो. फुटव्यांची एकूण संख्या वाढते. बुडख्याच्या छाटणीनंतर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

पाचट व्यवस्थापन

पाचटामध्ये ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब ही अन्नद्रव्य असतात. एक हेक्टर क्षेत्रामधून ८ ते १० टन पाचट मिळते. त्यापासून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३० ते ४० हजार किलो सेंद्रिय कर्ब आणि २.५ टन सेंद्रिय खत उपलब्ध होते.

२) मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे खोडवा उसामध्ये मूलस्थानी सुरवातीला पाचटाचा आच्छादन म्हणून वापर आणि नंतर जागेवरच चांगले सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. बुडख्यावर पाचट राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

ऊस तोडणीनंतर शेतातील पाचटाचे ढीग पसरून घ्यावेत. ऊस बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटून बुडखे मोकळे करावेत. पाचट शेतातच कुजून जावे म्हणून पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन १०० किलो शेणखतातून सम प्रमाणात पाचटावर टाकावे. पाचटामुळे ओलीचे संरक्षण होऊन पाण्याचा ताण पीक सहन करते. जमिनीचे तापमान २ अंश सेल्सिअसने कमी झाल्याने खोडव्याची उगवणक्षमता वाढून फुटवे जगण्याचे प्रमाण वाढते.

जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्मात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पाचटामुळे खुरपणीचा खर्च पूर्णपणे वाचविता येतो. पाचटामुळे पहिल्या वर्षी २० टक्के तर दुसऱ्या वर्षी ३० टक्के खोडव्याचे उत्पादनात वाढ होते. पाचटाच्या वापराने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ११ टक्क्याने आणि उपलब्ध अन्नद्रव्यात नत्र, स्फुरद व पालाश मध्ये अनुक्रमे ६७, २० आणि १४५ किलो प्रति हेक्टरी वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

- डॉ. भरत रासकर,

८७८८१०१३६७

(ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि.सातारा)

खोडवा नियोजन करताना

खोडव्यामध्ये पाचटाचा आच्छादन म्हणून वापर करण्यासाठी लागणीच्या उसाच्या दोन सरीमधील अंतर ४.५ ते ५ फूट असावे. म्हणजे पट्ट्यात पाचट चांगले बसते. त्यापेक्षा कमी अंतराच्या सरीमध्ये हेक्टरी ५ टनापेक्षा जास्त पाचट बसत नाही.

पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानुसार जानेवारी पासून १५ फेब्रुवारी पर्यंतच तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर असल्याचे दिसून आले. शिफारशीत ऊस जातीचा खोडवा ठेवावा.

उसातील अंतर २ फुटापेक्षा जास्त असल्यास मधल्या मोकळ्या जागेत रोपांची लागवड करावी. ज्या ऊस लागणीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १५० टन आणि ऊस संख्या ८० हजारांपेक्षा जास्त आहे अशा उसाचा खोडवा ठेवावा.

ऊस पीक विरळ झाल्यास नांग्या भराव्यात. नांग्या भरण्यासाठी पॅालि ट्रे मधील किंवा सुपरकेन नर्सरी तंत्राने तयार केलेली रोपे वापरावीत.

खोडव्यासाठी अधिक उत्पादनक्षम, फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची निवड करावी. उदा. को ८६०३२, फुले २६५, फुले १०००१, फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ या जातीचा खोडवा ठेवावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT