सोलापूर ः टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Election Of Bhima Sugar Factory) निवडणुकीच्या निकालात अपेक्षेप्रमाणे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांच्या शेतकरी विकास आघाडीने सोमवारी (ता. १४) झालेल्या निवडणूक निकालात बाजी मारली.
स्वतः धनंजय महाडीक हे संस्था प्रतिनिधी गटातून तर त्यांचे चिरंजीव विश्वराज महाडीक हे पुळूज गटातून निवडून आले. कारखान्याच्या सभासदांनी सलग तिसऱ्यांदा महाडीक यांना विजयाच्या हॅट्रिकची संधी देत विश्वास दाखवला आहे.
भीमा साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत १५ जागांसाठी ३५ जण निवडणुकीत रिंगणात होते. रविवारी (ता. १३) या निवडणुकीसाठी चुरशीने ८० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १५) सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी जाहीर केला.
त्यात संस्था मतदारसंघातून स्वतः धनंजय महाडीक विजयी झाले. तर अन्य त्यांच्या शेतकरी विकास आघाडी पॅनेलने शेवटपर्यंत विजयी आघाडी कायम ठेवली, त्यांचे संचालक दोन्ही फेरीअखेर सुमारे सात हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.
माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधी भीमा बचाव पॅनेलचा मात्र धुव्वा उडाला. कारखान्याची ही निवडणूक अगदी सुरुवातीपासूनच विविध आरोप-प्रत्यारोपाने गाजली. विशेषतः प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली.
कारखान्यावरील थकीत कर्जे, ऊसबिले आणि कामगारांच्या पगारी यासारख्या मुदद्यांशिवाय वैयक्तिक पातळीपर्यंत प्रचार पोचला, पण शेवटी सभासदांनी महाडिकांच्या बाजूने कौल दिला. निवडणुकीचा निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.
विरोधकांकडे कोणताच मुद्दा नव्हता. हा विजय कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये जे-जे शब्द दिले होते, ते शब्द पूर्ण केले. चांगला दर आणि योग्य वजनकाटा हे मुद्दे घेऊन सभासदांसमोर गेलो होतो. तसेच भविष्यात इथेनॅालचा प्रकल्पही उभारणार आहे.
- खासदार धनंजय महाडीक, अध्यक्ष, भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.