Sugarcane Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmers : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार

District Collectors Belgaum : निर्णय घेणारे अधिकारी बैठकीला नसतील, तर बैठक कशाला बोलावता, असा सवाल करून बैठकीत प्रश्नांचा भडीमार केला.

sandeep Shirguppe

Sugarcne Farmer Belgaum : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २३) शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे बैठकीत एकच गदारोळ माजला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे पोलिस यंत्रणेचेही धावपळ उडाली.

लवकरच जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी संघटना प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. मात्र, या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, साखर आयुक्त यांच्यासह साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जवळपास तासभर शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून केली जाणारी काटामारी यावर प्रश्न उपस्थित केला.

काटामारी थांबविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची उसाची बिले थकवली गेली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देऊनही कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन अकार्यक्षम असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

जिल्हा प्रशासन व राजकीय नेते संगनमताने शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत, असा आरोपही यावेळी झाला. केवळ कागदोपत्री नमूद करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक बोलावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. निर्णय घेणारे अधिकारी बैठकीला नसतील, तर बैठक कशाला बोलावता, असा सवाल करून बैठकीत प्रश्नांचा भडीमार केला.

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साखर आयुक्त आणि सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी हजर नसल्यास बैठक पूर्ण होऊ देणार नाही. सर्व बैठकीला हजर राहिलेच पाहिजेत, तरच बैठक घ्या, अशी मागणी केली.

‘साडेचार हजार दर द्या’

योग्य दर जाहीर केल्याशिवाय ऊस गाळप केला जाऊ नये. उसाला चार हजार पाचशे रुपये दर द्यावा, काटामारी थांबवावी, अशी मागणी लावून धरली. मात्र यावर प्रशासनाकडून कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील २०२० च्या पीकविमा भरपाईचा निकाल लागेना

Onion Market : सोलापुरात कांदा खरेदीदार व्यापाऱ्याला आठ लाखांचा दंड

Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

Grape Variety : द्राक्षाच्या नव्या वाणांच्या आयातीसाठी केंद्राकडे पाठपुरावा

Mango Cashew Insurance : आंबा, काजू बागायतदारांना विमा परतावा जमा, वगळलेल्या ९ मंडलांनाही लाभ

SCROLL FOR NEXT