Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

Sugarcane Season : यंदा साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु विधानसभा निवडणुकांमुळे गळीत हंगामाला थोडासा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे.
Kolhapur Assembly Election
Kolhapur Assembly Electionagrowon
Published on
Updated on

Sugarcane Season Kolhapur : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आहेत. अनेक इच्छुक आपल्या मतदार संघात जोरदार जोडण्या लावताना दिसत आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातही हायव्होल्टेज निवडणुकांचे रणांगण पहायला मिळणार आहे. जिल्ह्यात जवळपास १३ साखर कारखान्यांचे चेअरमन अथवा संचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने गळीत हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी तब्बल १३ साखर कारखानदार निवडणुकीचा मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत.

कागल विधानसभेत कोण असणार

संताजी घोरपडे कारखान्याचे सर्वेसर्वा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे तुतारी फुंकणार आहेत. तर या दोघांच्याविरोधात बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढत सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक यांनीही मैदानात उतरण्याचे ठरवले आहे.

इचलकंरजी, हातकणंगले विधानसभा

इचलकरंजी मतदार संघातून इच्छुक असलेले नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल आवाडे हे मैदानात असणार आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांचे पूत्र राहुल आवाडे हे पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहेत.

शिरोळ विधानसभा

शिरोळ विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार शरद साखर सहकारी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर मैदानात उतरणार आहेत. तर यांच्याविरोधात दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Kolhapur Assembly Election
Sugar Factories Kolhapur : साखर कारखान्यांच्या वजन काट्यात तफावत; कोल्हापूर जिल्ह्यात रॅकेट

करवीर तालुक्यातून हे कारखानदार

करवीर विधानसभा मतदार संघातून दिवंगत आमदार भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.एन.पाटील यांचा मुलगा राहुल पाटील रिंगणात असणार आहेत. तर यांच्या विरोधात कुंभी साखर कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रदीप नरके मैदानात असणार आहेत.

दरम्यान जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या करवीर तालुक्यातील दक्षिण मतदार संघातून डी. वाय. पाटील कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे मैदानात उतरणार आहेत. तर यांचे प्रतिस्पर्धी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अमल महाडिक हे रिंगणात असणार आहेत. या विधानसभा मतदार आतापासूनच जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.

राधानगरी विधानसभा

जिल्ह्यातील सर्वात उच्चांकी दर देणाऱ्या बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील राधानगरी भुदरगड तालुक्यातून जोरदार तयारी करताना दिसत आहेत. तर बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष राहिलेले ए. वाय. पाटीलही येथूनच तयारी करताना दिसत आहेत.

पन्हाळा विधानसभा

महायुतीचे घटकपक्ष असलेल्या वारणा साखर कारखान्याचे चेअरमन जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष विनय कोरे यांनी पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातून तयारी सुरू केली आहे. तर विश्वास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील हेही यांच्याविरोधात रिंगणात असणार आहेत.

गाळप हंगामाला गती मिळणार का?

यंदा साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु विधानसभा निवडणुकांमुळे गळीत हंगामाला थोडासा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. अशातच साखर आयुक्तांनी साखर हंगाम वेळेआदी सुरू केल्यास कारवाई करणार असल्याचे आदेश काढल्याने कारखानदार हे धाडस करणार नाहीत. दरम्यान हंगाम लांबल्यास पूरबाधित पिकांचे नुकसान होणार आहे परंतु चांगल्या उसाच्या वजनात वाढ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com