Date Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Date Farming : जालना जिल्ह्यात शेडगेंचा खजुराचा यशस्वी प्रयोग

Date Production : तनवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील दामोदर व जगदीश या शेडगे पितापुत्रांनी तीन एकर खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

संतोष मुंढे

Date Palm Cultivation : तनवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील दामोदर व जगदीश या शेडगे पितापुत्रांनी तीन एकर खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. कमी देखभालीसह पाणी, खते, कीडनाशके व मजुरी यांचीही अत्यंत कमी गरज भासणारे हे पीक असून दुष्काळी भागासाठी लाभदायक असल्याचे शेडगे यांचे म्हणणे आहे. किलोला २०० रुपये दराने थेट विक्री करून त्यास शेडगे यांनी बाजारपेठही मिळवली आहे.

जालना जिल्ह्यात तनवाडी (ता. घनसावंगी) येथील दामोदर शेडगे यांची सुमारे २० एकर शेती
आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिरंजीव जगदीश देखील शेतीची जबाबदारी सांभाळतात. कपाशी, तूर ही पारंपरिक पिके व मोसंबीची तीनशेहून अधिक झाडे आहेत. आठ ते दहा एकर उसापैकी दोन- तीन एकरांत कलिंगडाचे उत्पादन घेतात. व्यापाऱ्यांना त्याची जागेवर विक्री होते. उसाच्या बांधावर सीताफळ लागवड आहे. अशा पद्धतीने शेती सुरू असताना शेडगे नव्या पिकांच्या व प्रयोगांच्या शोधात होते. एकेदिवशी परतूर जवळील बागेश्वरी कारखाना परिसरात काही शोभिवंत झाडे त्यांच्या पाहणीत आली. पुढे त्यांना मोठ्या प्रमाणात फळेही लगडल्याचे दिसले. अधिक माहितीतून ही खजुराची झाडे असल्याचे समजले. या पिकाविषयी अधिक उत्सुकता निर्माण होऊन त्याबाबत सविस्तर माहिती व अर्थशास्त्र जाणून घेतले. या पिकाचा प्रयोग करण्याचे धाडस करायचे ठरवले. गुजरात राज्यातील कच्छ भागातून वाहतुकीसह प्रति नग चार हजार रुपयांप्रमाणे रोपे आणलो.

तीन एकरांतील प्रयोग

ज्या नर्सरीतून रोपे आणली तेथूनच लागवडीचे शास्त्र जाणून घेतले. तीन एकरांत २५ बाय २५ फूट अंतरावर २०१९ च्या सुमारास लागवड झाली. एकरी सुमारे ६८ रोपे बसली. बाग नवी असल्याने खरिपात सोयाबीन तर रब्बीत गव्हाचे आंतरपीक घेणे सुरू केले. फलधारणा सुरू झाल्यापासून मात्र सोयाबीन घेणे थांबवून केवळ गहू घेणे सुरू ठेवले. तीन वर्षे जोपासलेली झाडे २०२२- २३ च्या दरम्यान उत्पादनक्षम झाली. साधारण जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून फुलोरा व फळ सेटिंग तर जून ते जुलै- ऑगस्ट कालावधीत उत्पादन हाती येणे सुरू झाले. पहिल्या वर्षी एकूण क्षेत्रात सुमारे चार टन उत्पादन मिळाले. त्यापुढील वर्षी मात्र झाडांची चांगली वाढ होऊन सुमारे १४ टन उत्पादन हाती लागले. पुढील काही दिवसांनी बाग फुलोऱ्यात येणार आहे. पुढील विक्रीच्या हंगामात एकूण उत्पादन २५ ते ३० टनांपर्यंत मिळेल असा शेडगे यांना अंदाज आहे.

परागीकरणाची प्रक्रिया

खजूर पिकात परागीभवन क्रिया महत्त्वाची ठरते. बागेतील सुमारे १८१ झाडांपैकी ११ झाडे नर जातीची आहेत. त्यांच्या फुलातील परागकण संकलित करून मादी झाडाच्या तुऱ्यावर ते पडतील अशी प्रक्रिया केली जाते. त्यासाठी एक बाटली, त्याला जोडलेल्या दोन नळ्या व त्याद्वारे फुंकणे अशी ही क्रिया केली जाते. या कामासाठी कौशल्य असणे आवश्‍यक असते. जानेवारीच्या काळात ती सुरू होते.

व्यवस्थापनातील बाबी


शेडगे म्हणाले, की झाडांना वर्षातून दोनवेळा म्हणजे ऑगस्ट व ऑक्टोबर अशा दोन वेळेत शेणखताचा वापर केला जातो. झाडाचे वय वाढेल त्यानुसार सुरवातीला प्रति झाड १० किलो असलेले प्रमाण ३० किलोपर्यंत नेले आहे. पाण्यासाठी दोन विहिरी, दोन बोअरवेल्स व दीड एकरांत शेततळे आहे. झाडाच्या बुडापासून दोन फुटांवर दोन्ही बाजूने पाण्याचा ‘डिस्चार्ज’ होईल तसेच दोन ओळीमध्ये एक ठिबक अंथरून पाणी देण्याची पद्धत आहे. मार्च- एप्रिल- मेमध्ये झाडावर फळे असताना दर दोन-तीन दिवसांनी दोन ते चार तास पाणी देण्याचे नियोजन आहे. फळे ‘लूज’ पडताना दिसली की पाण्याचे प्रमाण वाढवण्याचे नियोजन केले.

थेट विक्रीमुळे जादा दर

बहुतांश खजुराची विक्री थेट ग्राहकांना म्हणजे शेताच्या बाजूस रस्त्याकडेला स्टॉल उभारून केली. अंबड येथे स्टॉल उभारून काही विक्री केली. दामोदर यांचे चिरंजीव सतीश पुणे येथे इंजिनिअर असून, त्यांच्या मार्फत सुमारे एक ते दीड टन खजुराची विक्री या शहरात थेट ग्राहकांनाच केली. दामोदर म्हणाले, की व्यापाऱ्यांना विक्री केली असती तर किलोला ८० ते १०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला नसता. थेट विक्रीत किलोला २०० रुपये दर मिळाला. विक्री सुकर होण्यासाठी काही व्यक्ती नेमून त्यांना प्रति दिन एकहजार रुपये मेहनताना दिला. त्यास चांगला प्रतिसाद लाभला. दरांवर चांगले नियंत्रण राहावे म्हणून एक महिना फळे शीतगृहात ठेवली. गरजेनुसार पुन्हा विक्रीचे तंत्र अवलंबिले.

खजूर का फायदेशीर?

दामोदर म्हणाले, की आम्ही लागवड केलेला खजूर स्वादाने गोड आहे. हलक्या, मुरमाड, पाण्याचा निचरा होण्याऱ्या जमिनीत हे पीक चांगले येते. रासायनिक खते व कीडनाशके फवारण्या यांची गरज जवळपास नसतेच. त्यामुळे त्यावरील खर्च वाचतो. शिवाय मजूरबळही कमी होते. उन्हाळ्यात मार्च- एप्रिलमध्येच पाण्याची अधिक गरज भासते. दोन झाडे व ओळींमधील अंतर जास्त असल्याने तण वाढत नाही. कारण आंतरपीक घेऊन जागा भरून काढता येते. नैसर्गिक आपत्तीत हे पीक तग धरते. झाडावर २० किलोपर्यंत घोस असल्यास गारपीट जरी झाली तरी छत्रीसारख्या रचनेच्या पानांवर गारा पडतात. फळांना नुकसान पोहोचत नाही, असेही दामोदर यांनी सांगितले. मराठवाड्यात खजुराचे प्रयोग हाताच्या बोटांवर मोजण्याइतके झाले आहेत. जालना जिल्ह्यात तर शेडगे यांचा हा पहिलाच प्रयोग असावा असे शेडगे म्हणतात.


दामोदर शेंडगे, ९०७५६८६७७७
जगदीश शेंडगे, ८३८१०६९७७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT