Satara News : सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांत स्थानिक आघाड्यांना यश आले. पाटण बाजार समितीत पालकमंत्री शुंभराज देसाई तर कऱ्हाड बाजार समितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील यांनी विजय खेचून आणला असून सातारा बाजार समितीत आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी निर्विवाद यश मिळवले असून आमदार मकरंद पाटील यांनी वाई, लोणंद येथे एकहाती मिळवली.
सातारा बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीत सर्व १८ जागा जिंकत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या अजिंक्य पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व खासदार उदयनराजे भोसले गटाच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने ‘स्वाभिमानी’च्या पॅनेलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
सातारा तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंचेच वर्चस्व असल्याचे या निकालाने सिद्ध केले. कऱ्हाड बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जाणीवपूर्वक घेतलेला सहभाग, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांनी गावोगावच्या सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकीत घातलेले लक्ष, तालुक्यातील दुभंगलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकदिलाने एकवटलेली काँग्रेस, कऱ्हाड उत्तरमधील भाजपच्या नेत्यांची झालेली मदत या कंगोऱ्यामुळे कऱ्हाड बाजार समितीत लोकनेते विलासराव पाटील काका रयत पॅनेलला सत्ता कायम ठेवण्यात यश मिळाले.
रयत पॅनेल १२ जागा तर विरोधी आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले.
पाटण बाजार समिती निवडणुकीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्तांतर करून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ४० वर्षे एकहाती सत्तेला सुरुंग लावून जोरदार मुसंडी मारली. १७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत फक्त ३ जागेवर विरोधकांना समाधान मानावे लागले.
कोरेगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अंतर्गत गटतट, मतभेद बाजूला ठेवत एकत्रित आलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झालेली ‘वज्रमूठ’च एकतर्फी मोठा विजय मिळवू शकल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. गत विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या गर्द छायेतून बाहेर पडण्यासाठी जसा हा विजय राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार शशिकांत शिंदे यांना ऊर्जा देणारा ठरणारा आहे.
या गटाने १६ जागा जिंकत यश संपादन केले. फलटण बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाने अपेक्षित बाजी मारल्याने फलटण तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधकांच्या ताकतीच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विरोधी उमेदवारांना या निवडणुकीत छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केला. या निवडणुकीत राजे गटाने विरोधकांचा १८-० असा सुपडा साफ केला.
वडूज बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकल्या. तर राष्ट्रवादी व स्वाभीमानीच्या शेतकरी सहकार पॅनेलने ५ जागा मिळविल्या. जिल्हा बँक निवडणुकीनंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतील यशामुळे खटावच्या राजकारणात घार्गेंचा करिष्मा कायम राहिला.
लोणंद, वाईमध्ये मकरंद पाटलांचा करिष्मा कायम
लोणंद बाजार समितीच्या निवडणूक अपेक्षेप्रमाणे जादूचा करिष्मा कायम राखत आमदार मकरंद पाटील यांनी जिंकून एकहाती सत्ता मिळवली. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १७ जागा जिंकत लोणंद बाजार समितीवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले.
वाई बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्तारूढ सहकार प्रगती पॅनेलने सर्व ११ जागा जिंकून एकहाती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आणि सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.