Akola News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून यंत्र, अवजारे बँकेसाठी अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणात शासनाकडून अनुदान वसुलीचे निर्देश देण्यात आलेले असून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दोन गटांनी सुमारे दहा लाखांवर अनुदान परत केल्याचे समजते. एकीकडे शेतकऱ्यांकडून अनुदानाची वसुली केली जात असताना दुसरीकडे या प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांना मोकळीक का दिल्या जात आहे, असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात काही गट, शेतकरी कंपन्यांनी अवजारे बँक घटकाचा लाभ उचललेला आहे. यामध्ये खरेदी न करताच देयके सादर करून अनुदान लाटल्याचा संशय चौकशी अहवालात व्यक्त केल्या गेला.
या प्रकरणाबाबत विविध पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्नही मांडले. त्यानंतर कारवाईला गती मिळाली. यंत्र, अवजारे गायब असलेल्या गटांकडून अनुदानाची रक्कम वसुलीबाबत नोटिसी बजावण्यात आल्या. आतापर्यंत दोन गटांनी सुमारे १० लाखांवर अनुदान शासन जमा केल्याचे समजते. या रकमेचा नुकताच प्रकल्पाच्या बँक खात्यात भरणा झाल्याची चर्चा आहे.
पोकरा योजनेच्या अवजारे बँक घोटाळ्यात बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील चमूने चौकशीनंतर सादर केलेल्या अहवालामध्ये तपासणीत ११३ ठिकाणी मंजुरीपेक्षा कमी अवजारे दिसून आली. दोन गटांकडे एकही अवजार नाही असे कळवले. चौकशीत सुरुवातीला तीन कोटी ६४ लाख ९५ हजार ७७६ रुपयांची अवजारे आढळून आलेली नव्हती. त्यानंतर काही गटांकडून नोटिसांना उत्तर देण्यात आले.
फेर तपासणीनुसार २४ कंपन्या, गटांकडे वसूल पात्र रक्कम ही ४७ लाख आठ हजार ८०० रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात यंत्र, अवजारे गायब असल्या प्रकरणात सुमारे ४७ लाखांवर अनुदान वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
त्यातही संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची, यंत्र-अवजारांचा तपशिल उपलब्ध असेल तर सादर करण्याबाबत मुभा देण्यात आलेली आहे. अनुदान लाटलेल्या गटांकडून वसुली केली जात आहे. दोन गटांनी त्यांच्याकडील रकमांचा भरणा केल्याने आता त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार तूर्त दूर झाली आहे.
सहभागी अधिकारी मोकळेच
या प्रकरणात सहमतीने अनुदान लाटल्याची सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केल्या जात होती. चौकशी अहवालांमध्ये ते स्पष्टही झाले. एकीकडे शासन शेतकरी गटांकडून अनुदान वसुल करीत आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांना अद्यापही मोकळे रान कोणाच्या आशीर्वादाने मिळालेले आहे, या बाबत शेतकरी आता प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.