Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : खासगी दूध संस्थांनाही अनुदान; पण दरात घट

Milk Production : दूध संस्थांकडून २७ रुपये प्रतिलिटर देण्याचा आदेश

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Milk मुंबई : राज्यातील गायीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे भाव घसरल्याने राज्यातील सहकारी दूध संघांबरोबरच खासगी दूध संघांनाही प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी (ता. ४) उशिरा घेण्यात आला. वास्तविक मंत्रिमंडळ बैठकीत सहकारी दूध संघांच्या दुधाला प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही तासांतच खासगी दूध संघांनाही अनुदान जाहीर करण्यात आले.

तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध संस्थांनी २९ रुपये प्रतिलिटर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत असे जाहीर केलेले असताना त्यात दोन रुपयांची घट करून २७ रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ३४ रुपयांवरून ३२ रुपये, पुन्हा २९ रुपये जाहीर करून पुन्हा २७ रुपये दर निश्‍चित केले.


रात्री उशिरा सहकारी दूध संघांबरोबरच खासगी दूध संघांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले. या बाबतचा शासन निर्णय शुक्रवारी (ता. ५) काढला असून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात गायीच्या दुधाचे दर उतरल्याने त्यांना उचित भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबविण्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात जाहीर केले होते. त्यानुसार प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले होते.

मात्र गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खासगी दूध संघांना अनुदान देण्याचा कुठलाही निर्णय झाला नव्हता. मात्र अचानक रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून सहकारी आणि खासगी दूध संघांना अनुदान देण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान २७ रुपये प्रतिलिटर दर संबंधित उत्पादकाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर राज्य सरकारमार्फत पाच रुपये ऑनलाइन डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.


३.५ फॅट आणि ८. ५ एसएनएफ गुणप्रतिपेक्षा प्रतिपॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करिता ३० पैसे वजावट करण्यात येणार आहे. तर प्रतिपॉइंट वाढीकरिता ३० पैसे वाढ करण्यात येणार आहे. या योजनेसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे. सध्या राज्यात प्रतिदिन १४९ लाख लिटर दूध संकलित होते. त्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाप्रमाणे एक महिन्यांच्या कालावधीकरिता अंदाजे २३० कोटी रुपये अनुदान आवश्यक आहे. मात्र दूध संकलनानुसार यात वाढ किंवा घट होऊ शकते.

खासगी दूध संघांचे संकलन जास्त
राज्यात सहकारी दूध संघांमार्फत प्रतिदिन ४३.३९ लाख लिटर दूध संकलन केले जाते. यासाठी १३५.४४ लाख रुपये अनुदानाची गरज आहे, असे दुग्धविकास विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे. खासगी दूध संघांकडून संकलित होणाऱ्या १०५ लाख ६१ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. त्यामुळे अनुदान रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.


दूध संस्थांच्या प्रतिलिटर दरात कपात
दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध संस्थांनी २९ रुपये दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले होते. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही विभागाने तसा प्रस्ताव ठेवला होता. ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ गुणप्रतिकरिता २९ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, असा प्रस्ताव दिला होता. मात्र शासन आदेशात ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफकरिता २७ रुपये दर देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT