Poultry Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : अभ्यास, उत्तम व्यवस्थापनातून यशस्वी पोल्ट्री उद्योग

Poultry Business : ‘पोल्ट्री’ किंवा शेतीचा कोणताही अनुभव नाही. पण अभ्यास, प्रशिक्षण, शास्त्रीय दृष्टिकोन व प्रामाणिकता यांच्या जोरावर विटा (जि. सांगली) येथील दीपक व मिनेश या पितापुत्रांनी ‘लेअर’ कोंबडीपालनात पाय रोवले. सातत्य टिकवले.

Abhijeet Dake

अभिजित डाके

Poultry Industry : ‘पोल्ट्री’ किंवा शेतीचा कोणताही अनुभव नाही. पण अभ्यास, प्रशिक्षण, शास्त्रीय दृष्टिकोन व प्रामाणिकता यांच्या जोरावर विटा (जि. सांगली) येथील दीपक व मिनेश या पितापुत्रांनी ‘लेअर’ कोंबडीपालनात पाय रोवले. सातत्य टिकवले. उत्तम व्यवस्थापनातून पाच हजार पक्ष्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज ४५ हजार पक्ष्यांपर्यंत विस्तारत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा हे महत्त्वाचे शहर असून, वस्‍त्रोद्योगासाठी त्याची ओळख आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी भागात पोल्ट्री व्यवसाय सुरू झाला. आता या उद्योगातही विट्याची वेगळी ओळख तयार झाली आहे. अनेक संकटांवर मात देत व्यावसायिकांनी यात उल्लेखनीय वाटचाल केली आहे. शहरातील दीपक व मिनेश या बसागरे पितापुत्र त्यापैकीच एक आहेत. दीपक १९७० ते १९७७ च्या दरम्यान गुजरातच्या जामनगर येथील सैनिकी शाळेत शिकण्यासाठी गेले.

नवी भाषा, नवा भाग यामुळे शिक्षणात अडचणी आल्या. पण जिद्दीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले. त्या जोरावर स्पर्धा परीक्षा दिली. पण त्यात यश आले नाही. त्यानंतर १९७८ मध्ये ‘फार्मसी’ची पदविका पूर्ण केली. वडिलांचा मालवाहतुकीचा व्यवसाय होता. सुमारे १६ गाड्या दारी असायच्या. त्यातून तासगाव व विटा या दोन तालुक्यांतील द्राक्षांची वाहतूक केली जायची. मुंबईत कार्यालयही सुरु केले. पण तेथे काही दीपक यांचे मन रमले नाही. त्यांनी गावीच व्यवसाय सांभाळणे पत्करले. हळूहळू विटा शहरातील अंड्यांची वाहतूक सुरू केली. संकटे आली पण सामना करीत तो नेटाने पुढे नेला. दीपक यांना बंधू कै. सुभाष यांचीही समर्थ साथ होती.

‘पोल्ट्री’ व्यवसायाचे धाडस

दरम्यान, दीपक यांना स्वतःचा लेअर कोंबड्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करावे असे वाटू लागले. घरची शेती तसेच या व्यवसायातील पार्श्‍वभूमी वा अनुभव काहीच नव्हता. पण जिद्द व धाडसाच्या जोरावर त्यात उतरण्याचे ठरविले. बॅंकेच्या मदतीने भांडवल उभे केले. सन १९८०-८२ च्या दरम्यानचा हा काळ होता. पाच हजार पक्ष्यांपासून सुरुवात झाली. पण पुरेशा अनुभवाअभावी रोगांचा प्रादुर्भाव होऊन अंडी उत्पादनात घट झाली. आर्थिक फटका बसला. दीपक ‘डी.फार्म.’ असल्याने विविध डॉक्टरांचा संपर्क होता. त्यातून पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी जवळीक वाढवली. चिकाटी व प्रामाणिकपणातून व्यवसायात स्थिरता मिळवली. आज दीपक यांचा मुलगा म्हणजे मिनेश (वय ३८) यांनी पोल्ट्री व्यवसायाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांचे बी. कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. पण व्यवसायात कौशल्य व तज्ज्ञ होण्याच्या दृष्टीने २००२-०३ मध्ये पुणे- उरुळीकांचन येथील पोल्ट्री व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान संस्थेतून एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला.

चोख व्यवस्थापन

मिनेश यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्ष्यांच्या दर्जेदार खाद्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. तयार खाद्याच्या किमती महाग आहेत. त्यामुळे स्वतः प्रथिनयुक्त खाद्य निर्मिती व खर्चात बचत करण्याचे ठरविले. हैदराबाद येथून दीड ते दोन लाख रुपये यंत्राची खरेदी करीत ‘फीडमिल युनिट’ सज्ज केले.
मका, सोयापेंड, तांदूळ कणी यांची खरेदी बाजारातील दरानुसार केली जाते. प्रति दिन साडेतीन टन खाद्य तयार करण्याची युनिटची क्षमता आहे. पक्ष्यांना असलेली खाद्याची गरज लक्षात घेऊन उत्पादन केले जाते.


पोल्ट्री उत्पादन (ठळक बाबी) (इन्फो)

- एकूण आठ शेड्‍स. प्रति शेड पक्षी क्षमता पाच हजार अशी एकूण क्षमता सुमारे ४० ते ४५ हजार पक्षी.
- या व्यवसायातील तीन कंपन्यांकडून होते एकदिवसीय पिलांची खरेदी. प्रति पिलू किंमत ४५ रुपये.
- साधारण अठरा आठवड्यानंतर पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतो. ही प्रक्रिया ७२ ते ८० आठवड्यांपर्यंत चालते.
- वर्षाला प्रति पक्षी ३०० ते ३२० अंडी देईल असे व्यवस्थापन.
-पशुवैद्यकांकडून पोल्ट्रीची सातत्याने देखरेख, दररोज सकाळी शेडमध्ये स्वच्छता
-विनाकारण प्रथिनांचा मारा करण्यापेक्षा पक्षांची गरज ओळखून तेवढेच खाद्य व्यवस्थापन. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत. शिवाय खाद्यावरील अनावश्‍यक खर्च कमी होतो.
-मिनेश स्वतः जातीने राबतात. शिवाय आठ मजुरांना रोजगार दिला आहे.
-प्रति पक्षी भांडवली गुंतवणूक बांधकामासह पाचशे ते सहाशे तर बांधकामाविना तीनशे रुपयांपर्यंत असते.

‘मार्केट’ व अर्थकारण (इन्फो)

पूर्वी अंड्यांच्या वाहतुकीमुळे पोल्ट्रीशी संबंधित बहुतांश व्यापाऱ्यांसोबत मैत्रीचे नाते तयार झाले होते. ते स्वतः व्यवसाय करताना उपयोगी ठरले. दोन ते तीन व्यापारी निश्‍चित असून ते फार्मवर येऊन अंडी खरेदी करतात. मिनेश दरांबाबत अत्यंत जागरूक असतात. हैदराबाद, मुंबई आदी ठिकाणच्या बाजारपेठा, त्यातील दरांचा अंदाज, चढ-उतार लक्षात घेऊन अंड्यांची विक्री केली जाते. प्रति अंडे उत्पादन खर्च सुमारे ३ रुपये ९० पैसे इतका असतो. अंड्यांचे दर सातत्याने बदलतात. प्रति अंडे साडेचार रुपये किंवा त्याहून कमी- जास्तही होतात. काहीवेळा ते उत्पादन खर्चापेक्षा कमी असतात. वर्षाला काही टन कोंबडीखत मिळते. विटा परिसरातील शेतकरी ते ४५०० रुपये प्रति टन दराने घेतात.
.......................................................................
मिनेश बसागरे, ९९२२१००८९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT