Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Agrowon
ॲग्रो विशेष

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj : गंज, निकृष्ट कामामुळे मालवणला पुतळा कोसळला

Team Agrowon

Mumbai News : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गंज आणि कमकुवत फ्रेममुळे कोसळल्याचा १५ पानी अहवाल समितीने राज्य सरकारला गुरुवारी (ता. २६) सादर केला. २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला होता. नौदलाने उभारलेल्या या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते. या प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल ऑडिटर चेतन पाटील सध्या अटकेत आहेत.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा उभारण्यात आला होता. घाईगडबडीत उभारलेल्या या पुतळ्याचे काम निकृष्ट झाले होते. यावरून राजकीय आरोप, प्रत्यारोप झाले. तरीही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पुतळा उभारणीचे समर्थन केले होते. पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारने नौदलाचा अनुभव असलेले कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले हेते.

या समितीत बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, माजी मुख्य अभियंता विकास रामुगडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिंदा यांचा समावेश होता. या समितीने दिलेल्या अहवालात पुतळा उभारणीतील अनेक दोष समोर आणले आहेत. या पुतळ्यासाठी वापरलेले पोलाद निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर गंज चढला होता. तसेच पुतळ्याची फ्रेमही कमकुवत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. हा पुतळा उभारल्यानंतर त्याची नीट देखभाल केली नसल्याचाही ठपका ठेवला आहे. चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग केले होते. पुतळ्याचे डिझाइन योग्य पद्धतीने झाले नसल्याचेही अहवालात नमूद केले आहे. बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांच्याकडे हा अहवाल सादर केला आहे.

चेतन पाटीलच्या अटकेवर मतांतरे

लोकसभा निवडणुकीच्या आधी डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाल्यानंतर आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला होता. पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे लगेचच फरारी झाला होता. तर बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला अटक केली. मात्र, पुतळ्याचा चबुतरा आणि अन्य बाबींना काहीही न झाल्याने पाटील याला अटक करण्यामागील प्रयोजन काय, असा सवालही उपस्थित केला गेला. न्यायालयाने पाटील याला जामिनास नकार दिला. पाटीलला अटक केली, आपटे मात्र सापडत नव्हता. चौकशी समितीने अहवालात पुतळ्याचे डिझाईन चुकीचे असल्याचा ठपका ठेवल्याने चेतन पाटील याच्या अटकेवर मतांतरे व्यक्त होत आहेत.

साठ फुटी पुतळ्यासाठी निविदा

राजकोट येथे नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फुटी पुतळा उभारण्यासाठी बांधकाम विभागाने २० कोटींची निविदा काढली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असून, चार ऑक्टोबरपर्यंत सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड करण्यात येणार आहे. या पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे इतके असेल असे निविदेत म्हटले आहे. तर १० वर्षे या पुतळ्याची देखभाल ठेकेदारास करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्त्वाचे...

Flaws in Democracy : लोकशाहीतील दोष दूर करण्यासाठी...

Fertilizers Use : पर्यायी खतांचा करा परिणामकारक वापर

Voluntary Retirement : ‘महानंद’च्या ४६७ कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती

Sugar Factory Repayment : साखर कारखान्यांवरील थकहमी परतफेडीसाठी लागणार साधे बंधपत्र

SCROLL FOR NEXT